देवद आश्रमातील सौ. विमल गरुड यांनी संतांच्‍या मार्गदर्शनानुसार स्‍वभावदोष आणि अहं यांच्‍या निर्मूलनासाठी प्रयत्न केल्‍यावर त्‍यांना स्‍वतःत जाणवलेले पालट

सद्गुरु (सुश्री (कु.)) अनुराधा वाडेकर

१. सद़्‍गुरु अनुराधा वाडेकर यांनी केलेल्‍या प्रीतीमुळे साधिकेला साधनेचे प्रयत्न करता येणे आणि देवद आश्रमात गेल्‍यावर मनाची सकारात्‍मकता वाढून ‘स्‍वतःला पालटायचेच’, हा विचार दृढ होणे अन् आध्‍यात्मिक त्रास न्‍यून होणे

‘मी धर्मप्रचाराची सेवा करत असतांना माझ्‍याकडून काही चुका झाल्‍या. इतरांनी माझ्‍या चुका लक्षात आणून दिल्‍यावर मला त्रास देणार्‍या सूक्ष्मातील अनिष्‍ट शक्‍तीला त्रास व्‍हायचा. त्‍या काळात सद़्‍गुरु अनुराधा वाडेकर यांनी मला सत्‌मध्‍ये रहाण्‍यासाठी सतत साहाय्‍य केले. त्‍यांनी केलेल्‍या प्रीतीमुळे मला साधनेचे प्रयत्न करता आले. माझा आध्‍यात्मिक त्रास न्‍यून होण्‍यासाठी मला ६ घंटे नामजपादी उपाय करण्‍यास सांगण्‍यात आले होते. तेव्‍हा त्‍यांनी मला उपाय करण्‍यासाठी देवद, पनवेल येथील सनातनच्‍या आश्रमात जाण्‍यास सांगितले. तिथे गेल्‍यावर आश्रमातील चैतन्‍यामुळे माझ्‍या मनातील सकारात्‍मक विचार वाढले आणि ‘स्‍वतःला पालटायचेच’, असा विचार दृढ झाला. आता माझा आध्‍यात्मिक त्रास न्‍यून झाल्‍याने मला केवळ २ घंटे नामजपादी उपाय करायला सांगितले आहेत.

सद्गुरु राजेंद्र शिंदे

२. सद़्‍गुरु राजेंद्र शिंदे यांनी शरणागतीविषयी सांगितलेली प्रार्थना केल्‍यावर नकारात्‍मक विचारांवर मात करायला जमणे

त्‍या काळात मी सद़्‍गुरु राजेंद्र शिंदे यांनी सांगितलेली ‘हे श्रीकृष्‍णा, माझा अहंभाव पूर्णपणे नष्‍ट कर. माझा पदोपदी अपमान झाला, तरी चालेल; पण मला तुझ्‍या चरणांजवळ अखंड रहायचे आहे’, अशी प्रार्थना करत असे. या प्रार्थनेमुळे मला बळ मिळून नकारात्‍मक विचारांवर मात करणे जमू लागले.

पू. (सौ.) अश्विनी पवार

३. पू. (सौ.) अश्‍विनी पवार यांना व्‍यष्‍टी साधनेचा आढावा द्यायला आरंभ केल्‍यापासून स्‍वभावदोष निर्मूलन आणि भाववृद्धी यांसाठी प्रयत्न होणे अन् साधना करण्‍याविषयी मनाचा दृढ निश्‍चय होणे

१ वर्षापूर्वी मी देवद आश्रमात आले. तेव्‍हापासून माझी मनापासून साधना होऊ लागली. पू. (सौ.) अश्‍विनी पवार यांनी मला प्रतिदिन व्‍यष्‍टी साधनेचा आढावा द्यायला सांगितला. त्‍यामुळे माझे ‘नकारात्‍मक विचार करणे, पूर्वग्रह असणे आणि राग येणे’, या स्‍वभावदोषांच्‍या निर्मूलनासाठी प्रयत्न होऊ लागले. माझ्‍याकडून देवाच्‍या चरणी क्षमायाचना होऊ लागली. भाववृद्धी सत्‍संगामुळे माझ्‍याकडून भाववृद्धीचे प्रयत्न होऊ लागले. त्‍यामुळे माझ्‍या मनाचा ‘मला साधना करायची आहे’, असा दृढ निश्‍चय झाला. खरेतर संतांचे दर्शन आणि त्‍यांची कृपादृष्‍टी यांमुळेच माझ्‍यात हा पालट झाला. यासाठी मी त्‍यांच्‍या चरणी कृतज्ञता व्‍यक्‍त करते.

४. स्‍वभावदोष निर्मूलनासाठी प्रयत्न केल्‍यावर स्‍वतःमध्‍ये झालेले सकारात्‍मक पालट

सौ. विमल गरुड

४ अ. अपेक्षा न्‍यून होऊन नातेवाइकांमध्‍ये मिळून-मिसळून रहाता येणे : पूर्वी मी इतरांकडून पुष्‍कळ अपेक्षा करायचे. त्‍यामुळे अपेक्षा पूर्ण झाल्‍या नाहीत, तर मला राग येत असे आणि मी ८ ते १० दिवस अबोला धरत होते. आता मी अपेक्षा न्‍यून करण्‍यासाठी प्रयत्न करते. राग आला, तरी तो फार काळ टिकत नाही. मी लगेचच इतरांशी बोलण्‍याचा प्रयत्न करते. आता मी नातेवाइकांमध्‍येही मिळून-मिसळून रहाते.

४ आ. देवाला प्रार्थना केल्‍यावर नकारात्‍मक विचारांवर मात करता येणे : पूर्वी ‘माझ्‍या मनात येणारे अयोग्‍य विचार माझेच आहेत’, असा विचार करून मी त्‍याच विचारांत रहात होते. आता माझ्‍या मनात कधी अयोग्‍य विचार आला, तर ‘वाईट शक्‍ती माझ्‍या मनात अयोग्‍य विचार घालत आहेत’, हे लक्षात येते. तेव्‍हा मी देवाला शरणागतीने प्रार्थना करून त्‍या अयोग्‍य विचारांवर मात करते.

४ इ. शिकण्‍याच्‍या स्‍थितीत रहाणे : पूर्वी एखादा प्रसंग घडला, तर मी एकटी राहून स्‍वतःला त्रास करून घेत होते आणि मी नकारात्‍मक विचार करत असे. आता मी शिकण्‍याच्‍या स्‍थितीत राहून ‘त्‍या प्रसंगात मी कुठे न्‍यून पडले ?’, याचे चिंतन करून देवाकडे क्षमायाचना करते.

४ ई. मनमोकळेपणाने बोलणे : पूर्वी मनातील अयोग्‍य विचारप्रक्रिया न सांगितल्‍याने मी त्‍याच स्‍थितीत बराच वेळ रहात होते. मी हसतमुख न रहाता नेहमी तणावाच्‍या स्‍थितीत असे. आता मी माझ्‍या मनाची अयोग्‍य विचारप्रक्रिया मनमोकळेपणाने सांगते. त्‍यामुळे मला त्‍यातून बाहेर पडण्‍यास साहाय्‍य होते आणि आता मी हसतमुख रहाण्‍याचाही प्रयत्न करते. पूर्वी एखाद्या प्रसंगाविषयी संतांशी बोलतांना मला भीती वाटत असे. आता मी संतांशी मनमोकळेपणाने बोलते आणि त्‍यांनी सांगितलेले प्रयत्न करून त्‍यांना साधनेचा आढावा देते.

४ उ. इतरांचा विचार करणे : पूर्वी माझ्‍याकडून ‘स्‍व’चा विचार अधिक प्रमाणात केला जात होता. आता मी इतरांचा विचार करण्‍याचा प्रयत्न करते.

४ ऊ. भाववृद्धी सत्‍संगात सांगितलेल्‍या सूत्रांनुसार कृती केल्‍यावर आनंद मिळून साधनेची गोडी लागणे : पूर्वी मी भाववृद्धी सत्‍संगातील सूत्रांनुसार कृती करत नव्‍हते. आता भाववृद्धी सत्‍संगातील सूत्रांनुसार कृती केल्‍यामुळे मला आनंद मिळू लागला आहे. त्‍यामुळे मला साधनेची गोडी लागली आहे. पूर्वी कोणत्‍याही प्रसंगात मी देवाचे साहाय्‍य घेत नव्‍हते. तेव्‍हा ‘मला पुष्‍कळ सेवा येतात आणि मलाच त्‍या सेवा कराव्‍या लागतात’, या कर्तेपणाच्‍या विचारामुळे माझ्‍या मनावर ताण येत होता. आता पुष्‍कळ सेवा आल्‍या, तरी लगेचच मी देवाला शरण जाऊन प्रार्थना करते आणि त्‍या सेवा साधकांमध्‍ये विभागून ‘देवच करवून घेणार आहे’, असा भाव ठेवते. त्‍यामुळे सेवा केल्‍यावर मला आनंद मिळतो.’

– सौ. विमल गरुड, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२१.९.२०१९)

• वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
• आध्यात्मिक त्रास :
याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.
• सूक्ष्म :
व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
• या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक