प्रेमळ आणि तळमळीने व्यष्टी साधना अन् समष्टी साधना करणार्‍या कुडाळ सेवाकेंद्रातील श्रीमती वैशाली विजयकुमार पारकर (वय ७५ वर्षे) !

‘चैत्र शुक्ल एकादशी (८.४.२०२५) या दिवशी श्रीमती वैशाली विजयकुमार पारकर यांना ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त त्यांचा ऐंद्री शांती विधी (व्यक्तीने ७५ व्या वर्षात पदार्पण केल्यावर तिचा ‘ऐंद्री शांती विधी’ करतात.) होत आहे. त्यानिमित्त त्यांची मुले आणि साधक यांच्या लक्षात आलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत. 

श्रीमती वैशाली पारकर

श्रीमती वैशाली विजयकुमार पारकर यांना ७५ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने नमस्कार !

१. सौ. भक्ती उपेंद्र महाजन (श्रीमती पारकर यांची मुलगी) लांजा, रत्नागिरी आणि श्री. विशाल विजयकुमार पारकर  (श्रीमती पारकर यांचा मुलगा), कणकवली, सिंधुदुर्ग.

१ अ. साधनेत आल्यापासून व्यष्टी साधनेचे नियमित प्रयत्न करणे : ‘आमची आई सनातन संस्थेच्या संपर्कात आल्यावर घरातील सर्व कामे करून आणि शाळेत नोकरी करून नियमित सेवा करत असे. गुरुदेवांनी जे जे नामजप करायला सांगितले, ते नामजप सांगितल्याप्रमाणे पूर्ण करण्यासाठी ती नियमित प्रयत्न करत होती. आता ती वयाच्या ७५ व्या वर्षीही व्यष्टी साधनेचे सर्व प्रयत्न नियमित करते. तिला रात्री झोपायला कितीही उशीर झाला, तरीही ती दुसर्‍या दिवशी सेवेसाठी नियोजित वेळेत उठते.

सौ. भक्ती महाजन

१ आ. अतिशय गंभीर आजारातून गुरुदेवांच्या कृपेने ठीक होणे : मी (सौ. भक्ती) तिसर्‍या इयत्तेत शिकत असतांना आईला मूत्रपिंडाशी संबंधित पुष्कळ त्रास झाला होता. तिला लघवी होत नव्हती. स्थानिक आधुनिक वैद्यांनी ‘तिची दोन्ही मूत्रपिंडे निकामी झाली आहेत’, असे सांगितले. आधुनिक वैद्यांनी तिला ८ दिवस रुग्णालयात ठेवले. तेव्हा आईच्या पूर्ण शरिरावर सूज होती. ‘आता ती फार काळ जगू शकणार नाही’, अशा विचाराने आमचे सर्व नातेवाईक तिला भेटून गेले. त्या वेळी आधुनिक वैद्य संजय सामंत आणि प्रसारातील काही साधक यांनी आईला मुंबई येथील सेवाकेंद्रात नेण्याचे आणि तेथून टाटा रुग्णालयात नेण्याचे ठरवले. त्याप्रमाणे साधक आणि माझे बाबा (कै. विजयकुमार गणपत पारकर, आध्यात्मिक पातळी ६६ टक्के) माझ्या आईला रुग्णवाहिकेतून घेऊन निघाले. तेव्हा ते प्रवासात अर्ध्या वाटेत असतांना आईला लघवी झाली आणि आई काही प्रमाणात बरी झाली. त्या वेळी परात्पर गुरु डॉ. आठवले मुंबई सेवाकेंद्रात होते. तिथे हे सर्व साधक जेवायला बसले. त्या वेळी आमच्या आई-बाबांना पिण्यासाठी ज्या भांड्यात पाणी ठेवले होते, ते पाण्याचे पेले गुरुदेवांनी रिकामे करायला सांगितले आणि त्यांनी स्वतःजवळच्या भांड्यातील पाणी त्या पेल्यांत घालायला सांगितले. नंतर आई टाटा रुग्णालयात गेली. तेव्हा तिच्या वैद्यकीय चाचण्यांचे अहवाल सामान्य आले आणि आईची प्रकृतीही पूर्ववत् झाली. आई-बाबा घरी आल्यावर बाबांनी आमच्या आईचे अहवाल स्थानिक आधुनिक वैद्यांना दाखवले. तेव्हा त्या आधुनिक वैद्यांना आश्चर्य वाटले. त्यांनी आमच्या बाबांना सांगितले, ‘‘तुमच्या गुरूंच्या कृपेमुळेच हे शक्य झाले.’’

१ इ. आमच्या बाबांचे निधन झाल्यानंतर आईने सनातनच्या आश्रमात राहून पूर्णवेळ साधना करण्याचा योग्य निर्णय घेतला आणि जीवनाचे कल्याण करून घेतले. 

१ ई. सतत कार्यरत असणे : आई तिच्या शाळेला सुटी असतांनाही कधीच नुसती बसून राहिली नाही. ती सतत काहीतरी काम करत असे. ती वयाच्या ७५ व्या वर्षीही कुडाळ सेवाकेंद्रात सेवारत आणि साधनारत आहे. तिला काही मासांपासून ‘व्हेरिकोज व्हेन्स’चा (पायांत रक्तप्रवाह सुरळीत होत नसल्याने पायांत वेदना होण्याचा) तीव्र त्रास होत आहे, तरीही ती स्वयंपाकघरातील सेवा करते.

१ उ. प्रेमभाव : आई सेवाकेंद्रातील प्रत्येक साधकालाच आवश्यक ते देण्यासाठी तत्पर असते. तिला ‘कुणी रुग्णाईत आहे’, असे समजल्यास तिला ठाऊक असलेले घरगुती औषध ती स्वतः बनवून देते.

१ ऊ. आईला काही मास रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात रहाण्याची संधी मिळाली. तेव्हा तिने या वयातही स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया (टीप ४) राबवण्याचा प्रयत्न केला.

श्री. विशाल पारकर

(टीप ४ : स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया – स्वतःमधील स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन करण्यासाठी प्रतिदिन स्वतःकडून झालेल्या अयोग्य कृती अन् विचार वहीत लिहून त्यापुढे योग्य कृती आणि विचार लिहिणे अन् दिवसातून १० ते १२ वेळा मनाला तशी सूचना देणे)

‘हे गुरुनाथा, तुझ्या चरणी येण्यासाठी धडपडणार्‍या या जिवाची तूच उत्तरोत्तर उन्नती करून घे’, अशी तुझ्या चरणी शरणागतभावाने प्रार्थना आहे.’

२. सौ. मंजुषा मनोज खाडये, सांगिर्डेवाडी, कुडाळ, सिंधुदुर्ग.

२ अ. साधनेसाठी साहाय्य करणे : ‘श्रीमती पारकरकाकू आणि त्यांचे यजमान यांनी मला साधनेच्या आरंभीच्या कालावधीत पुष्कळ साहाय्य केले. त्यांच्यामुळे मी माझे शिक्षण पूर्ण झाल्यावर पूर्णवेळ साधना करण्याचा निर्णय घेऊ शकले. माझ्या मनात साधनेच्या संदर्भात काही अडचणी आल्यास ते दोघे मला मार्गदर्शन करत असत.’

३. श्री. मनोजकुमार वसंत खाडये, सांगिर्डेवाडी, कुडाळ, सिंधुदुर्ग.

३ अ. प्रेमभाव : ‘एखाद्या घरातील वयोवृद्ध आई ज्याप्रमाणे आपली मुले आणि नातवंडे यांना आवडीचा स्वयंपाक बनवून खाऊ घालते, त्याप्रमाणे पारकरकाकू साधकांना प्रसाद म्हणून खाऊ देतात.’

४. श्री. संजय जोशी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. 

४ अ. प्रेमभाव : ‘वर्ष १९९९ मध्ये दैनिक ‘सनातन प्रभात’च्या गोवा-सिंधुदुर्ग आवृत्तीचे प्रकाशन चालू झाले. तेव्हा काकू शाळेत शिक्षिका होत्या. त्यांनी नोकरी करत असतांनाही प्रचार-प्रसारात भाग घेतला. दैनिक ‘सनातन प्रभात’चे वितरण करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात साधक मोठ्या संख्येने आले होते. तेव्हा काही साधकांच्या निवासाची सोय काकूंच्या कणकवली येथील घरी केली होती. त्या वेळी पारकर कुटुंबियांनी साधकांना कशाचीही उणीव भासू दिली नाही. काकू साधकांमध्ये गुरुरूप पाहून त्यांची सर्वतोपरी काळजी घेत असत.’

(लेखातील सर्व सूत्रांचा दिनांक : ४.४.२०२५)