सोलापूरचे वैभव असलेल्‍या सुप्रसिद्ध शिवयोगी श्री सिद्धरामेश्‍वर यात्रेचे स्‍वरूप आणि महत्त्व !

‘सोलापूर’ नाव पडण्‍यामागील इतिहास !

श्री सिद्धेश्‍वरलिखित शिलालेखानुसार सोलापूर परिसरास ‘सोन्‍नलगे’ असे संबोधले जायचे. कालांतराने सोन्‍नलगेचे ‘सोन्‍नलगी’ असे रूपांतर झाले. यादव वंशापर्यंत सोलापूरचे संबोधन ‘सोन्‍नलगी’ असे होते. मोहोळ तालुक्‍यातील कामती येथे सापडलेल्‍या शके १२३८ च्‍या संस्‍कृत शिलालेखानुसार सोलापूरनगरीला ‘सोनलपूर’ असे संबोधले जाते. सोलापूर भुईकोट गडात सापडलेल्‍या शिलालेखानुसार सोनलपूर, तर तिथल्‍याच दुसर्‍या एका भिंतीवर सापडलेल्‍या शिलालेखानुसार या नगरीचा उल्लेख ‘संदलपूर’ असा आहे. सोनलपूर, सोलपूर ते सोलापूर असा या नावाचा प्रवास आहे.

श्री सिद्धेश्‍वर महाराजांचा कार्य परिचय !

‘काय कवे कैलास’, म्‍हणजे ‘कर्मानेच कैलास प्राप्‍त होतो’, ही थोर शिकवण देणारे अवतारी पुरुष म्‍हणजे श्री सिद्धेश्‍वर महाराज ! १२ व्‍या शतकात सिद्धेश्‍वर महाराजांनी सोलापूर गाव वसवले. सामाजिक सुधारणा करतांना त्‍यांनी परिश्रमाला प्रतिष्‍ठा प्राप्‍त करून दिली. त्‍यांनी सामूहिक विवाह सोहळेही पार पाडले होते. पाण्‍याचे दुर्भिक्ष्य नष्‍ट करण्‍यासाठी सामूहिक श्रमातून तलावाची निर्मिती केली. विविध नद्यांतून पाणी आणून तलावात ओतले. सिद्धेश्‍वरांनी सोन्‍नलगीच्‍या पंचक्रोशीत ६८ लिंगांसह अष्‍टविनायक आणि अष्‍टभैरव यांची प्रतिष्‍ठापना केली. त्‍यांनी श्री बसवेश्‍वर यांची शिकवण आणि उपदेश यांचा प्रसार केला.

‘अड्ड (पालखी) यात्रा महोत्‍सव’ म्‍हणजेच ‘गड्डा यात्रा’ !

श्री सिद्धरामेश्‍वरांचे मंदिर

श्री सिद्धेश्‍वर यात्रेचा इतिहास कथन करतांना आख्‍यायिका सांगितली जाते. सिद्धेश्‍वर महाराज प्रतिदिन ध्‍यानधारणा करत, तेव्‍हा त्‍यांच्‍या साधनागृहाबाहेर सडासंमार्जन करून रांगोळी रेखाटली जात असे. ‘ही सेवा कोण करते ?’, याचा शोध लागत नसे. एके दिवशी सिद्धेश्‍वर महाराज साधनागृहातून लवकरच बाहेर आले असता सुंदर कुमारिका सडासंमार्जन करून रांगोळी घालत होती. महाराजांनी तिची विचारपूस केली, तेव्‍हा तिने स्‍वत: कुंभारकन्‍या असल्‍याचे सांगून त्‍यांच्‍यासमवेत विवाह करण्‍याची इच्‍छा व्‍यक्‍त केली. ब्रह्मचर्य जपायचे असल्‍याने महाराजांनी विवाहास नकार दिला; परंतु कुंभारकन्‍येचा हट्ट पहाता त्‍यांनी स्‍वत:च्‍या योगदंडासमवेत विवाह करण्‍यास अनुमती दिली. हाच प्रतिकात्‍मक विवाह सोहळा प्रतिवर्षी सिद्धेश्‍वर यात्रा म्‍हणून मकरसंक्रांतीच्‍या काळात भोगी, संक्रांती आणि किंक्रांती या ३ दिवसांत साजरा केला जातो.

यात्रेतील मानाचे ७ नंदीध्‍वज आणि ६८ शिवलिंगांना तेल अर्पण !

नंदीध्‍वज घेऊन निघाले भाविक श्री सिद्धेश्‍वराची भेट घेण्‍या…

‘गड्डा यात्रे’चे प्रमुख ७ नंदीध्‍वज आहेत. त्‍यांच्‍या सरावाचे ७ असे १४ अधिकृत आणि मान्‍यता दिलेले नंदीध्‍वज आहेत. वर्षभर हे नंदीध्‍वज विशेष निगराणीत ठेवलेले असतात. पहिला नंदीध्‍वज श्री सिद्धेश्‍वर देवस्‍थानचा असून तो २८ फूट उंच आहे. दुसरा कसब्‍यातील देशमुखांचा, तिसरा लिंगायत-माळी समाजाचा, चौथा आणि पाचवा विश्‍व ब्राह्मण समाजाचा, सहावा आणि सातवा मातंग समाजाचा असतो. भोगीच्‍या आदल्‍या दिवशी सोलापूर शहर परिसरातील श्री सिद्धरामेश्‍वरांनी स्‍थापन केलेल्‍या ६८ शिवलिंगांना तेल अर्पण केले जाते. या वेळी मानाच्‍या नंदीध्‍वजांची मिरवणूक शहरातून काढली जाते. त्‍यासाठी विशेष पोशाख परिधान केलेला असतो. त्‍या पोशाखाला ‘बाराबंदी’ म्‍हणतात. हा सोहळा दिवसभर चालतो. नंदीध्‍वज घेऊन चालणे, हे अत्‍यंत कठीण काम आहे; कारण उन्‍हात अनवाणी पायाने चालावे लागते. हे उंच नंदीध्‍वज घेऊन चालण्‍यासाठी किमान १ मास आधीपासून सराव केला जातो.

भोगीच्‍या दिवशी पार पडणारा अक्षता सोहळा !

भोगीच्‍या दिवशी सकाळी हिरेहब्‍बू वाड्यातून नंदीध्‍वज मार्गक्रमण करत ते श्री सिद्धेश्‍वर मंदिरात येतात. त्‍यानंतर संमती कट्टामार्गे शहरातील विविध भागांतून मल्लिकार्जुन मंदिरापर्यंतचा १३ किलोमीटरचा प्रवास १० ते ११ घंट्यांत पूर्ण करतात. ७ नंदीध्‍वजांमधील पहिला नंदीध्‍वज २८ फूट उंच आहे. त्‍यास अनुमाने १० फुटांपर्यंत लिंबू आणि खोबर्‍याच्‍या वाट्या भक्‍तांकडून बांधल्‍या जातात. नंदीध्‍वज हे विवाहासाठी प्रतिकात्‍मक वर आणि वधू मानले जातात. भोगीच्‍या दिवशी अक्षता सोहळा पार पडतो. हिरेहब्‍बू यांच्‍या घरापासून निघलेली मिरवणूक दाते गणपतिपासून सिद्धेश्‍वर प्रशालामार्गे दुपारी १ वाजता संमती कट्टयावर सातही नंदीध्‍वजांसह येताच ‘सिद्धेश्‍वर महाराज की जय&हर्र बोला हर्र’चा जयघोष होतो. त्‍यानंतर योगदंडाच्‍या साक्षीने सुगडीपूजा आणि गंगापूजन करून १२ मडक्‍यांमध्‍ये पाणी भरून त्‍यासमोर पानाचा विडा ठेवण्‍यात येतो. कुंभार घराण्‍यातील मानकर यांना हा विडा दिला जातो. त्‍यानंतर ८ ते १० मिनिटांच्‍या अक्षता सोहळ्‍यास प्रारंभ होतो. कन्‍नड भाषेतून ५ वेळा संमती वाचन केले जाते. प्रत्‍येक कडव्‍याच्‍या शेवटी ‘सत्‍यम्&सत्‍यम्’ असे उच्‍चारण होताच लाखो भाविक त्‍या घोषात अक्षतांचा वर्षाव करतात. या वेळी तुतारी, नगार्‍याचा निनाद केला जातो. त्‍यानंतर नंदीध्‍वज अमृतलिंगाजवळ येतात. अत्‍यंत नयनरम्‍य अशा या सोहळ्‍याचे वातावरण ‘एकदा भक्‍तलिंग हर्र बोला हर्र’ या उद़्‍घोषांनी भक्‍तीमय झालेले असते.

मकरसंक्रांतीच्‍या दिवशी होमहवन विधी !

योगदंडाशी विवाह केल्‍यानंतर कुंभारकन्‍या सती गेली. होमविधीच्‍या म्‍हणजे संक्रांतीच्‍या दिवशी मंदिराच्‍या समोरील होम मैदानावर होमहवन केला जातो.

नंदीध्‍वजांच्‍या वस्‍त्र विसर्जनाच्‍या (कप्‍पडकळी) कार्यक्रमाने यात्रेची सांगता !

किंक्रांतीच्‍या दिवशी होम मैदानावर शोभेचे दारूकाम केले जाते. हा सोहळा पहाण्‍यासाठी आबालवृद्ध वेगवेगळ्‍या गावांतून उपस्‍थित रहातात. किंक्रांतीनंतर दुसर्‍या दिवशी श्री मल्लिकार्जुन मंदिरात नंदीध्‍वजांच्‍या वस्‍त्र विसर्जनाच्‍या (कप्‍पडकळी) कार्यक्रमाने यात्रेतील धार्मिक कार्यक्रमाची सांगता करण्‍यात येते.

श्री सिद्धरामेश्‍वर आणि प्रत्‍यक्ष गुरुभेट !

श्री सिद्धरामेश्‍वर वयाच्‍या १५ व्‍या वर्षांपर्यंत एकही शब्‍द बोलले नव्‍हते. ते त्‍यांच्‍या सवंगड्यांसह गुरे राखण्‍यास जात असत. एके दिवशी गुरे राखण्‍यास गेल्‍यानंतर श्रीशैलहून मल्लिकार्जुन एका जंगमाच्‍या रूपात सिद्धरामेश्‍वर यांच्‍या समोर आले. ‘हे जंगम साक्षात् परमेश्‍वर आहेत’, हे सिद्धरामेश्‍वरांनी त्‍वरित ओळखताच मल्लिकार्जुनांनी तेथेच त्‍यांना प्रत्‍यक्ष दर्शन दिले. त्‍या वेळी मल्लिकार्जुनांनी स्‍वत: श्रीशैल येथे रहात असून माझे नाव ‘मल्लय्‍या’ आहे, असे सांगितले. मल्लय्‍या यांनी सिद्धरामेश्‍वरांना दहीभात खाण्‍यासाठी मागितला; मात्र त्‍या दिवशी सिद्धरामेश्‍वर दहीभात आणण्‍यास विसरले होते. त्‍या वेळी ‘‘मी घरी जाऊन दहीभात घेऊन येतो, तुम्‍ही येथेच थांबावे’’, असे सिद्धरामेश्‍वरांनी सांगितले. घरी जाऊन आईला दहीभात देण्‍यास सांगितले. आपला मुलगा प्रथमच बोलला, हे पाहून आईला अत्‍यानंद झाला. सिद्धरामेश्‍वर दहीभात घेऊन मल्लय्‍यांकडे गेले; मात्र ते तेथे नाहीत, हे पहाताच त्‍यांचा शोध घेऊ लागले. त्‍यानंतर ते मल्लय्‍यांच्‍या शोधात रडत रडत श्रीशैलकडे निघाले. श्रीशैल पर्वतावर ‘मल्लय्‍या, मल्लय्‍या’ अशी हाक मारत व्‍याकुळ होऊन त्‍यांचा शोध घेऊ लागले. शेवटी निराश होऊन एका उंच पर्वत कड्यावरून खोल दरीत प्राणत्‍याग करण्‍याच्‍या निश्‍चयाने उडी घेतली, तोच परमेश्‍वराने अंधातरी उचलून पर्वतावर आणून त्‍यांना प्रत्‍यक्ष दर्शन दिले. परमेश्‍वराने स्‍वत: गुरुरुपात त्‍यांना उपदेश केला.