म्हादई पाणीतंट्यावर लवकरच उपाययोजना  करू ! – केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्र सिंह शेखावत

पणजी, १२ जानेवारी (वार्ता.) – गोवा आणि कर्नाटक राज्यांमधील म्हादई नदीच्या पाण्याविषयीच्या तंट्यावर लवकरच उपाययोजना करू, असे आश्वासन केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी मुख्यमंत्र्याच्या नेतृत्वाखाली त्यांची भेट घेतलेल्या प्रतिनिधी मंडळाला दिले आहे. ते म्हणाले, ‘‘म्हादईच्या पाणी वाटपासंबंधी आमच्यामध्ये विचारांची देवाणघेवाण झाली आहे. यावर नक्कीच उपाययोजना करण्यात येईल.’’

तत्पूर्वी राज्याच्या प्रतिनिधी मंडळाने म्हादई प्रश्नाविषयी चर्चा करण्यासाठी देहली येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. या प्रतिनिधी मंडळामध्ये केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक, राज्यसभेचे खासदार विनय तेंडुलकर, जलस्रोतमंत्री सुभाष शिरोडकर, वनमंत्री विश्वजित राणे, सभापती रमेश तवडकर, वीजमंत्री सुदिन ढवळीकर, मंत्री मावीन गुदिन्हो, मंत्री नीलेश काब्राल, आमदार डॉ. रमाकांत शेट्ये या नेत्यांचा समावेश आहे.

या संदर्भात मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले, ‘‘आम्ही अमित शहा यांना भेटून त्यांना म्हादई पाणी व्यवस्थापनाविषयी अधिकृत मंडळ स्थापन करण्याची, तसेच जलस्रोत खात्याकडून संमत करण्यात आलेला सविस्तर प्रकल्प अहवाल मागे घेण्याची विनंती केली आहे.’’ आरोग्यमंत्री विश्वजित राणे म्हणाले, ‘‘म्हादई प्रश्नाविषयी आम्ही आमचे विचार गृहमंत्र्यांकडे मांडले आणि सद्यःस्थितीची त्यांना कल्पना दिली.’’

गोवा सरकारने म्हादई केंद्रीय जलस्रोत खात्याकडून कर्नाटक सरकारच्या सविस्तर प्रकल्प अहवालाला दिलेल्या संमतीला आक्षेप घेतला आहे.  पत्रकारांनी मुख्यमंत्री डॉ. सावंत यांना ‘केंद्राकडून हा प्रश्न कधीपर्यंत सोडवला जाईल ?’, असे विचारले असता डॉ. सावंत म्हणाले, ‘‘हा घाईघाईत सोडवण्याचा प्रश्न नाही. आम्हाला विश्वास आहे की, गोव्यावर अन्याय होणार नाही. आम्ही हा लढा जिंकू. ’’

♦ ‘म्हादई जलवाटप तंटा’ या संदर्भातील आजपर्यंतच्या घडामोडी पाहण्यासाठी क्लिक करा ♦