गोव्यात आता ऑनलाईन पैसे भरून जन्म-मृत्यूचे प्रमाणपत्र मिळणार

पणजी, १२ जानेवारी (वार्ता.) – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी नियोजन, सांख्यिकी आणि मूल्यमापन संचालनालयाचे ‘वेब पोर्टल’ चालू केले असून यावर लोकांना ऑनलाईन पद्धतीने जन्म आणि मृत्यू यांची प्रमाणपत्रे शोधता येतील, तसेच ही प्रमाणपत्रे डाऊनलोड करता येतील. ऑनलाईन पद्धतीने २५ रुपये भरल्यानंतर ही प्रमाणपत्रे उपलब्ध होणार आहेत. या पोर्टलवर आतापर्यंत जन्म आणि मृत्यू यांचे १८ लाख तपशील अपलोड करण्यात आले असल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी दिली आहे.

या अभियानाच्या माध्यमातून मोदी सरकारचा देशाला माहिती तंत्रज्ञानावर आधारित सशक्त अर्थसत्ता बनवण्याचा प्रयास आहे. नागरिकांना सरकारी सुविधांचा आणि योजनांचा लाभ घेता यावा, यासाठी डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर आवश्यक आहे. या संदर्भात मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले, ‘‘सरकारच्या या निर्णयामुळे नगरपालिका, गोवा वैद्यकीय महाविद्यालय आणि इतर कार्यालये यांवरचा दबाव अल्प  होणार आहे.’’