(म्हणे) ‘मनुस्मृति आणि रामचरितमानस द्वेष पसरवत असल्याने त्यांना जाळून टाका !  

बिहारचे शिक्षणमंत्री चंद्रशेखर यांचे हिंदुद्वेषी विधान !

बिहारचे शिक्षणमंत्री चंद्रशेखर

पाटलीपुत्र (बिहार) – ‘मनुस्मृति’, ‘रामचरितमानस’ आणि ‘बंच ऑफ थॉट्स’ (माजी सरसंघचालक पू. गोळवलकरगुरुजी यांनी लिहिलेले पुस्तक) यांसारखे ग्रंथ जाळून टाकले पाहिजेत. या ग्रंथांनी द्वेष पसरवण्याचे काम केले आहे. लोकांना अनेक पिढ्या मागे रेटण्याचे काम केले, असे फुकाचे वक्तव्य बिहारचे शिक्षणमंत्री चंद्रशेखर यांनी केले असून ते त्यांच्या विधानावर ठाम आहेत. त्यांच्या या विधानाचा हिंदु संघटना, संत, मंहंत आदींकडून विरोध करण्यात येत आहे. अयोध्या येथील संत जगद्गुरु  परमहंस आचार्य यांनी चंद्रशेखर यांची जीभ छाटण्यासाठी १० कोटी रुपयांचे पारितोषिक घोषित केले आहे.

(म्हणे) ‘या ग्रंथांनी ८५ टक्के लोकांना अनेक पिढ्या मागे नेले !’

शिक्षणमंत्री चंद्रशेखर यांनी ११ जानेवारी या दिवशी नालंदा येथील मुक्त विद्यापिठाच्या १५ व्या दीक्षांत समारभांत म्हटले की, देशातल्या जातींनी समाज जोडण्याचे नाही, तर तोडण्याचे काम केले आहे. याममध्ये प्रामुख्याने मनुस्मृति, गोस्वामी तुलसीदास रचित रामचरितमानस आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरसंघचालक माधव गोळवलकर लिखित ‘बंच ऑफ थॉट्स’ या ग्रंथांनी ८५ टक्के लोकांना अनेक पिढ्या मागे नेण्याचे काम केले. या ग्रंथांमुळे देशाचे राष्ट्रपती आणि मुख्यमंत्री यांना मंदिरांमध्येही जाण्यापासून रोखले गेले. हे ग्रंथ द्वेषाची पेरणी करतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी या ग्रंथाचा विरोध केला. त्यांनी मनुस्मृतीला जाळण्याचे काम केले. तसेच रामचरितमानस या ग्रंथावरही डॉ. आंबेडकरांनी टीका केली आहे. ‘शिक्षणाचा अधिकार मिळाल्यानंतर खालच्या जातीतील लोक ‘विषारी’ होतात’, असे या ग्रंथांत म्हटले आहे. एका युगात मनुस्मृति, दुसर्‍या युगात रामचरितमानस तथा तिसर्‍या युगात ‘बंच ऑफ थॉट्स’ने समाजात फक्त द्वेषच पसरवला. कोणताही देश द्वेषाने नाही, तर प्रेमाने महान बनू शकतो.

चंद्रशेखर यांची जीभ छाटणार्‍यास १० कोटी रुपयांचे पारितोषिक देणार

जगद्गुरु परमहंस आचार्य

चंद्रशेखर यांच्या वक्तव्यानंतर अयोध्येमधील संत जगद्गुरु परमहंस आचार्य यांनी टीका करतांना म्हटले की, चंद्रशेखर यांच्या वक्तव्यामुळे समस्त देशातील हिंदूंच्या भावनांना तडा गेला आहे. हा सनातन्यांचा अपमान आहे. या वक्तव्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे. तसेच एका आठवड्याच्या आत त्यांनी क्षमा न मागितल्यास त्यांची जीभ छाटणार्‍याला आम्ही १० कोटी रुपयांचे पारितोषिक देण्याची घोषणा करू, असे आवाहन त्यांनी केले.

भाजपाकडूनही निषेध

भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते शहजादा पुनावाला यांनी ट्वीट करत चंद्रशेखर यांचा निषेध केला. ते म्हणाले की, बिहारचे शिक्षणमंत्री रामचरितमानस ग्रंथाला द्वेष पसरवणारा ग्रंथ म्हणतात. काही दिवसांपूर्वीच राष्ट्रीय जनता दलाचे जगदानंद सिंह यांनी श्रीरामजन्मभूमीला द्वेषाची भूमी म्हटले होते. हा योगायोग नाही का? हे सर्व मतदारांना आकर्षित करण्यासाठी चालू आहे. अशांवर कारवाई कधी होणार ?

संपादकीय भूमिका

  • एका राज्याचे शिक्षणमंत्रीच असे म्हणत असतील, तर राज्यातील शिक्षण कसे असणार ? याची कल्पना करता येत नाही !
  • एखादा विचार जाळल्याने तो कधीही नष्ट होत नाही. ‘एखादा विचार चुकीचा आहे’, हे सांगण्यासाठी ‘योग्य विचार काय आहे ?’, हे सांगणे आवश्यक असते; मात्र ‘मनुस्मृति, रामचरितमानस यांना चुकीचे आहे’, असे ठामपणे सांगणारे ‘त्यात काय चूक आहे आणि योग्य विचार काय असायला हवे’, हे मांडायचे टाळतात !
  • या दोन्ही ग्रंथांवर कोट्यवधी लोकांची श्रद्धा आहे. ही श्रद्धा चंद्रशेखर यांच्यासारखी लोक कशी नष्ट करू शकणार ?