गोवा : काणकोण रेल्वेस्थानकावर लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्यांच्या थांब्यासाठी जागरूक काणकोणकरांची आंदोलनाची चेतावणी

जागरूक काणकोणकर, ज्येष्ठ नागरिक मंच, व्हिजन ॲण्ड मिशन संघटनेचे सदस्य, जनसेना आदींची झालेली बैठक

काणकोण,१० जानेवारी (वार्ता.) – येथील कोकण रेल्वेस्थानकावर लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्या थांबवण्याच्या मागणीसाठी काणकोण येथील जागरूक काणकोणकर, ज्येष्ठ नागरिक मंच, व्हिजन ॲण्ड मिशन संघटनेचे सदस्य, जनसेना आदींची नुकतीच एक बैठक झाली. या बैठकीत १३ जानेवारीपासून मागणीसाठी तीव्र आंदोलन छेडण्याची चेतावणी देण्यात आली आहे.

बैठकीत कृती समितीचे समन्वयक जनार्दन भंडारी यांनी ‘प्रसंगी काणकोण बंदही पुकारला जाईल’, असे म्हटले आहे. काणकोणच्या लोकांची ही दीर्घकाळ प्रलंबित मागणी असून रेल्वे अधिकारी आणि लोकप्रतिनिधी याकडे दुर्लक्ष करत आहेत, असेही मत भंडारी यांनी व्यक्त केले. ‘आंदोलनाच्या वेळी कोणतीही अनुचित घटना घडल्यास किंवा ज्येष्ठ (वयोवृद्ध) नागरिकांच्या आरोग्याच्या समस्या उद्भवल्यास त्याला केवळ शासन उत्तरदायी असेल,’, अशीही चेतावणी देण्यात आली आहे.

काणकोणच्या जेष्ठ नागरिकांनी ही समस्या शासनाच्या आणि रेल्वे प्राधिकरणाच्या निदर्शनास आणून देण्यासाठी आवश्यक पत्रव्यवहार केलेला आहे. या स्थानकावर लांब पल्ल्याच्या गाड्या थांबवणे किती आवश्यक आहे ? याविषयी माहितीही दिलेली आहे. या संदर्भात जानेवारी या दिवशी एक बैठक झाली होती आणि सदस्य त्यांच्या मागणीची स्थिती जाणून घेण्यासाठी पुन्हा काणकोण रेल्वेस्थानक अधिकार्‍यांना भेटायला गेले होते; परंतु त्यांनी सांगितले की, त्यांना उच्च अधिकार्‍यांकडून कोणतेही आदेश मिळालेले नाहीत.

१३ जानेवारीपासून विविध स्वरूपाची आंदोलने चालू करण्याचा सामूहिक निर्धार करण्यात आला आहे. परिस्थितीने मागणी केल्यास ‘काणकोण बंद’ची हाक देण्यास मागेपुढे पहाणार नाही. त्यामुळे अधिकार्‍यांनी आमची मागणी लवकरात लवकर पूर्ण करावी, अन्यथा सर्व प्रकारच्या आंदोलनाला सामोरे जाण्याची सिद्धता ठेवावी, असे भंडारी म्हणाले.