श्रीगुरूंच्‍या कृपेमुळे साधकाला आलेल्‍या विविध अनुभूती

‘२८.५.२०२२ या दिवशी श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळकाकू यांच्‍याशी माझी भेट झाली. त्‍या वेळी मला येत असलेले काही अनुभव मी त्‍यांना सांगितले. ‘भगवंत कसा अनुभूतींतून शिकवत असतो ?’, हे समजून घेण्‍याच्‍या दृष्‍टीने त्‍यांनी मला ते लिहून देण्‍यास सांगितले. त्‍या अनुभूती येथे देत आहे.

श्री. धैवत वाघमारे

१. आध्‍यात्मिक त्रासामुळे सेवा करणे जमत नसतांना गुरूंच्‍या कृपेमुळे सेवेच्‍या ठिकाणी जावेसे वाटणे आणि तेथे साधकांना आलेल्‍या अडचणी सोडवण्‍याच्‍या माध्‍यमातून गुरूंनी चैतन्‍य प्रदान करणे

मला तीव्र आध्‍यात्मिक त्रास आहे. त्‍यामुळे मला सेवा करण्‍याचा कंटाळा येतो. ‘सेवा करणे जमत नाही’, या विचाराने मी खोलीतच राहिलो, तर काही वेळाने मला अकस्‍मात् खोलीतून बाहेर यावेसे वाटते. खोलीतून बाहेर आल्‍यावर मी आश्रम परिसरात फिरतो. मी ठरवून अमुक एखाद्या ठिकाणी जात नाही. जिकडे पाय वळतील तिकडे मी जातो. तसे गेल्‍यावर कुणीतरी साधक ज्‍याला काहीतरी अडचण आलेली असते, तो माझे साहाय्‍य मागतो. त्‍या वेळी त्‍याची अडचण मी सोडवतो. त्‍या वेळी ‘गुरुकृपेमुळे मला तिथे जावेसे वाटले आणि त्‍या साधकाची अडचण गुरूंनीच सोडवली’, अशी मला जाणीव होते. असे माझ्‍यासमवेत प्रतिदिन घडत असते. श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) गाडगीळकाकू यांनी याविषयी सांगितले, ‘हे तळमळीमुळे घडते.’ त्‍या साधकांच्‍या अडचणी सोडवण्‍याच्‍या माध्‍यमातून गुरु मला चैतन्‍य प्रदान करतात आणि मला कार्यरत ठेवतात, यासाठी मी गुरूंच्‍या चरणी कृतज्ञ आहे.

२. श्रीगुरूंच्‍या कृपेमुळे सूक्ष्मातील घडामोडी घडत असल्‍याचे मनाला जाणवणे आणि सूक्ष्मातून तसे घडल्‍याची प्रचीती येणे

रामनाथी, गोवा येथील सनातन संस्‍थेच्‍या आश्रमात महर्षींच्‍या आज्ञेनुसार यज्ञयाग केले जातात. याग चालू असतांना मी आध्‍यात्मिक स्‍तरावरील उपायांसाठी त्‍या ठिकाणी बसतो. त्‍या वेळी माझ्‍या मनात काही विचार येतात, उदा. एका यागाच्‍या वेळी यज्ञकुंडातून काळा धूर बाहेर येतांना दिसला. तेव्‍हा माझ्‍या मनात विचार आला, ‘अनिष्‍ट शक्‍ती त्‍या यज्ञकुंडात उड्या मारून यज्ञाचा विध्‍वंस करण्‍याचा प्रयत्न करत आहेत आणि त्‍यामुळे यज्ञकुंडातून येणारा धूर काळ्‍या रंगाचा आहे.’ हे मी जेव्‍हा सूक्ष्म ज्ञानप्राप्‍तकर्त्‍या साधिकेला सांगितले, तेव्‍हा तिनेही तसे दृश्‍य तिला दिसल्‍याचे सांगितले. अशा सूक्ष्मातील घडामोडी घडत असल्‍याचे मला बर्‍याचदा जाणवते आणि प्रत्‍यक्षातही सूक्ष्मातून तसे घडल्‍याची प्रचीती येते. ‘श्रीगुरूंच्‍या कृपेमुळे मला अशा अनुभूती येतात’, यासाठी मी गुरुचरणी कृतज्ञ आहे.

३. एका साधकासमवेत सेवा करण्‍याची संधी मिळाल्‍यावर २ – ३ दिवस पुष्‍कळ कृतज्ञता व्‍यक्‍त होणे आणि त्‍यामुळे मनाला समाधान लाभून तगमग न्‍यून होणे

मला एका साधकासमवेत सेवा करण्‍याची पुष्‍कळ इच्‍छा होती. एका प्रसंगी मला त्‍या साधकासमवेत एक सेवा करण्‍याची संधी मिळाली. एक-दीड घंटा आम्‍ही एकत्र सेवा केली. सेवा संपल्‍यावर मी खोलीत गेलो. तेव्‍हा मला त्‍या दीड घंट्यात घडलेले सर्व प्रसंग आठवू लागले. तेव्‍हा मला जाणीव झाली, ‘मी लाखो रुपये खर्च केले असते, तरी मला त्‍या साधकासमवेत ती सेवा करण्‍याची संधी मिळाली नसती. आज गुरूंच्‍या कृपेमुळे मला ती सेवा करण्‍याची संधी मिळाली.’ त्‍यानंतर मला श्रीगुरूंविषयी अपार कृतज्ञता वाटू लागली. २ – ३ दिवस ती सेवा करण्‍याची संधी मिळाली; म्‍हणून मी सतत कृतज्ञता व्‍यक्‍त करत होतो. त्‍यानंतर माझे मन पुष्‍कळ समाधानी झाले आणि मनाची तगमग न्‍यून झाली. पुन्‍हा त्‍या साधकाचा सहवास मिळण्‍याचा विचारही माझ्‍या मनातून नष्‍ट झाला. या प्रसंगावरून मला जाणीव झाली, ‘जेव्‍हा आपल्‍याला मनापासून कृतज्ञता वाटते, तेव्‍हा त्‍यातून गुरु आपल्‍याला समाधान देतात आणि आपले मन निरिच्‍छ होऊन आपल्‍याला शांती अनुभवता येते.’

४. रात्री भूक लागलेली असतांनाही सेवा संपवून नामजपाला प्राधान्‍य दिल्‍यावर रात्री उशिरा ‘योगक्षेमं वहाम्‍यहम् ।’ हे वचन निभावणार्‍या भगवंताने एका साधकाच्‍या माध्‍यमातून प्रसाद खायला देणे

एकदा दिवसभराची सेवा आटोपल्‍यावर रात्री झोपण्‍यापूर्वी मला नामजप करायचा होता. मला भूकही लागली होती; परंतु मी काही खाण्‍यापेक्षा नामजपाला प्राधान्‍य देण्‍याचे ठरवले. तेव्‍हा मी २ घंटे नामजप केला आणि खोलीत झोपायला जायला निघालो. तेव्‍हा एक साधक माझ्‍याकडे आले आणि मला म्‍हणाले, ‘‘तुला भूक लागली आहे ना ? हा प्रसाद खा !’’ वास्‍तविक मला भूक लागल्‍याचे मी कुणालाही सांगितले नव्‍हते. केवळ नामजपाला प्राधान्‍य दिले होते, तरी ‘योगक्षेमं वहाम्‍यहम् ।’ हे वचन निभावणार्‍या भगवंताने माझी स्‍थिती ओळखून रात्री २ वाजता मला प्रसाद खायला दिला. भगवंताच्‍या चरणी कितीही कृतज्ञता व्‍यक्‍त केली, तरी अल्‍पच आहे.

५. साधनेत होणारा संघर्ष आत्‍मनिवेदन करून श्रीगुरूंना सांगता येणे; मात्र ‘व्‍यावहारिक इच्‍छापूर्ती व्‍हावी’, अशी प्रार्थना करण्‍याची बुद्धी कधीही न होणे, हे गुरुकृपेचे सामर्थ्‍य असणे

रामनाथी आश्रमात मी रहात असलेल्‍या खोलीतील माझ्‍या कपाटात प.पू. डॉक्‍टरांचे एक छायाचित्र ठेवले आहे. मला एखाद्या गोष्‍टीचे वाईट वाटले असेल, माझ्‍या मनात उद्वेग असेल, माझ्‍याकडून झालेल्‍या चुकीमुळे माझ्‍या मनाचा होत असलेला संघर्ष, मला स्‍वीकारता न आलेली परिस्‍थिती असे माझ्‍या मनातील सर्व विचार कधी प्रेमाने, कधी रागाने, तर कधी भांडणाच्‍या सुरात मी त्‍या छायाचित्राला सांगतो. असे केल्‍यानंतर त्‍या संघर्षातून काहीतरी मार्ग निघतो. एरव्‍ही ‘मला व्‍यवहारातील गोष्‍टी हव्‍या आहेत’, यासाठी मी आईपाशी हट्ट करतो. ती मला त्‍यावर दृष्‍टीकोन देते. ते मला न पटल्‍याने माझा संघर्ष तसाच चालू असतो; परंतु प.पू डॉक्‍टरांच्‍या छायाचित्रासमोर प्रार्थना करत असतांना कधीही ‘मला व्‍यवहारातील काही हवे आहे आणि श्रीगुरूंनी ते मला द्यावे’, अशी प्रार्थना करण्‍याची इच्‍छाही होत नाही. ‘प.पू. डॉक्‍टरांच्‍या शिकवणीनुसार कधीही त्‍यांच्‍याकडे सकामातले मागितले जात नाही’, ही त्‍यांचीच कृपा आहे. यावर श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) गाडगीळकाकू यांनी सांगितले, ‘‘अनिष्‍ट शक्‍तींचा त्रास एकवेळ जाईल; परंतु मायेत अडकल्‍याने किंवा स्‍वभावदोष आणि अहं वाढले, तर ते घालवणे अतिशय कठीण आहे. त्‍यासाठी परत किती जन्‍म घ्‍यावे लागतील, ठाऊक नाही.’’ श्रीगुरूंनी आजवर मायेत अडकण्‍यापासून माझे रक्षण केले, यासाठी मी त्‍यांच्‍या चरणी कृतज्ञता व्‍यक्‍त करतो.

असे बुद्धीच्‍या पलीकडचे अनुभव देणार्‍या आणि सर्व जिवांचा योगक्षेम वाहणार्‍या गुरूंच्‍या चरणी मी कोटीशः कृतज्ञ आहे.’

– श्री. धैवत विलास वाघमारे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२८.५.२०२२)

या अंकात प्रसिद्ध करण्‍यात आलेल्‍या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्‍तीनुसार साधकांच्‍या वैयक्‍तिक अनुभूती आहेत. त्‍या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक