सम्मेद शिखरजी तीर्थस्थळच रहाणार !

हे तीर्थस्थळ पर्यटनस्थळ करण्याचा झारखंड सरकारचा निर्णय केंद्र सरकारकडून रहित

रांची (झारखंड) – जैन समाजाचे पवित्र तीर्थस्थळ असलेले सम्मेद शिखरजी हे पर्यटनस्थळ करण्याचा झारखंड सरकारचा निर्णय केंद्र सरकारने नुकताच रहित केला. सम्मेद शिखरजी या तीर्थस्थळाचे रूपांतर पर्यटनस्थळात करण्याचा निर्णय झारखंड सरकारने घेतला होता. त्याविरोधात जैन समाजाने मोठे आंदोलन उभे केले होते. पारसनाथ डोंगर (सम्मेद शिखरजी) परिसरात सर्व पर्यटन आणि ‘इको टुरिझम’चे उपक्रम बंद करण्यात यावेत, असे केंद्र सरकारच्या अधिसूचनेत म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सूचनेनंतर पर्यावरण मंत्रालयाने ही अधिसूचना प्रसारित केली.

हा जैन समाजाचा विजय ! – मुनिश्री १०८ प्रमाण सागरजी महाराज

हा जैन समाजाचा विजय आहे, अशा शब्दांत मुनिश्री १०८ प्रमाण सागरजी महाराज यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाविषयी आनंद व्यक्त केला.

४ दिवसांत दुसर्‍या जैन मुनींचा देहत्याग

सम्मेद शिखरजींना पर्यटनस्थळ घोषित करण्याच्या विरोधात जैन मुनी समर्थ सागरजी यांनी उपोषण चालू केले होते. ५ जानेवारीला रात्री त्यांचे निधन झाले. ते सम्मेद शिखरजींसाठी देहत्याग करणारे गेल्या ४ दिवसांतील दुसरे संत आहेत. जैन मुनी सुज्ञेयसागर महाराज यांनी ३ जानेवारी या दिवशी देहत्याग केला होता.