वीजटंचाईमुळे पाकमध्ये रात्री बाजारपेठा, लग्नाची सभागृहे आदी बंद ठेवण्याचा आदेश  

इस्लामाबाद (पाकिस्तान) – पाकिस्तानने ३ जानेवारी या दिवशी आर्थिक संकटामुळे देशातील सर्व बाजारपेठा, लग्नाची सभागृहे, मॉल (मोठे व्यापारी संकुल) आदी रात्री बंद ठेवण्याचा आदेश दिला आहे. वीज वाचवण्याच्या दृष्टीने ही बंदी घालण्यात आली आहे.  पाकिस्तानच्या मंत्रीमंडळाने राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन योजनेला संमती दिली. वीज वाचवणे आणि तेल आयात यांवर अवलंबून रहाणे अल्प करण्याच्या उद्देशाने या योजनेला संमती देण्यात आली आहे.

१. पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांनी सांगितले की, आता बाजारपेठा आणि मॉल रात्री साडेआठ वाजता बंद होतील, तर पाकिस्तानमधील लग्नाची सभागृहे रात्री १० वाजता बंद होतील. ऊर्जा टंचाईला तोंड देण्यासाठी पाकिस्तानने १ फेब्रुवारीपासून बल्बच्या उत्पादनांवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. पंख्यांच्या निर्मितीवरही जुलैपासून बंदी घालण्यात येणार आहे.

२. याचप्रमाणे सरकारने गिझरच्या वापराच्या संदर्भात नियम बनवणार असून कमी गॅसवर चालणारे गिझर वापरणे बंधनकारक करण्यात येणार आहेत. सरकारी कार्यालये आणि इमारती येथे विजेचा वापर अल्प करण्यात येणार आहेत. कर्मचार्‍यांना घरून काम करण्याच्या संदर्भातील नवीन ‘वर्क फ्रॉम होम’ धोरणही पुढील १० दिवसांमध्ये लागून केले जाणार आहे.