कर्तव्यात कसूर करणार्‍या पोलीस निरीक्षकांवर कारवाई करा ! – विश्व हिंदु परिषद आणि बजरंग दल

  • सिरोंचा येथे हिंदु धर्म आणि देवता यांच्या विरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचे प्रकरण

  • विश्व हिंदु परिषद आणि बजरंग दल यांच्याकडून पोलीस अधीक्षकांना निवेदन !

गडचिरोली, २ जानेवारी (वार्ता.) – सिरोंचा येथील परिवर्तन भवनमध्ये २४ आणि २५ डिसेंबर या दिवशी ‘फुले-शाहू-आंबेडकर वार्षिक महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले होते. ‘येथे हिंदु धर्मावर टीका करण्यात येऊ शकते, याची शक्यता लक्षात घेऊन कार्यक्रमाच्या आयोजकांना पूर्वसूचना देण्यात याव्यात’, असे निवेदन विश्व हिंदु परिषद आणि बजरंग दल यांनी कार्यक्रमाच्या पूर्वी पोलीस ठाण्याचे निरीक्षक जाधव यांना दिले होते; परंतु पोलीस प्रशासनाने कोणतीच कार्यवाही केली नाही. त्यानंतर या महोत्सवात हिंदु धर्म आणि देवता यांच्या विरोधात अपमानास्पद अन् आक्षेपार्ह वक्तव्य करण्यात आले. त्यामुळे आमच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. कर्तव्यात कसूर करणारे निरीक्षक जाधव यांना निलंबित करण्यात यावे, अशी मागणी विश्व हिंदु परिषद आणि बजरंग दल यांनी पोलीस अधीक्षकांना केली आहे. या वेळी सर्वश्री बजरंग दल जिल्हा संयोजक सचिन ठाकूर, मठ-मंदिर प्रमुख सूरज काटवे, गौरक्षा प्रमुख विशाल बिजवे, सुरक्षा प्रमुख आकाश मांडवे, राहुल शिलेदार, विश्व हिंदु परिषदेचे नरसिंह सिंलवेरी, समया ओल्लाला आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

दोषींवर कठोर कारवाई करावी ! – राजे अंबरीशराव आत्राम, माजी आमदार

सिरोंचा येथे एका कार्यक्रमात वक्त्याने हिंदु देवतांवर केलेली टिपणी चीड आणणारी आहे. आयोजकांनी संपूर्ण कार्यक्रम अवैधपणे आयोजित केल्याचे ऐकले आहे. कलम ३७ लागू असतांना या कार्यक्रमाला अनुमती कशी मिळाली ? याचीही चौकशी करावी. तसेच दोषींना त्वरित अटक करून आयोजकांवर गुन्हा नोंदवावा, अशी मागणी गडचिरोलीचे माजी पालकमंत्री अंबरीश आत्राम यांनी केली आहे.


सिरोंचा येथे विश्व हिंदु परिषद आणि बजरंग दल यांची आयोजकांच्या विरोधात पोलीस तक्रार !

सिरोंचा – सिरोंचा येथील कार्यक्रमातून आमच्या भावना दुखावण्यात आल्या आहेत. त्यामुळे या प्रकरणी संबंधित वक्त्यासह आयोजकांवर कारवाई करण्यात यावी, अशी तक्रार विश्व हिंदु परिषद आणि बजरंग दल यांच्या कार्यकत्र्यांनी येथील उपविभागीय पोलीस अधिकार्‍यांकडे केली. या प्रकरणी सबंधित आक्षेपार्ह भाषणाची चित्रफीत पडताळून कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन एस्.डी.पी.ओ. सुहास शिंदे यांनी दिले. या वेळी स्वामी बोगोंनी, रामन्ना तोटावार, शंकरराव बुधदावार, नरसिंह सिलवेरी, समया ओल्लाला आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

संपादकीय भूमिका 

हिंदु धर्म आणि देवता यांच्या विरोधात वक्तव्य करणार्‍यांवर काहीही कारवाई न करणारे पोलीस हिंदुद्रोहीच आहेत !