संभाजीनगर येथील अधिवक्ता कै. चारुदत्त जोशी (मृत्यूसमयी आध्यात्मिक पातळी ६१ टक्के) यांचे श्री गुरूंची महती सांगणारे विचार !
व्यष्टी साधनेच्या आढावा सत्संगांमुळे निर्माण होणारी आत्मीयता साधकांनी गुरुचरणी अर्पण केली, तर त्यांना भावजागृतीची अनुभूती घेता येईल !‘२७.३.२०२० या दिवशी व्यष्टी साधनेचा एकत्रित आढावा होता. त्या वेळी मला वाटले, ‘साधक म्हणजे जणू मोती आहेत आणि व्यष्टी साधनेचा एकत्रित आढावा सत्संग हा या सर्व मोत्यांना एकमेकांमध्ये गुंफणारा धागा आहे. या सत्संगामुळे साधकांमध्ये आत्मीयता निर्माण होत आहे. ही आत्मीयता केवळ गुरुमाऊलीच (परात्पर गुरु डॉक्टरच) निर्माण करू शकतात. हे सत्य जाणून साधकांनी आपल्या मनात निर्माण झालेली आत्मीयता श्री गुरुचरणी कृतज्ञतेने अर्पण केली, तर त्यांना भावजागृतीची अनुभूती घेता येईल !’ – अधिवक्ता चारुदत्त जोशी (एप्रिल २०२०) |
१. धर्म हाच मानवाच्या कल्याणाचा एकमेव मार्ग असल्यामुळे निसर्ग धर्मरक्षणासाठी पंचमहाभूतांच्या साहाय्याने समतोल राखत असणे
‘निसर्ग समतोल साधतो. अतिरिक्त झालेल्या अनावश्यक गोष्टींचे तो नियमन करतो. ‘या नियमनासाठी तो कुठले तत्त्व वापरेल ?’, हे मानवाला अगम्य आहे. निसर्गाचे, म्हणजे एकंदर सृष्टीचे नियमन करण्याचे दायित्व पंचमहाभूते घेतात, म्हणजे एक प्रकारे भारवहनच करतात. पंचमहाभूते मानवाच्या कल्याणासाठी, किंबहुना धर्मरक्षणासाठी हे भारवहन करतात; कारण धर्म हाच मानव कल्याणाचा खरा पाया आणि एकमेव मार्ग आहे.
२. मानवाचे अधर्माचरण, पापे, अनाचार, प्रदूषण आदींमुळे निर्माण झालेल्या भाराचा पंचमहाभूतांवर परिणाम होणे; म्हणून ईश्वराने मानवाला त्याच्या कर्मफल न्यायानुसार फळ देणे
सृष्टीवर हा भार कशाचा आहे ? मानवाचे अधर्माचरण, पापे, अनाचार, वैचारिक आणि मानसिक प्रदूषण यांचा सर्व भार पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश ही तत्त्वे सहन करतात. याचा अर्थ सृष्टीवर होणार्या परिणामांचे नियमन करण्याचा सर्व भार साक्षात् ईश्वर सहन करतो. ईश्वराजवळ कर्मफलन्याय असल्याने मानवाला त्याच्या चुकांचे फळ भोगावे लागते.
३. मानवाच्या जीवनात असलेले श्री गुरूंचे अनन्यसाधारण महत्त्व !
या सगळ्यात ‘या देहधारी मानवाचा भार कोण घेते ? त्याला योग्य दिशा देऊन कोण मुक्त करते ?’, याचे उत्तर एकच आहे आणि ते म्हणजे, श्री गुरु ! मनुष्याचा त्याचे गुण आणि अवगुण यांसहित स्वीकार करतात, ते केवळ ‘श्री गुरु’ ! श्री गुरूंनी एखाद्या जिवाचा स्वीकार केला की, सर्वसामान्य मनुष्याची साधक होण्याकडे वाटचाल चालू होते. पुढे गुरु त्याला ‘शिष्य’, ‘संत’, ‘सद्गुरु’ आणि ‘परात्पर गुरु’ या क्रमाने पुढे नेतात अन् मोक्ष प्रदान करतात, म्हणजेच सर्वसाधारण मनुष्य आपला सर्व भार श्री गुरूंवर सोपवून प्रगतीच्या दिशेने पुढे जाऊ लागतो.’
– अधिवक्ता चारुदत्त जोशी (एप्रिल २०२०)
रामनाथी, गोवा येथील सनातनच्याआश्रमात येऊन गेल्यानंतर अधिवक्ता चारुदत्त जोशी यांना सुचलेली कविता
मन होते अधीर गुरुदेवा, दर्शन केव्हा देणार ?
ज्यांच्यामुळे घडे साधना अखंड
आणि आनंदही मिळतो अमृततुल्य ।
सद्गुरु आणि संत यांचे मार्गदर्शन,
शिदोरी असे आमची अमूल्य ।। १ ।।
गुरुकृपे मिळाली साधनेला भावाची जोड,
मना लागे गुरुचरणांची ओढ ।
प्रयत्न करता अखंड, फळ सेवेचेही मिळते गोड गोड ।। २ ।।
मिळते भेट जेव्हा शिष्यत्वाची, हृदयी वसते दास्यभक्ती ।
अनुसंधानात रहाता गुरुदेवांच्या(टीप १)
मिळते याच जन्मी मुक्ती ।। ३ ।।
साधनेत नेऊन पुढच्या टप्प्यास गुरूंनी दिला प्रगतीचा ठेवा ।
तरी मन हे होते अधीर, गुरुदेवा, दर्शन देणार केव्हा ।। ४ ।।
टीप १ : परात्पर गुरु डॉक्टरांच्या
– अधिवक्ता चारुदत्त जोशी, संभाजीनगर, महाराष्ट्र. (जून २०२०) (मृत्यूपूर्वी केलेली कविता, मृत्यूदिनांक २८.४.२०२१)
या अंकात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |