हिंदु ओळखीवर अनावश्यक चर्चा करण्यापेक्षा धर्माची व्यापकता समजून घ्या !

जर हिंदूंना केवळ भारताच्य भौगोलिक सीमांचे बंधन घालण्यात आले, तर दुसर्‍या देशांमध्ये रहात असलेल्या हिंदूंना काय म्हणणार ? आणि भारतात रहाणार्‍या अहिंदूंना ‘हिंदु’ संबोधणे किती योग्य ठरेल ? हिंदु धर्माच्या व्यापक संकल्पना स्पष्ट करणारा लेख येथे देत आहोत.

१. हिंदूंना विशिष्ट एका देशाच्या भौगोलिक सीमांचे बंधन घालणे अयोग्य !

डॉ. शंकर शरण

‘काही दिवसांपूर्वी कर्नाटक काँग्रेसच्या एका नेत्याने ‘हिंदु’ शब्द भयानक असल्याचे म्हणत वाद निर्माण केला होता. आपण चहूबाजूंनी घेरल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी क्षमायाचना केली. ‘हिंदु’ या शब्दाविषयी असे प्रथमच झाले नाही, तर असे प्रकार अधूनमधून चालू असतात. कित्येक हिंदू युरोप, अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया आणि विविध आफ्रिकी-आशियाई देशांचे नागरिक आहेत; परंतु तेही स्वत:ला हिंदु म्हणवतात. तेथील सरकारे आणि समाजही त्यांना हिंदु समजतात. अशा स्थितीत हिंदूंना केवळ भौगोलिक सीमांची मर्यादा घातली, तर दुसर्‍या देशात रहाणार्‍या हिंदूंना काय म्हणायचे ? दुसरीकडे भारतात कोट्यवधी मुसलमान, ख्रिस्ती, पारसी आणि बौद्ध आदींना स्वत:ला ‘हिंदु’ म्हणणे आवडणारे नाही. कोणत्याही समुदायाची आत्मप्रतिमा दुसरे ठरवू शकत नाही. मग हे धर्मावलंबीही अन्य देशांमध्ये मोठ्या संख्येने रहातात. याचाच अर्थ आजच्या घडीला कोणत्याही धर्माला विशिष्ट देशाशी जोडून परिभाषित करणे अशक्य आहे.

२. ‘अनुयायांना धर्माच्या बंधनात ठेवण्याऐवजी त्यांना मुक्त करणे’, ही हिंदु धर्माची संकल्पना असणे

सध्या जगातील अन्य धर्मीय व्यक्तीही हिंदु धर्माकडे आकर्षित होऊन हिंदु बनत आहेत, हेही लक्षात घेतले पाहिजे. भगिनी निवेदिता यांच्यापासून हॉलिवूड चित्रपट अभिनेत्री ज्युलिया रॉबर्ट्स, डॉ. डेव्हिड फ्रॉले आणि विल स्मिथ यांसारखे अनेक वलयांकित व्यक्तीही याला अपवाद नाहीत. त्यामुळे हिंदु धर्म हीच एक ओळख आहे. ही ओळख कोणत्याही राजकीय, भौगोलिक किंवा पक्ष यांच्या भावनिकतेच्या दृष्टीकोनातून नाकारणे व्यर्थ आहे. हे ठीक आहे की, शतकानुशतके भारत आणि हिंदु धर्म यांना एकमेकांचा पर्याय समजण्यात आले आहे; परंतु भारतात धर्माच्या रूपात सार्वभौम मान्यता असतांनाही विविध धर्म आणि विश्वास यांच्यामध्ये हिंदु धर्माचीच स्वतंत्र सत्ता आहे. तसे अन्य धर्मांप्रमाणे हिंदु धर्मातही अनेक संप्रदाय असून नवनवीन संप्रदाय सतत बनत असतात. त्यानंतरही सर्वांची मूळ ओळख समान आहे. या ओळखींमध्ये एकतेचे जे तत्त्व आहे, तेच हिंदु धर्माचे सार आहे. हे बुद्धीवाद्यांच्या पलीकडे आहे. हे परमात्म्याला अनादी, अनंत आणि निर्विकार समजत असल्यामुळे धर्मासह सर्व प्रकारच्या ज्ञानाला मुक्त अन् अमर्यादित समजतात. त्यामुळे हिंदु धर्मात नवनवीन शोध, साधना, संप्रदाय आणि गुरु आदी होण्याचा मार्ग खुला आहे. हे दुसर्‍या धर्मांच्या तुलनेत हिंदु धर्माचे अनन्य साधारण वैशिष्ट्य आहे. यहुदी, ख्रिस्ती आणि इस्लाम यांसारखे ‘रिलिजन’ (पंथ) व्याख्येच्या माध्यमातूनच त्यांच्या अनुयायांना एकत्र ठेवतात. जेव्हा की, भारतीय संकल्पना ही ‘धर्मा’ने मनुष्याला बंधनात ठेवण्याऐवजी मुक्तीवर केंद्रित आहे. कवी अज्ञेय यांच्या शब्दांमध्ये सांगायचे झाल्यास ‘रिलिजन बांधत आणि धर्म मुक्त करत राहिला आहे.’

३. भारताचे पारंपरिक धर्मावलंबी म्हणजे ‘हिंदु’ !

सहस्रो वर्षांपूर्वी भारतात रहाणार्‍या सर्व लोकांना ‘हिंदु’ संबोधणे योग्य होते. वास्तविक आपल्याला हे ‘हिंदु’ नावच परकियांनी दिले आहे. वेद, शास्त्रे आणि पुराण इत्यादींमध्येही हा शब्द सापडत नाही. केवळ ‘धर्म’ म्हटल्यावरच संपूर्ण स्पष्ट होत होते; परंतु परकियांनी भारतीय समाजाला ‘हिंदु’ संबोधून केवळ भूगोलाचा संकेत केला नव्हता. त्याचा अर्थ तो विविध धर्म, परंपरा आणि विश्वासही होता, जो ख्रिस्ती आणि इस्लाम यांच्याहून वेगळा आहे. ‘हिंदु’ शब्दाचा शास्त्रीय अर्थ हाच आहे, जो आजही योग्य आहे, म्हणजे भारताचे पारंपरिक धर्मावलंबी, जे ख्रिस्ती किंवा मुसलमान नाहीत. इस्लामी आक्रमणानंतर येथे मुसलमान लोकसंख्या वसली. नंतर युरोपीय आक्रमणे आणि मिशनर्‍यांचे दुष्टचक्र यांच्यामुळे ख्रिस्ती लोकसंख्याही झाली. अशा स्थितीत आज सर्व भारतियांना ‘हिंदु’ म्हणणे एक बळजोरी आहे. हे केवळ वास्तविकतेलाच खोटे ठरवत नाही, तर हिंदु समाजाच्या हिताच्या विरुद्धही आहे.

४. भारतात मतपेढीसाठी बहुसंख्य हिंदूंना मिळणार्‍या सवलती अल्पसंख्यांकांना देण्यात येणे

येथे सरकारच २० टक्क्यांहून अधिक असलेल्या लोकांना ‘अहिंदू’ असल्याचे सांगते. त्यांना ‘अल्पसंख्यांक’ म्हणून अशा सोयीसवलती दिल्या की, ज्या हिंदूंनाही मिळत नाहीत. हिंदू त्यांची मंदिरे आणि शिक्षण संस्था त्याच स्वातंत्र्याने चालवण्याच्या अधिकारांपासून वंचित आहेत की, जे ख्रिस्ती आणि मुसलमान यांना मिळाले आहे. मतपेढीच्या लोभापायी हे चलन वाढत गेले आहे. अशा स्थितीत सर्व भारतियांना ‘हिंदु’ म्हटल्यावर त्या गंभीर विवंचनेवर पडदा पडतो की, जो हिंदु समाज सहन करत आहे. हा घाव तेव्हा अधिक भळभळतो, जेव्हा प्रभावी गट येथे हिंदूंनाच ‘फॅसिस्ट’ (अतीउजवे) आणि ‘जातीयवादी’ आदी संबोधून देश-विदेशात मानहानी करतात. गेल्या काही दशकांपासून हिंसाचार, आतंकवाद आणि विस्थापन आदी सहन करावे लागणार्‍यांची आकडेवारी कोणते निष्कर्ष दाखवते ?

५. हिंदूंची सातत्याने उपेक्षा होणे सर्वांसाठी धोकादायक !

हे स्पष्ट आहे की, येथे हिंदू आणि अहिंदू यांच्यातील ठोस अंतर अन् भेदभाव यांवर पडदा टाकून अहिंदूंनाही ‘हिंदु’ म्हणणे भ्रामक, तसेच हानीकारक आहे. याचा मुसलमान आणि ख्रिस्ती यांच्याकडून विरोधही होत असतो. वास्तविक हा हिंदु समाजावर दुहेरी अन्याय आहे. यातून देशाची हानीच होईल; कारण की बहुसंख्य लोकांना कायद्याविषयी, सांस्कृतिक आणि राजकीय स्वरूपात दुसर्‍या स्तराचा नागरिक बनवून ठेवणे कधी हितकारक नसते. रा.स्व. संघाची कागदपत्रे आणि त्यांचे संस्थापक

डॉ. हेडगेवार यांचे विचार स्पष्ट सांगतात की, भारतात हिंदू हा एक विशेष समुदाय आहे. खिलाफत आंदोलनाच्या वेळी देशात हिंदूंच्या संहारानंतर सुरक्षेच्या दृष्टीने संघाची स्थापना झाली. डॉ. हेडगेवार यांनी मुसलमान आणि ख्रिस्ती यांना विजातीय (विरुद्ध) समजले होते. जे परकीय आक्रमकांमुळे भारतात मोठे झाले अणि वाढले. स्वतंत्र भारताचा इतिहासही याची पुष्टी करतो की, चर्चचे मिशन, तबलिगी जमात यांच्या, तसेच लष्कर-ए-तोयबा, जैश ए महंमद आणि इंडियन मुजाहिदीन आदी असंख्य इस्लामी संघटनांच्या कारवाया हिंदुविरोधी राहिल्या आहेत.

वास्तवात हिंदु एक विशिष्ट धर्म आणि समुदाय आहे, जो विविध स्तरांवर घायाळ होत असतांना भेदभावही सहन करत आहे. अशा वेळी नेत्यांचे दायित्व आहे की, त्यांनी या समस्यांचा सामना केला पाहिजे. याकडे दुर्लक्ष करून कोणत्याही पक्षाचे भले होणार नाही. जसे की, इमाम बुखारीसारखे मुसलमान नेतेही समजले की, भारतात हिंदू बहुसंख्य असल्यामुळेच लोकशाही, धर्मनिरपेक्षता, विकास आणि शांती-सद्भाव आहे. त्यामुळे याच समुदायाच्या हितांची उपेक्षा होत राहिली, तर शेवटी सर्व काही संकटात सापडेल.’

– प्रा. शंकर शरण, देहली (लेखक राजकारणशास्त्राचे प्राध्यापक आणि वरिष्ठ स्तंभकार आहेत.)