देवाला नमस्कार करण्याची योग्य पद्धत आणि त्यासंदर्भातील संशोधन

‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’ने ‘पी.आय.पी. (पॉलीकॉन्ट्रास्ट इंटरफेरन्स फोटोग्राफी)’ या तंत्रज्ञानाच्या साहाय्याने केलेली वैज्ञानिक चाचणी

‘देवळात देवतेचे दर्शन घेतांना आपण दोन्ही हात जोडून देवाला नमस्कार करतो. दोन्ही हातांचे तळवे एकमेकांवर ठेवल्यावर (म्हणजेच एकमेकांना चिकटवून) जी मुद्रा होते त्याला ‘नमस्कार’ म्हणतात. देवाला नमस्कार करतांना होणार्‍या मुद्रेमुळे देवतेकडून प्रक्षेपित होणारे चैतन्य आपल्याला ग्रहण करता येते. ‘देवाला नमस्कार करण्याची योग्य पद्धत कोणती ?’ हे विज्ञानाद्वारे अभ्यासण्यासाठी एक चाचणी करण्यात आली. या चाचणीसाठी ‘पी.आय.पी. (पॉलीकॉन्ट्रास्ट इंटरफेरन्स फोटोग्राफी)’ तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यात आला. याच्या साहाय्याने वस्तू आणि व्यक्ती यांच्या ऊर्जाक्षेत्राचा (‘ऑरा’चा) अभ्यास करता येतो. या चाचणीतील निरीक्षणांचे विवेचन पुढे दिले आहे.


१. चाचणीतील निरीक्षणांचे विवेचन

या चाचणीत साधकाने नमस्काराची मुद्रा करण्यापूर्वी आणि त्याने एकेक करून पुढील ३ प्रकारे नमस्काराच्या मुद्रा केल्यावर ‘पी.आय.पी.’ तंत्रज्ञानाद्वारे वातावरणाची छायाचित्रे घेण्यात आली. या छायाचित्रांचा केलेल्या तुलनात्मक अभ्यासातून ‘देवाला नमस्कार करण्याची कोणती पद्धत सर्वाधिक योग्य आहे ?’, हे समजले.

अ. नुसते हात जोडून नमस्कार करणे : या पद्धतीमध्ये साधकाने दोन्ही हातांचे तळवे एकमेकांना जोडून शरिरापुढे घेऊन नमस्कार केला. (क्रमांक १ चे छायाचित्र पहावे.)

आ. हात जोडून अनाहतचक्राच्या ठिकाणी स्पर्श करून नमस्कार करणे : या पद्धतीमध्ये साधकाने दोन्ही हातांचे तळवे एकमेकांना जोडून अनाहतचक्राच्या ठिकाणी (म्हणजे छातीला) स्पर्श करून आणि डोके थोडे खाली झुकवून नमस्कार केला. (क्रमांक २ चे छायाचित्र पहावे.)

इ. हात जोडून हातांच्या अंगठ्यांचा स्पर्श भ्रूमध्याच्या ठिकाणी करून नमस्कार करणे : या पद्धतीमध्ये साधकाने दोन्ही हातांचे तळवे एकमेकांना जोडून हातांच्या अंगठ्यांचा स्पर्श भ्रूमध्याच्या ठिकाणी करून, पाठीतून थोडे खाली वाकून आणि डोके थोडे खाली झुकवून नमस्कार केला. (क्रमांक ३ चे छायाचित्र पहावे.)

२. ‘पी.आय.पी.’ छायाचित्रांतील (प्रभावळीतील) नकारात्मक अन् सकारात्मक स्पंदनांचे एकूण प्रमाण, तसेच सकारात्मक स्पंदनांपैकी काही महत्त्वाच्या स्पंदनांचे प्रमाण

टीप : केवळ हात जोडल्याने चैतन्य अधिक प्रमाणात ग्रहण होत नाही, तर चैतन्य अधिक प्रमाणात येण्यासाठी योग्य पद्धतीने नमस्कार करणे आवश्यक आहे आणि त्यानंतरच ते चैतन्य शरिरात पसरते.

साधकाने तीनही पद्धतींनी केलेल्या नमस्काराच्या प्रभावळींची तुलना नमस्कार करण्यापूर्वीच्या प्रभावळीशी केली आहे. यातून पुढील सूत्रे लक्षात आली.

अ. नमस्कार करण्यापूर्वीच्या तुलनेत साधकाने नुसते हात जोडून नमस्कार केल्याने वातावरणातील सकारात्मक स्पंदनांचे एकूण प्रमाण उणावले आणि नकारात्मक स्पंदनांचे एकूण प्रमाण वाढले. तसेच सकारात्मक स्पंदने दर्शवणार्‍या पिवळ्या रंगाचे प्रमाणही पुष्कळ उणावले.

आ. नमस्कार करण्यापूर्वीच्या तुलनेत त्याने अनाहतचक्राच्या ठिकाणी स्पर्श करून नमस्कार केल्यानंतर वातावरणातील सकारात्मक स्पंदनांचे एकूण प्रमाण वाढले आणि नकारात्मक स्पंदनांचे एकूण प्रमाण उणावले. तसेच सकारात्मक स्पंदने दर्शवणार्‍या पिवळ्या रंगाचे प्रमाण पुष्कळ वाढले.

इ. नमस्कार करण्यापूर्वीच्या तुलनेत त्याने हातांच्या अंगठ्यांचा स्पर्श भ्रूमध्याच्या ठिकाणी करून केलेल्या नमस्कारामुळे वातावरणातील सकारात्मक स्पंदनांचे एकूण प्रमाण सर्वाधिक वाढले आणि नकारात्मक स्पंदनांचे एकूण प्रमाण पुष्कळ उणावले. तसेच सकारात्मक स्पंदने दर्शवणार्‍या पिवळ्या आणि निळसर पांढर्‍या रंगांचे प्रमाण पुष्कळ वाढले.

सौ. मधुरा कर्वे

३. निष्कर्ष

साधकाने हातांच्या अंगठ्यांचा स्पर्श भ्रूमध्याच्या ठिकाणी करून केलेल्या नमस्कारातून वातावरणात चैतन्य आणि पावित्र्य यांची स्पंदने सर्वाधिक प्रमाणात प्रक्षेपित झाली. यातून देवाला नमस्कार करण्याची ही पद्धत सर्वांत योग्य आहे, असे लक्षात येते.

४. चाचणीतील निरीक्षणांचे अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण

४ अ. हातांच्या अंगठ्यांचा स्पर्श भ्रूमध्याच्या ठिकाणी करून केलेल्या नमस्कारातून वातावरणात चैतन्य आणि पावित्र्य यांची स्पंदने सर्वाधिक प्रमाणात प्रक्षेपित होण्याचे कारण : साधकाने नुसते हात जोडले, तेव्हा त्याचा भाव जागृत झाला नाही. त्यामुळे त्याला अधिक प्रमाणात चैतन्य ग्रहण करता आले नाही. जेव्हा त्याने हात जोडून अनाहतचक्राच्या ठिकाणी स्पर्श करून आणि डोके थोडे खाली झुकवून नमस्कार केला, तेव्हा त्याचे अनाहतचक्र कार्यरत झाले. त्यामुळे त्याचा भाव जागृत होऊन त्याला अधिक प्रमाणात चैतन्य ग्रहण करता आले. जेव्हा त्याने हातांच्या अंगठ्यांचा स्पर्श भ्रूमध्याच्या ठिकाणी, म्हणजे आज्ञाचक्राच्या ठिकाणी करून, पाठीतून थोडे खाली वाकून आणि डोके थोडे खाली झुकवून नमस्कार केला, तेव्हा त्याचा शरणागतभाव जागृत झाला. शरणागतभाव जागृत झाल्यामुळे साधकातील ‘अहंभाव’ (म्हणजे ‘स्व’च्या अस्तित्वाची जाणीव) अल्प होण्यास साहाय्य झाले. त्यामुळे त्याला सर्वाधिक प्रमाणात चैतन्य ग्रहण करता आले. थोडक्यात देवाला या पद्धतीने केलेल्या नमस्कारामुळे व्यक्तीला सर्वाधिक प्रमाणात आध्यात्मिक स्तरावरील लाभ होतात, हे या चाचणीतून स्पष्ट झाले.’

– सौ. मधुरा धनंजय कर्वे, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (२४.१२.२०२२)

ई-मेल : [email protected]

देवाला योग्य पद्धतीने आणि शरणागत भावाने नमस्कार केल्यास सर्वाधिक प्रमाणात आध्यात्मिक स्तरावरील लाभ होतो !