‘ज्ञानशक्ती प्रसार अभियाना’च्या माध्यमातून साधकांची साधना व्हावी’, यासाठी तळमळीने प्रयत्न करणारे सनातनचे संत पू. भाऊ (सदाशिव) परब !

‘कोल्हापूर सेवाकेंद्रातील साधकांना श्री गुरूंनी दिलेली एक अमूल्य देणगी, म्हणजे सनातनचे २६ वे संत पू. भाऊ (सदाशिव) परब ! त्यांचे वय ८२ वर्षे असूनही त्यांचा ‘ज्ञानशक्ती प्रसार अभियाना’तील सहभाग आणि त्यासाठी त्यांनी साधकांकडून करवून घेतलेले प्रयत्न कौतुकास्पद आहेत.

पू. सदाशिव परब

१. पू. भाऊ परब यांनी साधकांच्या मनावर ‘ज्ञानशक्ती प्रसार अभियाना’चे महत्त्व बिंबवणे आणि त्यानंतर साधकांनी सेवेसाठी अधिक वेळ देण्यास प्रारंभ करणे

पू. भाऊकाका आम्हा साधकांना म्हणाले, ‘‘हे अभियान, म्हणजे परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी आपत्काळात आपल्याला साधना करण्यासाठी दिलेली सुवर्णसंधी आहे. या अभियानाच्या माध्यमातून आपण झोकून देऊन सेवा केल्यास त्यातून आपली समष्टी सेवा तर होईलच; पण यातून आपली आध्यात्मिक उन्नतीही होईल. त्यासाठी आपण या अभियानाचा लाभ करून घ्यायला हवा.’’ त्यानंतर साधकांनी सेवेसाठी अधिक वेळ देण्यास प्रारंभ केला.

२. ‘ज्ञानशक्ती प्रसार अभियाना’चा ध्यास घेऊन सेवा करणारे पू. भाऊ परब !

‘ज्ञानशक्ती प्रसार अभियान’ चालू झाल्यापासून पू. भाऊकाकांच्या मनात सतत अभियानाविषयीचेच विचार असतात. ‘ग्रंथ लवकर कसे मुद्रित होतील ? ते जिज्ञासूंपर्यंत कसे पोचतील ? या सेवेतून सेवाकेंद्रातील साधकांची साधना कशी होईल ?’, याकडे त्यांचे कटाक्षाने लक्ष असते. त्यांनी त्यांच्या दुपारच्या विश्रांतीचा कालावधी न्यून करून तो वेळ सेवेसाठी दिला. त्यांनी साधकांना ‘ग्रंथ जलद गतीने कसे मोजायचे ?’, यांसह ‘अनेक लहान-लहान सेवा अल्प कालावधीत आणि अचूक कशा करायच्या ?’, हे शिकवले.

३. पू. भाऊ परब ‘ज्ञानशक्ती प्रसार अभियाना’साठी प्रतिदिन ५ वेळा करत असलेली भावपूर्ण प्रार्थना !

‘धर्मसंस्थापक भगवान श्रीकृष्ण आणि श्रीमन्नारायण स्वरूप गुरुदेव, ‘आपल्या अपार कृपेमुळे समाजात ज्ञानशक्तीचा प्रसार करण्याचे दैवी अभियान राबवण्याची मोठी संधी आम्हा सर्व साधक-जिवांना मिळाली आहे’, त्याबद्दल आम्ही तुमच्या कोमल चरणी कोटीशः कृतज्ञ आहोत. गुरुदेवा, ‘या दैवी अभियानात आम्हाला संपूर्णपणे सहभागी होता येऊ दे. ग्रंथसंपदेच्या माध्यमातून समाजामध्ये ज्ञान आणि चैतन्य पसरून समाजातील वातावरण शुद्ध होऊ दे. अधिकाधिक लोकांना या ग्रंथांचा लाभ घेता येऊ दे. ही ग्रंथसंपदा ज्या ज्या ठिकाणी जाणे आपल्याला अपेक्षित आहे, त्या त्या ठिकाणी जाण्यासाठी तुम्हीच आम्हाला मार्गदर्शन करा. या अभियानात येणार्‍या अडचणी दूर होऊ देत’, अशी आपल्या चरणी प्रार्थना !

४. पू. भाऊ परब यांच्या संदर्भात साधकांना आलेल्या अनुभूती

अ. पू. भाऊकाका, म्हणजे भावाचे मूर्तीमंत रूप आहेत. त्यांच्या तोंडवळ्यावरील प्रसन्न आणि निर्मळ हास्याने सेवेतील साधकांना सतत ऊर्जा मिळते.

आ. साधकांना दीर्घकाळ सेवा करूनही थकवा जाणवत नाही.

परात्पर गुरुदेव आणि पू. भाऊकाका यांच्या चरणी आम्ही कृतज्ञ आहोत.’

– कोल्हापूर सेवाकेंद्रातील सर्व साधक (१७.१२.२०२१)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक