रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील ध्यानमंदिरातील चैतन्याची साधकाला आलेली प्रचीती !

‘५.२.२०२२ या दिवसापासून देवाच्या कृपेने मी रामनाथी आश्रमातील ध्यानमंदिराची स्वच्छता (केर काढणे आणि लादी पुसणे) करत आहे.

श्री. सुरेश कदम

१. स्वतःवर पुष्कळ मासांपासून असलेले आवरण ध्यानमंदिरातील चैतन्यामुळे दूर होऊन हलकेपणा जाणवणे

मी ही सेवा चालू केल्यानंतर दुसर्‍याच दिवसापासून (६ फेब्रुवारीपासून) मला आश्रमात होत असलेल्या यज्ञाच्या वेळी यज्ञस्थळी १ घंटा बसल्यावर ज्याप्रमाणे हलकेपणा जाणवतो, त्याप्रमाणे हलकेपणा जाणवू लागला. ‘माझ्यावर पुष्कळ मासांपासून असलेले आवरण दूर झाले आहे’, असे मला जाणवले.

२. ‘रामनाथी आश्रमातील ध्यानमंदिरात पुष्कळ चैतन्य आहे’, हे दाखवून देणारा एक प्रसंग

२ अ. एका मुलीने ध्यानमंदिराच्या दारातच बसणे आणि ती आत यायला सिद्ध नसणे, ‘तिला ध्यानमंदिरातील चैतन्य सहन होत नसावे’, असे वाटणे अन् २० मिनिटांनी त्या मुलीने देवतांना नमस्कार करून तेथून जाणे : १६.५.२०१८ या दिवशी मी ध्यानमंदिरात बसून नामजप करत होतो. त्या वेळी एका साधिकेने तिच्या ८ ते १० वर्षे वयाच्या मुलीला हाताला पकडून ओढत ध्यानमंदिरात आणून बसवले. त्या वेळी सकाळची ९ वाजून १० मिनिटे झाली असावीत. ती मुलगी आत यायला सिद्ध नव्हती. त्या साधिकेने (बहुधा ती तिची आई असावी) कसेतरी तिला बसवले. ती मुलगी ध्यानमंदिराच्या दारातच (उंबरठ्यावर) बसली. ती साधिका तेथून निघून गेली. ती मुलगी तेथे बसून जवळजवळ २० मिनिटे सतत डोळ्यांची उघडझाप करत होती. ‘तिला ध्यानमंदिरातील चैतन्य सहन होत नसावे’, असे मला वाटले. ती तशीच २० मिनिटे बसली. नंतर ती आनंदाने देवतांकडे पहात हात जोडून नमस्कार करून गेली.

२ आ. त्या साधिकेने ९ वाजून ४० मिनिटांनी त्या मुलीला पुन्हा हाताला धरून आणले. या वेळी मात्र ती मुलगी सहजतेने ध्यानमंदिरात आली आणि स्वतः आसन घेऊन रांगेत बसली. ती १० वाजेपर्यंत स्थिर राहून देवतांकडे पहात होती आणि आनंदाने हसत होती.

२ इ. तिने १० वाजून १० मिनिटांनी आसन व्यवस्थित घडी करून ठेवले आणि देवतांना भावपूर्ण नमस्कार करून ती आनंदाने बाहेर गेली.

२ ई. या प्रसंगातून ‘ध्यानमंदिरात पुष्कळ चैतन्य आहे’, हे देवाने मला दाखवून दिले. पुष्कळ प्रमाणात आध्यात्मिक त्रास असणार्‍या मुलीमध्ये देवाने केवळ ४० मिनिटांत एवढा पालट केला. त्या मुलीचा काळसर असलेला चेहरा ती ध्यानमंदिरातून बाहेर जातांना गोरा झाला होता.

३. कृतज्ञता

आता तर या ४ वर्षांत ध्यानमंदिरातील चैतन्य आणखी वाढले आहे. एवढी वर्षे येथे राहून मला तसे चैतन्य अनुभवता आले नाही; म्हणून देवाने हा प्रसंग घडवून मला दाखवून दिले. त्याबद्दल कोटीशः कृतज्ञता !’

– श्री. सुरेश कदम, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१५.३.२०२२)

आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.