विधान परिषद कामकाज
नागपूर – नागपूर-शिर्डी करण्यात आलेला समृद्ध महामार्ग हा विदर्भ आणि मराठवाडा यांच्या विकासाची जीवनवाहिनी आहे. या महामार्गामुळे येणार्या ४ वर्षांत विदर्भाचे चित्र पालटणार आहे. या पुढील काळात नागपूर, वर्धा यांचा विकास झालेला दिसेल. संभाजीनगर-जालना यांचा विकास केवळ या रस्त्यामुळे होईल. वैधानिक विकास मंडळांमुळे विदर्भ-मराठवाडा यांना न्याय मिळत होता; मात्र दुदैवाने गेल्या सरकारने वर्ष २०२० मध्ये ही मंडळे बंद केली. आम्ही यांना पुनर्जिवित केले असून राज्यपालांनी याला संमती दिली असून लवकर राष्ट्रपतींची त्या प्रस्तावावर स्वाक्षरी होईल, अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत दिले. ते विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि अन्य सदस्य यांनी नियम २६० अन्वये उपस्थित केलेल्या प्रस्ताव चर्चेवर बोलत होते.
सत्ताधारी आणि विरोधी पक्षांनी विविध विषयांवर उपस्थित केलेल्या चर्चांना विधानपरिषदेत उत्तर…#WinterSession #Nagpur #Maharashtra #WinterSession2022 https://t.co/AbpcKxgCAJ
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) December 29, 2022
१. आम्ही विदर्भ-मराठावाडा औद्योगिक विकासासाठी गेल्या ६ मासांत मोठ्या प्रमाणात कामे केली आहेत. महाराष्ट्रात आलेल्या ७० सहस्र कोटी रुपयांच्या गुंतवणुकींपैकी ४४ सहस्र १२३ कोटी गुंतवणूक एकट्या विदर्भात केली जाणार आहे. ज्याद्वारे ४५ सहस्र युवकांना रोजगार मिळणार आहे.
२. चंद्रपूर जिल्ह्यासाठी विशेष गुंतवणूक आली आहे. भंडारा जिल्ह्यातील जलसिंचन प्रकल्पांसाठी ३३६ कोटी रुपयांची मान्यता देण्यात आली आहे.
३. यापुढील काळात नागपूर-गोवा हा नवा महामार्ग बांधणार आहोत. हा महामार्ग झाल्यामुळे मराठवाड्याचे समृद्धीकरण होईल. विदर्भासाठी सरकार नवीन खनिज धोरण निर्माण करत आहोत.
४. यापुढील काळात विदर्भात सौर ऊर्जेसाठी ४ सहस्र कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार आहे.
५. शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी आम्ही कृषी संजीवनी योजना आणली. यात ४ सहस्र कोटी रुपयांची जागतिक बँकेची गुंतवणूक होती. विदर्भ-मराठवाड्यातील १५ जिल्ह्यांतील ५ सहस्र २२० गावांमध्ये ही योजना राबवण्यात आली. यातून जागतिक बँकेचे समाधान झाल्याने आता टप्पा क्रमांक २ संमत झाला असून परत एकदा ५ सहस्र २२० गावांसाठी ६ सहस्र कोटी रुपये यापुढील काळात देण्यात येणार आहे.
६. येणार्या काळात केंद्र सरकारकडून सिंचनासाठी २५ सहस्र कोटी रुपये मिळणार असून ५ लाख ३७ सहस्र हेक्टर भूमी सिंचनाखाली येणार आहे. याचा मोठा लाभ विदर्भ-मराठवाडा यांना होणार आहे.
७. केंद्राने राज्याच्या वीज विकासासाठी ३९ सहस्र कोटी रुपये संमत केले असून त्यातील ९ सहस्र कोटी रुपयांच्या वीजसुधारणा एकट्या विदर्भात करण्यात येणार आहे.
८. आदिवासी पाड्यांसाठी आम्ही काही वेगळ्या योजना सिद्ध करत आहोत. यामुळे आदिवासी पाडे मुख्य प्रवाहात येतील.
९. यापुढील काळात होणारा वैशिष्टपूर्ण असा वैनगंगा-नळगंगा प्रकल्प मराठवाड्यासाठी ‘गेम चेंजर’ (पालट घडवणारे) ठरणार आहे.