भारताला लुटणार्‍यांनी भारताला शहाणपणा शिकवू नये ! – जर्मन लेखिका मारिया वर्थ

मारिया वर्थ

नवी देहली – भारताला लुटणार्‍या ब्रिटिशांनी भारताला शहाणपण शिकवण्याचे धाडस करू नये. हे अत्यंत वेदनादायी आहे, असे ट्वीट प्रसिद्ध जर्मन लेखिका आणि हिंदु धर्माच्या गाढ्या अभ्यासक मारिया वर्थ यांनी केले आहे. या ट्वीटसमवेत त्यांनी एक अत्यंत अभ्यासपूर्ण व्हिडिओही जोडला आहे.

या व्हिडिओमध्ये सांगण्यात आले आहे की, २० व्या शतकाच्या शेवटापर्यंत भारतातील मागासलेपणाला हिंदु धर्म कारणीभूत असल्याचा गवगवा करण्यात येत होता; परंतु प्रा. अँगस मॅडिसन यांच्या अध्यक्षतेखाली ३६ श्रीमंत देशांच्या ‘आर्थिक विकास आणि सहकार्य संघटने’ने एक अहवाल प्रसिद्ध केला. त्यामध्ये जागतिक अर्थव्यवस्थेचा गेल्या २ सहस्र वर्षांचा अभ्यास करण्यात आला होता. त्यानुसार जागतिक स्तरावर ख्रिस्त पूर्व १ ते १००० या १ सहस्र वर्षांत भारताचे सकल देशांतर्गत उत्पादन हे जगाच्या तब्बल ३४.८ टक्के होते, तसेच वर्ष १७५७ मध्ये म्हणजे भारतावर ब्रिटनने आक्रमण करण्याच्या आधीपर्यंत हे प्रमाण २४ टक्क्यांहूनही अधिक होते. ब्रिटनने मात्र भारतावर आक्रमण केल्यावर, तसेच विविध दुष्काळांत भारताची एक तृतीयांश जनता मृत्यूमुखी पडल्यावरही ब्रिटनचा पैसा अनेक पटींनी वाढतच गेला. वर्ष १९०० येता-येता भारताचे उत्पादन हे जागतिक स्तरावर केवळ १.७ टक्केच राहून गेले, तर वर्ष १७५७ मध्ये जागतिक टक्केवारीत केवळ २.१ टक्के असलेले ब्रिटनचे उत्पादन हे वर्ष १९०० मध्ये १८.५ टक्क्यांच्या वर पोचले. यावरून त्याने भारताला किती प्रमाणात लुटले, हे दिसून येते. सिंधु संस्कृतीच्या काळापासून औद्योगिक कामांवर आधारलेली भारतीय अर्थव्यवस्था ब्रिटनने आक्रमण केल्यावर शेतीवर अवलंबून झाली. भारत भुकेकंगाल होत गेला. (भारताच्या नूतन शैक्षणिक नीतीच्या अंतर्गत हे वास्तव शिकवले जाईल आणि ‘पाश्‍चात्त्य देश हे भारताचे शत्रू कसे आहेत’, हे सोदाहरण स्पष्ट केले जाईल, अशी अपेक्षा ! – संपादक)

संपादकीय भूमिका 

जे एका जर्मन लेखिकेच्या लक्षात येते, ते भारतातील एकातरी पत्रकार, लेखक, अभ्यासक यांना कसे लक्षात येत नाही ? ही मंडळी केवळ ‘पुरस्कार वापसी’चे ढोंग करून भारताचे लचके तोडण्यासाठी कार्यरत आहेत. अशांना आता जाब विचारण्याची आवश्यकता आहे !