‘‘डॉक्टर, ३-४ वर्र्षांपूर्वी माझी मासिक पाळी थांबली; पण गेल्या ६ मासांपासून अधूनमधून खाज सुटते आणि मधूनच आग आग होते. शारीरिक संबंधांच्या वेळी तर इतका त्रास होतो की, तो विषय संपल्यासारखाच आहे आमच्यात. मग सारखी चिडचिड, धुसफूस…’’ रुग्णाच्या डोळ्यांत पाणी तरळलं. पाळी थांबल्यानंतर स्त्रियांना योनीमार्गाचे विविध त्रास होऊ शकतात. बर्याच वेळा लाजेस्तव ही दुखणी अंगावर काढली जातात. खरेतर या सगळ्या दुखण्यांवर उत्तम उपाय उपलब्ध आहेत. उगाचच कष्ट करून घेण्यात अर्थ नाही, हे स्त्रियांनी समजून घ्यायला हवे.
१. रजोनिवृत्तीनंतरच्या समस्या बर्या करून घेण्यासाठी वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक !
रजोनिवृत्ती (‘मेनोपॉज’) नंतर शरिरात हार्मोन्सचे प्रमाण अल्प होत जाते. योनीमार्गाच्या आवरणाचे स्वास्थ्य हे हार्मोन्सवर अवलंबून असते. हार्मोन्समुळे तो ओलसर आणि मऊ असतो. रजोनिवृत्तीनंतर हार्मोन्सच्या कमतरतेमुळे योनीमार्ग कोरडा पडू लागतो आणि तेथील त्वचा पातळ होऊन हुळहुळी होऊ लागते. त्यामुळे खाज सुटणे, आग होणे अशा समस्या निर्माण होतात. शारीरिक संबंधांच्या वेळी आग झाल्यामुळे तेही अशक्य होऊन बसते. काही मलमे, तसेच काही प्रकरणांमध्ये गोळ्या वापरून ही समस्या पूर्ण बरी करता येते. यासाठी स्त्रीरोगतज्ञांचा सल्ला आणि नियमित तपासणी अत्यावश्यक आहे.
२. जंतूसंसर्गाची तपासणी स्त्रीरोगतज्ञांकडून करून घेतल्यास पुढील कष्ट वाचणे
रजोनिवृत्तीच्या काळात सध्या बर्याच स्त्रियांना मधुमेह असतो. तो नियंत्रणात नसेल, तर लघवी (युरिनरी ट्रॅक्ट इन्फेकशन्स) आणि योनीमार्ग (वेजिनिटीज) या दोन्हींचे जंतूसंसर्ग सतत होत रहातात. त्यामुळे ते पुष्कळ त्रासदायक ठरते. बर्याच वेळा जंतूसंसर्ग नेमका लघवीचा आहे ? कि योनीमार्गाचा आहे ? हे कळण्यात गोंधळ होतो. योनीमार्गातून पांढरा स्राव लघवीत मिसळतो आणि ‘लघवीमध्ये ‘पस शेल्स’ (मूत्रातील पू पेशी) आहेत’, असा अहवाल येतो. स्त्रिया स्त्रीरोगतज्ञांकडे न जाता केवळ लघवीचा अहवाल कौटुंबिक वैद्यांना (फॅमिली डॉक्टरांना) दाखवून प्रतिजैविके (ॲन्टीबॉयोटिक्स) घेत रहातात. आवश्यकता नसतांना प्रतिजैविके घेतल्याने त्रास अल्प न होता योनीमार्गाचा संसर्ग वाढायला लागतो. त्यामुळे स्त्रीरोग तज्ञांकडे वेळीच योग्य तपासणी केली, तर पुढचे सगळे व्याप वाचतात. वेळोवेळी सांगूनही रुग्ण मधुमेहाची ‘एच्बीए १ सी’ (Hba1C) ही तपासणी करत नाहीत. त्यामुळे मधुमेह नियंत्रणात आहे कि नाही ? हे कळणे अवघड होते. त्यानंतर लघवी आणि योनीमार्ग यांचे त्रास बरे होतच नाहीत; म्हणून स्त्रियांची चिडचिड होते.
३. सतत होणार्या लघवीच्या संसर्गासाठी केवळ प्रतिजैविक घेणे धोकादायक !
सतत होणारा लघवीचा संसर्ग ही या वयात दिसून येणारी समस्या आहे. सतत लघवी लागल्यासारखे वाटणे, लघवी करतांना जळजळ होणे, पोटात दुखणे आणि थंडी वाजून ताप येणे, अशी विविध लक्षणे या संसर्गामध्ये दिसतात. यावर परत एकदा रुग्ण स्वतःच्या मनाने प्रतिजैविकांच्या १-२ गोळ्या घेतात आणि सोडून देतात. हे अतिशय धोकादायक आहे. त्यामुळे संसर्गाला कारणीभूत असणारे विषाणू प्रतिजैविकांना निर्ढावतात आणि पुढच्या वेळी ते या प्रतिजैविकांना अजिबात भीक घालत नाहीत. असे होत शेवटी साध्या औषधांना दाद न देणारे विषाणू निर्माण होतात. सतत होणारा लघवीचा संसर्ग किडनीपर्यंत पोचू शकतो. एकदा किडनीचा संसर्ग झाला की, परिस्थिती गंभीर होते. वेळीच योग्य वैद्यकीय सल्ला घेतला, तर हे सगळे सहज टाळण्यासारखे आहे.
तर मैत्रिणींनो, आरोग्यविषयीच्या साध्या साध्या समस्या अंगावर काढून स्वत:चे हाल करून घेऊ नका. चाळीशीनंतर स्वत:चे आरोग्य जपणे, ही सर्वांत मोठी गुंतवणूक आहे, जी तुम्हाला आयुष्यभर साथ देईल. पटते का बघा !’
– डॉ. शिल्पा चिटणीस-जोशी, स्त्रीरोग आणि वंध्यत्व तज्ञ, कोथरूड, पुणे. (२३.१२.२०२२)