‘ऑनलाईन’ साधना सत्संगा’त उपस्थित रहाणार्‍या जिज्ञासूंनी केलेले प्रयत्न, त्यांना स्वतःत जाणवलेले पालट आणि आलेल्या अनुभूती !

‘वर्ष २०१९ च्या शेवटी आलेल्या कोरोना महामारीच्या कालावधीत जगभरात दळणवळण बंदी लागू झाली. अनेक ठिकाणी कौटुंबिक समस्यांमध्ये वाढ होऊन जीवन तणावपूर्ण झाले होते. ‘सर्वांना नवसंजीवनी मिळावी’, यासाठी सनातन संस्थेद्वारे ‘ऑनलाईन’ साधना सत्संगा’चे आयोजन करण्यात आले होते.

सौ. मनीषा पाठक

सनातनच्या धर्मप्रचारक सद्गुरु स्वाती खाड्ये ‘साधना सत्संगा’तील जिज्ञासूंना जोडून ठेवण्यासाठी कसे प्रयत्न करायला हवेत ?’, याविषयी सत्संगसेवकांना सतत मार्गदर्शन करून साधना सत्संगाच्या सत्संगसेवकांना घडवतात. (२७.१२.२०२२ या दिवशी या लेखाचा काही भाग पाहिला. आज पुढील भाग पाहू.)

– सौ. मनीषा महेश पाठक (आध्यात्मिक पातळी ६९ टक्के), पुणे. (२९.८.२०२२) (भाग ३)

या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी या लिंकवर क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/639887.html

५. सांगली

५ अ. सौ. जयश्री हट्टे, कूपवाड, जिल्हा सांगली.

५ अ १. यजमान रुग्णाईत असतांना नामजप केल्याने यजमानांना दोन दिवसांतच बरे वाटू लागणे : ‘साधना सत्संगात सहभागी व्हायला लागल्यापासून मला अनेक अनुभूती आल्या. माझे यजमान श्री. शंकर हट्टे रुग्णाईत असतांना मी सत्संगसेवकांनी सांगितल्याप्रमाणे नामजप केला, तसेच ‘त्यांच्यासाठी नामजप लावून ठेवणे आणि त्यांची मानस दृष्ट काढणे’, असे प्रयत्न केले. त्यामुळे यजमानांना दोन दिवसांतच बरे वाटू लागले. तेव्हा माझा कृतज्ञताभाव जागृत झाला.

६. कोल्हापूर

६ अ. सौ. कांचन महेश पवार, कोल्हापूर

सौ. कांचन महेश पवार

६ अ १. साधिका आणि तिचे यजमान यांनी सत्संग ऐकून साधना चालू करणे : ‘आरंभी केवळ मीच सत्संगात सहभागी होत असे; पण नंतर माझे यजमान डॉ. महेश पवार यांनीही ४ मास नियमितपणे सत्संग ऐकला. विशेष म्हणजे त्यांनीही साधना चालू केली. आता आम्ही दोघेही साधना सत्संगात नियमित सहभागी होतो. आम्ही दोघे ‘नामजप करणे, स्वयंसूचना सत्र (स्वभावदोष न्यून होण्यासाठी दिवसातून ४ – ५ वेळा मनाला दिलेल्या सूचना) करणे’, असे साधनेचे प्रयत्न करत आहोत. आम्ही दोघेही सत्संगामध्ये सांगितलेली सर्व सूत्रे तत्परतेने पूर्ण करतो.

६ अ २. सत्संगात सत्सेवेचे महत्त्व समजल्यापासून साधिका आणि तिचे यजमान करत असलेल्या विविध सेवा : सत्संगामध्ये सत्सेवेचे महत्त्व ऐकल्यापासून मी ५ फलकांवर राष्ट्र आणि धर्म जागृतीपर लिखाण करण्याची सेवा करण्यास प्रारंभ केला. गरोदरपणात ८ वा मास चालू असेपर्यंत मी फलकलेखनाची सेवा केली. डॉ. महेश पवार ‘त्यांच्या रुग्णालयात आलेल्या रुग्णांना साधना आणि नामजप यांचे महत्त्व सांगणे, रुग्णालयात नामजप लावणे, रुग्णालयात वितरणासाठी ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने यांचे प्रदर्शन लावणे, मंदिरांमध्ये नामजप लावण्यासाठी प्रयत्न करणे’, यांसाठी प्रयत्न करतात. ते रुग्णांना तपासायला जातांना सनातनचे ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने समवेत नेऊन रुग्णांना साधना करायला सांगतात. ‘प्रत्येक प्रसंगातून आमच्याकडून साधना व्हावी’, असा आम्हा दोघांचाही भाव असतो.’

६ आ. सौ. सुगंधा रामचंद्र गायकवाड (वय ६५ वर्षे), कोल्हापूर

सौ. सुगंधा रामचंद्र गायकवाड

६ आ १. स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया समजून घेऊन सारणी लिखाण करणे : ‘मी सत्संगात सांगितलेल्या प्रत्येक सूत्राप्रमाणे कृती करण्याचा प्रयत्न करते. मला वाटत होते, ‘मला स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया राबवायला जमणार नाही’; पण माझा सत्संगसेवकांशी नियमित संपर्क होत असल्याने ‘ही प्रक्रिया सहजतेने कशी करू शकते ?’, हे मला शिकायला मिळाले. मी प्रतिदिन सारणी लिखाण करायलाही आरंभ केला आहे.

६ इ. सौ. आसावरी एरंडे, नागाळा पार्क, कोल्हापूर.

सौ. आसावरी एरंडे

६ इ १. स्वभावदोष न्यून होण्यासाठी स्वयंसूचना दिल्यावर स्वभावदोष न्यून होऊन साधना मनापासून केली जाणे : ‘मी मागील ८ वर्षांपासून सनातनच्या अध्यात्मप्रसाराच्या कार्यात सहभागी होत आहे; मात्र मी साधना सत्संगात सहभागी व्हायला लागल्यापासून व्यष्टी साधना मनापासून करू लागले. पूर्वी ‘माझे काही चुकत नाही’, अशी माझी विचारप्रक्रिया असायची. ‘परिस्थितीला दोष देणे, उतावीळपणा’ इत्यादी स्वभावदोष दूर होण्यासाठी मी स्वयंसूचना सत्रे करून प्रयत्न केले. आता माझ्यातील उतावीळपणा न्यून झाला असून ‘माझे कुठे चुकत आहे ? मी कुठे न्यून पडते ?’, अशी माझी विचारप्रक्रिया होत आहे. साधना सत्संगात सांगितल्यापासून माझे भावजागृतीचे प्रयत्न वाढले आहेत. प्रत्येक कृती भावपूर्ण करण्याचा माझा प्रयत्न असतो.

६ इ २. साधना सत्संगातून प्रेरणा मिळाल्यामुळे मी ‘सनातनचे ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने यांचे वितरण करणे, समाजात जाऊन अर्पण अन् नामजप यांचे महत्त्व सांगून प्रवचनांचे आयोजन करणे’, अशा सेवा नियमितपणे करत आहे.’

६ ई. सौ. राजश्री तळप, इचलकरंजी, जिल्हा कोल्हापूर.

सौ. राजश्री तळप

६ ई १. पूर्वजांच्या त्रासामुळे घरात व्यसनाधीनता आणि तणावाचे वातावरण असणे : ‘मी मागील ८ वर्षांपासून सनातनच्या कार्यात सहभागी होत आहे. आमच्या कुटुंबातील पूर्वजांना गती न मिळाल्यामुळे संपूर्ण कुटुंबाला विविध आध्यात्मिक त्रास होत असतात. आध्यात्मिक त्रासांच्या तीव्रतेमुळे नरसोबाच्या वाडीला जातांना माझ्या सासर्‍यांचा अपघात झाला होता. आमच्या घरामध्ये व्यसनाधीनता असून तणावाचे वातावरण असते.

६ ई २. सत्संगातून साधनेचे दृष्टीकोन शिकायला मिळणे आणि त्याप्रमाणे प्रयत्न चालू करणे : मी साधना सत्संगात सहभागी व्हायला लागल्यापासून मला साधनेचे विविध दृष्टीकोन शिकायला मिळाले. ‘भावजागृतीतून साधना’ हा विषय कळल्यावर मी भावाच्या स्तरावरील प्रयत्न वाढवले.

६ ई ३. अनुभूती – पितृपक्षात दत्ताचा नामजप करत असतांना ‘प.पू. गुरुदेव पूर्वजांना जेवायला घालत असून सर्व पूर्वज तृप्त झाले आहेत’, असे जाणवणे आणि त्यानंतर घरातील व्यसनाधीनता न्यून होऊन तणावाचे वातावरण निवळणे : वर्ष २०२० मधील पितृपक्षात मी पुरोहितांना शिधा दिला. तेव्हा मी ‘तो शिधा प.पू. गुरुदेवांच्या चरणी अर्पण करत आहे’, असा भाव ठेवला. मी तळमळीने ‘श्री गुरुदेव दत्त ।’, हा नामजप करत असतांना मला ‘प्रत्यक्ष प.पू. गुरुदेव पूर्वजांना जेवायला घालत असून सर्व पूर्वज तृप्त आणि समाधानी झाले आहेत. ते माझ्या मुलावर पुष्पवृष्टी करून त्याला आशीर्वाद देत आहेत’, अशी अनुभूती आली. त्यानंतर माझ्या घरातील व्यसनाधीनता न्यून होऊन तणावाचे वातावरणही निवळले. तेव्हापासून मी नियमित व्यष्टी साधना करत असून सर्व समष्टी सेवांमध्ये तळमळीने सहभाग घेते.’

६ उ. सौ. नम्रता अंदरघिस्के, इचलकरंजी, जिल्हा कोल्हापूर.

सौ. नम्रता अंदरघिस्के

६ उ १. सद्गुरु स्वाती खाडये यांनी ‘ऑनलाईन’ भेटीत सांगितल्यानुसार दत्ताचा नामजप चालू केल्यावर नामजप करतांना होणारे त्रास न्यून होणे : ‘मी मागील ६ मासांपासून नामसत्संग ऐकत आहे. आता मी साधना सत्संगात सहभागी होत आहे. आरंभी माझ्या मनातील नकारात्मकतेमुळे बसून नामजप करतांना माझ्या मनाची एकाग्रता होत नसे. सत्संगसेवकांनी मला यावर स्वयंसूचना सत्र करण्यास सांगितले. स्वयंसूचनेमुळे माझ्या मनातील नकारात्मकता न्यून होऊन सेवेचा उत्साह वाढला. नंतर मी सद्गुरु स्वाती खाडये यांच्याशी झालेल्या ‘ऑनलाईन’ भेटीमध्ये त्यांच्याशी बोलले. त्यांनी मला दत्ताचा नामजप करायला सांगितला. त्याप्रमाणे मी दत्ताचा नामजप चालू केल्यावर माझे त्रास हळूहळू न्यून झाले.

६ उ २. सध्या करत असलेली सेवा : माझा ‘ऑनलाईन’ व्यवसाय आहे. सत्संगसेवकांनी त्या व्यवसायाच्या माध्यमातून ‘ग्राहकांना साधना सांगता येऊ शकते’, असे सुचवले. त्याप्रमाणे मी ग्राहकांना ‘साधना सांगणे, त्यांच्यासाठी प्रवचनांचे आयोजन करणे आणि त्यांना सात्त्विक उत्पादनांचे महत्त्व सांगून त्यांचे वितरण करणे’ इत्यादी सेवा करत आहे.’

७. गोवा

७ अ. सौ. दीपा बेतकीकर, ढिगणे, पर्वरी, गोवा.

७ अ १. स्वभावदोष-निर्मूलनासाठी प्रयत्न केल्यावर स्वतःमध्ये सकारात्मक पालट झाल्याने आनंद वाटणे : ‘काही वर्षांपूर्वी मला सेवेची संधी मिळाली होती. त्यानंतर काही कारणाने माझ्या सेवेत खंड पडला. प.पू. गुरुदेवांच्या कृपेने मी ‘ऑनलाईन’ साधना सत्संगात सहभागी होऊ लागल्यामुळे माझी साधना आणि सेवा यांना पुन्हा गती मिळाली. माझ्यातील भीती आणि आळस न्यून होऊन ‘आनंदात कसे रहायचे ?’, हे मला समजले. स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाच्या प्रक्रियेमुळे ‘मनातील इतरांविषयीचे वाईट विचार न्यून होणे, रागावर नियंत्रण ठेवणे आणि अपेक्षा न्यून होणे’, असे पालट माझ्यात होत आहेत. माझे शरीर आणि मन यांना शिस्त लागली. सत्संगातून मिळत असलेले ज्ञान अतिशय मूल्यवान असूनही ते विनामूल्य मिळत आहे. हे सर्व प.पू. गुरुदेवांच्या कृपेने मिळत असल्याबद्दल मी त्यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करते आणि ‘मी प्रयत्न करण्यास न्यून पडते’, यासाठी त्यांच्या चरणी क्षमायाचना करते.’

७ आ. श्रीमती मंदा देसाई, काणकोण, गोवा.

७ आ १. स्वभावदोष-निर्मूलनासाठी प्रयत्न केल्यावर स्वतःमध्ये पुष्कळ पालट होणे आणि त्यामुळे परात्पर गुरु डॉक्टरांप्रती कृतज्ञता वाटणे : ‘साधना सत्संगात सांगितलेली स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया राबवल्यामुळे माझ्यामध्ये पुष्कळ सकारात्मक पालट झाला आहे. माझ्याकडून होणार्‍या चुकांमधून मला माझ्यातील स्वभावदोष लक्षात येत आहेत. त्यामुळे माझा प.पू. गुरुदेवांप्रती कृतज्ञताभाव वाढला आहे.

७ आ २. अनुभूती – घरामध्ये सुगंध आणि प.पू. गुरुदेवांचे अस्तित्व जाणवणे : मागील ६ मासांपासून मी एकाच आसंदीवर बसून नामजपादी उपाय करते आणि सत्संग ऐकते. तिथे कोणतीही उदबत्ती लावलेली नसतांना मला अनेकदा त्या आसंदीतून चंदनाचा सुगंध येतो आणि घरामध्ये प.पू. गुरुदेवांचे अस्तित्व सतत जाणवते.’

(समाप्त)

(सर्व सूत्रांचा दिनांक : ७.९.२०२२)

या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक