व्यायाम हे ‘उरकण्याचे काम’ नसून ते ‘आवडीने करण्याचे नित्यकर्म’ व्हायला हवे !

निरोगी जीवनासाठी आयुर्वेद : लेखांक ११८

वैद्य मेघराज पराडकर

‘तुम्ही प्रतिदिन व्यायाम करता का ?’, असे विचारल्यावर बरेच जण सांगतात, ‘आम्ही ३० मिनिटे चालतो. १५ मिनिटे प्राणायाम करतो इत्यादी’; मात्र ‘व्यायामाच्या फलनिष्पत्तीचा अभ्यास करता का ?’, असे विचारल्यावर त्यांच्याकडे काही उत्तर नसते. ते केवळ कर्मकांड म्हणून व्यायाम उरकत असतात. ‘व्यायाम करत असतांना स्वतःच्या शरिराची कार्यक्षमता आधीच्या तुलनेत वाढत आहे ना’, याकडे ठराविक कालावधीने लक्ष द्यायला हवे. यासाठी थोड्या थोड्या मात्रेत व्यायाम वाढवून पहायला हवे, उदा. प्रतिदिन ४ सूर्यनमस्कार घालून आपल्याला दमायला होत नसेल, तर ‘आठवड्याभराने ४ ऐवजी ६ सूर्यनमस्कार घालू शकत आहोत का ?’, हे पडताळायला हवे. ‘५०० ग्रॅम वजनाचे ‘डंबेल्स’ घेऊन व्यायाम करत असू, तर आठवड्याभराने ७०० ग्रॅम वजनाचे ‘डंबेल्स’ घेऊन व्यायाम करू शकतो का ?’, असा अभ्यास करायला हवा. व्यायाम हे ‘उरकण्याचे काम’ नसून ते ‘आवडीने करण्याचे नित्यकर्म’ व्हायला हवे.’

– वैद्य मेघराज माधव पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२४.१२.२०२२)

व्यायाम करून तुम्हाला झालेले लाभ [email protected] या ई-मेल पत्त्यावर अवश्य कळवावेत.