जगाला जेव्हा ‘लैंगिक समानता’ ठाऊक नव्हती, तेव्हा भारतात गार्गी, मैत्रेयी, अत्रेयी यांसारख्या विदुषी शास्त्रार्थ करत होत्या !

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन !

पंतप्रधान नरेंद्र मोदी

राजकोट (गुजरात) – ज्या काळामध्ये जगामध्ये ‘लैंगिक समानता’ या शब्दाचा जन्मही झाला नाही, तेव्हा आपल्याकडे गार्गी, मैत्रेयी, अत्रेयी यांसारख्या विदुषी शास्त्रार्थ करत होत्या, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. ते येथील ‘श्री स्वामीनारायण गुरुकुल राजकोट संस्थान‘च्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ऑनलाईन बोलत होते.

पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले की, आम्ही शून्य ते अनंतापर्यंत प्रत्येक क्षेत्रात संशोधन करून निष्कर्ष काढले आहेत. ज्या काळात जगामध्ये राजपरिवारांवरून देशांची ओळख होत असे, तेव्हा भारतभूमीला गुरुकुलांमुळे ओळखले जात होते. गुरुकुल म्हणजे गुरूंचे कुळ !  नालंदा आणि तक्षशिला यांसारखी विश्‍वविद्यालये आमच्या गुरुकुल परंपरेचे वैश्‍विक वैभव होते. आधुनिक भारतात ही पुरातन परंपरा वाढवण्यासाठी स्वामीनारायण गुरुकुल ‘कन्या गुरुकुला’ची स्थापना करत आहे. गेल्या ७५ वर्षांत या गुरुकुलाने विद्यार्थ्यांमध्ये चांगल्या विचारांचे बीजारोपण केले आहे, जेणेकरून त्यांचा समग्र विकास होईल.