हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजित ‘अफझलखान वध : शत्रूबोध आणि शिवरायांची कूटनीती’ या विषयावर ‘ऑनलाईन’ विशेष संवाद !
मुंबई – छत्रपती शिवाजी महाराज यांची युद्धनीती आज शालेय अभ्यासक्रमात शिकवली गेली पाहिजे, तसेच छत्रपती शिवरायांची राजकीय दृष्टी आज हिंदु समाजाला दिली पाहिजे. प्रभु श्रीरामचंद्रापासून आजच्या क्रांतीकारकांपर्यंत सगळ्यांचा इतिहास शालेय अभ्यासक्रमात शिकवल्यासच मुलांच्या स्वराज्याच्या रक्षणासाठी मुठी वळू शकतील. स्वराज्य आणि संस्कृती यांच्या रक्षणासाठी प्रार्णापण करण्यासाठी हिंदू सिद्ध होतील आणि हेच खरे जीवन आहे, असे प्रतिपादन डोंबिवली येथील प्रसिद्ध हिंदुत्वनिष्ठ व्याख्याते आणि लेखक श्री. दुर्गेश परुळकर यांनी केले.
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘अफझलखान वध : शत्रूबोध आणि शिवरायांची कूटनीती’ या विषयावर आयोजित केलेल्या ‘ऑनलाईन’ विशेष संवादात ते बोलत होते.
श्री. परुळकर पुढे म्हणाले की, राष्ट्र आणि परंपरा यांविषयी अभिमान असणे, हे शासनकर्त्यांचे सर्वांत मोठे बळ आहे, अन्यथा आपण शत्रूच्या विरोधात लढण्याऐवजी अहिंसेची वाट पत्करू. छत्रपती शिवाजी महाराज यांनी लढलेली युद्धे ही राजकीय नव्हती, तर ती धर्म आणि संस्कृती यांच्या विरोधातील होती. छत्रपती शिवरायांनी ‘हा देश माझा आहे’, ही भावना समाजात निर्माण केल्याने प्रजा देशाच्या उत्कर्षासाठी सहजतेने सहभागी झाली.
हे पहा –
हिंदु जनजागृती समिती आयोजित 🔊 विशेष मराठी संवाद
#शिवप्रतापदिन
🟢 अफजलखान वध : शत्रुबोध आणि शिवरायांची कूटनीती
__________________________
आज हिंदु समाजामध्ये हिंदुत्वाविषयी जागृती करणे महत्त्वाचे ! – मोहन शेटे, संस्थापक अध्यक्ष, इतिहासप्रेमी मंडळ आणि इतिहासाचे अभ्यासक, पुणे
छत्रपती शिवाजी महाराज नसते, तर पाकिस्तानच्या सीमा आपल्या घरापर्यंत आल्या असत्या. यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव केवळ जयजयकार करण्यासाठी नव्हे, तर मनन, चिंतन आणि अनुकरण करण्यासाठी आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांची कूटनीती आज लक्षात घेतली पाहिजे. ‘अफझलखानाचा वध’ हा लढा हे मानसशास्त्रीय युद्ध होते. छत्रपती शिवाजी महाराज यांनी आई भवानीचा आशीर्वाद लाभल्याचे सांगून भयभीत हिंदू समाजाचे मनोधैर्य उंचावले. हिंदु समाजामध्ये ‘आपण शत्रूच्या विरोधात लढून युद्ध जिंकू शकतो’, असा आत्मविश्वास निर्माण केला; म्हणून महाराजांच्या निधनानंतर त्यांचे राज्य कोसळले नाही, तर ते पुढील १०० वर्षे पेशावरपासून तंजावरपर्यंत वाढले. आज हिंदु समाजामध्ये हिंदुत्वाविषयी जागृती करणे आणि शत्रूच्या आक्रमणाचा डाव लक्षात आणून देणे आवश्यक आहे.