नगर जिल्ह्यातील कोपरगाव शहरातील ‘अमरधाम स्मशानभूमी’ची देखरेख आणि मृतदेहावर अंत्यसंस्कार करणारे शिवराम जाधव यांच्या मुलीचा विवाह स्मशानभूमीतच पार पडला. जाधव परिवाराच्या वतीने वर्हाडी मंडळींचे स्वागत करण्यात आले. विवाहाचा मंडप, वर्हाडींची गर्दी, वाजंत्री, फटाक्यांची आतषबाजी, मंगलाष्टके आणि जेवणाच्या पंगती, असे अमरधाम स्मशानभूमीचे दृश्य होते. या उदाहरणावरून समाजात धर्मशिक्षणाची किती आवश्यकता आहे, हे अधोरेखित होते !
जाधव यांनी केलेली कृती ही धर्मशास्त्रसुसंगत आहे का ? याचा अभ्यास करणे आवश्यक आहे. जाधव यांना मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्याच्या मिळालेल्या कामाच्या ठिकाणी मुलीच्या विवाहाची कृती शास्त्रानुसार करणे आवश्यक मानले. हिंदु धर्माने मानवाच्या जीवनात सांगितलेले प्रमुख १६ संस्कार ईश्वराच्या जवळ जाण्यासाठी सांगितले आहेत. त्यांतील सर्वांत महत्त्वाचा ‘विवाह संस्कार’ आहे. लग्नविधीमध्ये वापरल्या जाणार्या अक्षता या कुंकू लावलेल्या असतात. लाल कुंकवाकडे ब्रह्मांडातील आदिशक्तीचे तत्त्व आकृष्ट होते. आदिशक्तीचे तत्त्व आकृष्ट झालेल्या अक्षतांचा वर्षाव वधू-वरांच्या डोक्यावर झाल्याने त्यांच्यामध्ये देवत्व जागृत होते. त्यामुळे त्यांच्या सात्त्विकतेत वाढ होऊन देवतांच्या लहरी आकृष्ट करून घेण्याची क्षमता वाढते आणि यातून सोहळ्याचा अपेक्षित लाभ वधू-वरांना मिळणे शक्य होते. त्यासाठी हा विधी सात्त्विक ठिकाणीच होणे अपेक्षित आहे. याउलट स्मशानभूमीची जागा रज-तमाने प्रदूषित आणि अनिष्ट शक्तीने भारित असते. त्यामुळे अशा ठिकाणी वधू-वरांच्या वैवाहिक जीवनाचा प्रारंभ मंगलमय होणार का ?
(सौजन्य : ETV Bharat Maharashtra)
हिंदु संस्कृती आणि चालीरिती यांनी प्रभावित होऊन कित्येक विदेशी जोडप्यांनी भारतात येऊन वैदिक पद्धतीने विवाह केले आहेत. ‘पाश्चिमात्य विवाह हे दिखाऊपणाचे आणि वरवरचे असतात’, असे म्हणत विवाहासाठी आध्यात्मिकदृष्ट्या अतीविकसित असलेल्या भारताची निवड केल्याचे काही जणांनी सांगितले. असे असतांना धर्मशिक्षणाच्या अभावामुळे ‘दिव्याखाली अंधार’ ही म्हण जन्महिंदु सार्थक करत आहेत. आपण जन्महिंदु असून स्वतःला अतीप्रगत दाखवण्याच्या नादात आपल्या प्रथा-परंपरा पायदळी तुडवत स्वतःची हानी करून घेत आहोत. हिंदु राष्ट्रात अशा कुप्रथा नसतील !
– सौ. अपर्णा जगताप, पुणे