निरोगी जीवनासाठी आयुर्वेद : लेखांक ११६
‘चरकसंहिता, चिकित्सास्थान, अध्याय १५, श्लोक ४६ ते ४९ यांमध्ये असे दिले आहे, ‘पहिले अन्न पूर्णपणे पचलेले नसतांना त्यावर दुसरे अन्न ग्रहण केल्याने महाभयंकर ‘अन्नविष’ बनते. ‘अन्नविष’ म्हणजे ‘अन्नच विषासमान बनणे’. वात, पित्त आणि कफ यांना आयुर्वेदामध्ये ‘दोष’ असे म्हणतात. हे अन्नविष वात, पित्त आणि कफ या दोषांशी संयोग पावते अन् शरिरामध्ये त्या त्या दोषांच्या व्याधी निर्माण होतात. हे अन्नविष मूत्रमार्गामध्ये गेल्यास मुतखड्यासारखे मूत्रमार्गातील रोग निर्माण करते किंवा आतड्यांमध्ये गेल्यास बद्धकोष्ठतेसारखे विकार होतात.’ एकूणच अन्नविषापासून होणार्या विकारांची सूची पुष्कळ मोठी आहे. त्यामुळे जवळजवळ सर्वच रोग अन्नविषामुळे निर्माण होतात, असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही.
बर्याच वेळा अन्नविष हे मंद विषाप्रमाणे (‘स्लो पॉयझन’प्रमाणे) कार्य करते. त्यामुळे ‘ते रोगांचे कारण असू शकते’, अशी शंका येत नाही. आताच्या काळात आपल्याला मधुमेह, उच्च रक्तदाब यांसारखे जीवनशैलीतील पालटांमुळे होणारे जे विकार दिसतात, ते काही एका रात्रीत निर्माण झालेले नसतात. पुष्कळ वर्षे आहार आणि विहार (शारीरिक कृती) यांच्या संदर्भातील चुका चालू रहातात, तेव्हा हे विकार निर्माण होतात. अन्नविष हे या विकारांचे कारण असू शकते. रात्रीचे जेवण पचलेले नसतांना सकाळी अल्पाहार करणे, हे अन्नविष निर्मितीचे पुष्कळ मोठे कारण आहे. चरक, सुश्रुत, वाग्भट इत्यादी सर्व आयुर्वेद महर्षींनी ‘अजीर्णभोजन (एक अन्न (विशेषतः रात्रीचे अन्न) पचलेले नसतांना दुसरे अन्न ग्रहण करणे) करू नका’, असे वारंवार सांगितले आहे. त्यामुळे मधुमेह, उच्च रक्तदाब इत्यादी झाल्यावर आयुष्यभर ॲलोपॅथीच्या गोळ्या घेत बसण्यापेक्षा तसे रोग होऊच नयेत, म्हणून सकाळचा अल्पाहार सोडून त्या वेळेत व्यायाम करणे शहाणपणाचे नाही का ?’
– वैद्य मेघराज माधव पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१६.१२.२०२२)