माध्यमांची ‘कोरोना वृत्ती’ आवरा !

 

माध्यमांची ‘कोरोना वृत्ती’ Covid-19ची चुकीची माहिती पसरवण्यास मदत करते

सध्या चीन, अमेरिका, जपान, इटली इत्यादी देशांमध्ये कोरोना या घातक विषाणूने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. चीनमधील परिस्थिती सध्या इतकी वाईट आहे की, तेथील रुग्णालयांमध्ये रुग्णांना भरती करण्यासाठी जागा उपलब्ध नाही, तर स्मशानभूमीमध्ये लांबच्या लांब रांगा लागल्या आहेत. अशात भारतातही दक्षता म्हणून पुन्हा एकदा मुखपट्टीचा (मास्कचा) वापर बंधनकारक होण्याची शक्यता वर्तवली गेली आहे. यासह गर्दीत जाण्याचे टाळणे इत्यादी मार्गदर्शक सूचनाही नागरिकांना दिल्या आहेत. केंद्राने सर्व राज्यांना कोरोना रुग्णांच्या चाचण्यांचे नमुने पुढील पडताळणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्याचाही आदेश दिला आहे, जेणेकरून ‘कोरोनाच्या कुठल्या प्रकाराचा संसर्ग वाढत आहे ?’, हे कळू शकेल. एकीकडे हे सर्व चालू असतांना दुसरीकडे सतत ‘ब्रेकींग न्यूज’च्या शोधात असलेल्या प्रसारमाध्यमांना ही आयती बातमीच मिळाली आहे. सवयीनुसार माध्यमांनी याविषयीच्या बातम्यांचा भडीमार करण्यासह स्वतःचे (अ)ज्ञान पाजळायलाही आरंभ केला आहे. ‘कोरोनाचा नवा प्रकार किती घातक आहे ?’, ‘भारतात तो वेगाने वाढू शकतो का ?’, ‘पुन्हा दळणवळण बंदी लागू होणार का ?’, आदींविषयी वेगवेगळ्या माध्यमांमध्ये प्रतिदिन वेगवेगळी माहिती ‘तज्ञां’चा संदर्भ देऊन दिली जात आहे. या सर्वांमध्ये सर्वसामान्य नागरिकांचा मात्र चांगलाच गोंधळ होतो; कारण ‘यांतील कुठली माहिती खरी समजायची ?’, असा त्यांच्यासमोर मोठा प्रश्न निर्माण होतो. कोरोनाच्या यापूर्वीच्या काळातही प्रसारमाध्यमांच्या अशा वार्तांकनामुळे नागरिक चांगलेच घाबरल्याचे दिसून आले होते. परिणामी तेव्हा अनेक आधुनिक वैद्यांनी त्यांच्याकडे तपासणीसाठी येणार्‍या रुग्णांना काही कालावधीसाठी दूरचित्रवाणी न बघण्याचा किंवा वृत्तपत्र न वाचण्याचा सल्ला दिला होता. माध्यमांसाठी याहून लाजिरवाणी गोष्ट दुसरी कुठली असू शकते ? अर्थात् काही प्रसारमाध्यमे यास निश्चित अपवाद आहेत; परंतु त्यांची संख्या अत्यल्प आहे. मुळातच भारतातील प्रसारमाध्यमांची विश्वासार्हता अल्प होत चालली आहे. अशात सर्वसामान्य नागरिकांना अशा प्रकारे गोंधळात टाकणारे किंवा घाबरवून सोडणारे वार्तांकन करून माध्यमे स्वतःची उरलीसुरली प्रतिष्ठाही धुळीस मिळवत आहेत, हे त्यांच्या केव्हा लक्षात येणार ? त्यांची ‘कोरोना वृत्ती’ खरोखरच्या कोरोना विषाणूइतकीच घातक आहे.

समाजाभिमुख पत्रकारिता जोपासणारे खरे वृत्तपत्र असते; पण त्यातील लिखाण लोकांच्या जिवावर बेतणारे असेल, तर ते त्यांच्यासाठी वृत्तपत्र नव्हे, तर मृत्यूपत्र ठरते. यावर उपाय म्हणून आता केंद्र सरकारने हस्तक्षेप करणे आवश्यक आहे. सरकारने प्रसारमाध्यमांसाठीही स्वतंत्र मार्गदर्शक तत्त्वे लागू केली पाहिजेत. माध्यमांच्या मनमानी कारभारावर अंकुश ठेवला पाहिजे. माध्यमांना कोरोनाच्या संदर्भात हवी असलेली माहिती केंद्र सरकारने त्यांना अधिकृतपणे उपलब्ध करून दिली पाहिजे. याने आपोआपच माध्यमांमधील (वाचकांसाठी जीवघेणी ठरलेली) स्पर्धा न्यून होईल.

प्रसारमाध्यमांच्या मनमानी कारभारावर अंकुश ठेवण्यासाठी केंद्र सरकारने कठोर पावले उचलणे आवश्यक !