गुजरातमधील वलसाड येथे अवैध चर्च उभारण्याला ग्रामस्थांचा विरोध !

गावात एकही ख्रिस्ती नसतांना चर्चची उभारणी

वलसाड (गुजरात) – गुजरातच्या वलसाड जिल्ह्यातील कापराडा तालुक्यातील शाहुदा गावात अवैध चर्च बांधले जात असून त्याला ग्रामस्थांनी विरोध केला आहे. कापराडा तालुक्यातील शाहुदा गावात एकही ख्रिस्ती व्यक्ती रहात नसल्याचे स्थानिक लोकांचे म्हणणे आहे. ग्रामपंचायतीच्या सूचनांकडे दुर्लक्ष करून चर्च उभारले जात आहे. या अवैध बांधकामाविषयी गावकर्‍यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात तक्रार प्रविष्ट केली आहे. (हिंदूंवर तक्रार करण्याची वेळ का येते ? प्रशासन स्वतःहून कारवाई का करत नाही ? – संपादक)

१. या अवैध बांधकामाच्या मागे वनविभागात कार्यरत असलेल्या चंदरभाई चौधरी यांचा हात असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. तो ख्रिस्ती असल्याचा दावा करतो.

२. ग्रामपंचायतीची अनुमती नसतांनाही चंदरभाई चर्चचे बांधकाम करून घेत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. ‘प्रशासनाने वेळीच योग्य ती कारवाई केली नाही, तर अनुचित प्रकार घडू शकतो’, असे ग्रामस्थांचे त्यांचे म्हणणे आहे.

३. गावातील अल्पशिक्षित आणि गरीब लोकांना आमीष दाखवून धर्मांतर करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. लोकांना हिंदूंच्या देवतांविषयी चुकीच्या आणि अपमानास्पद गोष्टी सांगून पथभ्रष्ट करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

४. स्थानिक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शाहूदा गावात यावर्षी जुलै मासामध्ये  सामूहिक धर्मांतर करण्यात आले होते. २० कुटुंबांतील ९० लोकांनी ख्रिस्ती धर्म स्वीकारला होता.

५. या अवैध धर्मांतराच्या विरोधात ग्रामपंचायतीच्या वतीने लेखी तक्रारही करण्यात आली होती; मात्र या प्रकरणी अद्याप कोणतीही कारवाई झाली नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

६. यापूर्वी तापी जिल्ह्यातील सोनगड गावात एक प्राचीन हिंदु मंदिर पाडून त्या ठिकाणी चर्च बांधण्यात आले होते.

संपादकीय भूमिका

गुजरातमध्ये हिंदुत्वनिष्ठ भाजपची सत्ता असतांनाही तेथे धर्मांध ख्रिस्ती अवैधपणे चर्च उभारण्याचे दुःसाहस करतात, हे संतापजनक ! अशांवर कठोर कारवाई होण्यासाठी पावले उचलणे आवश्यक !