छगन भुजबळ यांच्याकडून मुंबईचा ‘कोंबडी’ असा उल्लेख !

  • विधानसभेत सत्ताधार्‍यांचा गदारोळ !

  • विधानसभेचे कामकाज २ वेळा स्थगित !

छगन भुजबळ

नागपूर, २१ डिसेंबर (वार्ता.) – २१ डिसेंबर या दिवशी विधानसभेत पुरवणी मागण्यांवर चर्चा चालू असतांना छगन भुजबळ यांनी मुंबईचा उल्लेख ‘कोंबडी’ असा केल्याने सत्ताधारी सदस्यांनी आक्षेप घेत गदारोळ घातला. त्याला विरोधी सदस्यांनीही प्रत्युत्तर दिल्याने गोंधळ झाला. तालिका सभापती समीर कुणावार यांनी सभागृहाचे कामकाज २ वेळा प्रत्येकी १० मिनिटांसाठी स्थगित केले.

छगन भुजबळ म्हणाले की, मुंबई ही सोन्याची अंडे देणारी ‘कोंबडी’ आहे. ती कापून खायची का ? त्यावर भाजपच्या सदस्या मनीषा चौधरी यांनी जोरदार आक्षेप घेत हरकतीचे सूत्र उपस्थित केले. भाजपचे सदस्य राम सातपुते आणि योगेश सागर यांनीही आक्षेप घेतला. मनीषा चौधरी यांनी ‘मुंबईला ‘कोंबडी’ म्हणणे हा मुंबईचा अवमान आहे’, असे सांगितले. त्यानंतर सभागृहात गदारोळ झाला. पुन्हा कामकाज चालू झाल्यावर ‘योगेश सागर यांनी महिलांची क्षमा मागितली पाहिजे’, असे सांगितले.

छगन भुजबळ यांनी मनीषा चौधरी यांना ‘ए, तू खाली बस’ असा एकेरी उल्लेख केला. ‘याचा व्हिडिओ पडताळून अध्यक्षांनी निर्णय घ्यावा’, असे योगेश सागर यांनी सांगितले. वाद थांबत नसल्याचे पाहून विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छगन भुजबळ यांनी ‘सन्मानपूर्वक खाली बसा’ असा उल्लेख केल्याचे सांगून मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला; पण सत्ताधारी सदस्या ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हत्या. ते पाहून अध्यक्ष व्हिडिओ पडताळून निर्णय घेतील, असे तालिका सभापती कुणावार यांनी घोषित केले. त्यावर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी काही लोकांच्या भावना दुखावल्या असतील, तर मी दिलगिरी व्यक्त करतो, असे सांगितल्यावर सत्ताधारी शांत झाले.

यानंतर सभागृहाचे कामकाज निवळत असतांना छगन भुजबळ यांनी ‘सावित्रीबाई फुले यांच्याविषयी घाण बोलणार्‍या राज्यपालांविषयी कुणी काहीच बोलत नाही’, असे हिणवले. त्यावर दोन्हींकडील सदस्य आक्रमक होताच पुन्हा १० मिनिटांसाठी सभागृहाचे कामकाज स्थगित करण्यात आले. त्यानंतर विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर आल्यानंतर कामकाज पुन्हा सुरळीत चालू झाले.