श्रद्धा वालकर हत्या प्रकरणाची विशेष पथकाद्वारे चौकशी करण्याची घोषणा !
नागपूर, २० डिसेंबर (वार्ता.) – श्रद्धा वालकर हत्या प्रकरणात पोलिसांत तक्रार करूनही कारवाई का झाली नाही ? तक्रार मागे घेण्यासाठी श्रद्धा हिच्यावर कुणाचा दबाव होता का ? पोलिसांवर राजकीय दबाव होता का ? या सर्वांची विशेष पथकाद्वारे चौकशी करण्यात येईल, अशी घोषणा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २० डिसेंबर या दिवशी विधानसभेत केली. भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी याविषयीची लक्षवेधी सूचना विधानसभेत उपस्थित केली होती. या वेळी भाजपचे आमदार अधिवक्ता आशिष शेलार यांनी या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी विशेष पथकाद्वारे चौकशी करण्याची मागणी केली. या मागणीवर गृहमंत्र्यांनी वरील घोषणा केली.
१. आमदार अतुल भातखळकर यांनी ‘श्रद्धा वालकर हत्या प्रकरणात पोलिसांवर राजकीय दबाव होता का ?’, तसेच ‘अशी प्रकरणे टाळण्यासाठी शासन ‘लव्ह जिहाद’ आणि ‘धर्मांतर’ विरोधी कायदा करणार आहे का ?’, अशी विचारणा लक्षवेधी सूचनेच्या अंतर्गत केली.
२. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी चौकशी पथक नियुक्त करण्याच्या मागणीला पाठिंबा दिला. जलद गती न्यायालयात हे प्रकरण चालवून श्रद्धा वालकर हिची हत्या करणारा आरोपी आफताब पूनावाला याला फाशी द्यावी, तसेच चौकशीचा अहवाल येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सादर करावा, अशी मागणी केली.
३. ‘हे प्रकरण जलदगती न्यायालयात चालवण्यात यावे, यासाठी केंद्रीय गृहमंत्र्यांकडे मागणी करू, तसेच पुढच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात चौकशी अहवाल सादर करण्यात येईल’, असे सांगून गृहमंत्र्यांनी सभागृहाला आश्वासित केले.
या वेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले,
१. श्रद्धा हिच्या वडिलांकडून संपूर्ण घटनाक्रम मी समजून घेतला. प्रेयसीचे तुकडे शीतकपाटात ठेवून तेच शीतकपाट उघडून त्यातून शीतपेय पिण्याइतका माणूस क्रूर कसा असू शकतो ? अशी मानसिकता येते कुठून ? या प्रकरणात कोणत्या प्रकारे राजकीय दबाव असल्याचे आतापर्यंतच्या अन्वेषणातून पुढे आलेले नाही; परंतु ‘तक्रार का मागे घेण्यात आली ?’, याचे अन्वेषण करण्यात येईल. तक्रार साध्या मनाने मागे घेण्यात आलेली नाही, हे मात्र खरे !
२. ‘तक्रार १ मासानंतर मागे घेण्यात आली, तोपर्यंत पोलिसांनी कारवाई का नेली नाही ?’, ‘पुढच्या काळात अशा घटना टाळण्यासाठी कोणत्याही महिलेची तक्रार आल्यास ती दबावात नाही ना ?’, याची माहिती घेण्यात येईल.
‘लव्ह जिहाद आहे’, ही वस्तूस्थिती स्वीकारावीच लागेल ! – देवेंद्र फडणवीसराज्यात १५ संघटनांनी विविध जिल्ह्यांत ४० मोर्चे काढून लव्ह जिहादच्या विरोधात कठोर कायदा करण्याची मागणी केली आहे. असे प्रकार षड्यंत्र करून जाणीवपूर्वक होत असल्याचे आढळून आले आहे. यामध्ये दीड वर्षाच्या मुलीवर अत्याचार केले जातात, अशा घटनाही मोठ्या प्रमाणात बाहेर येत आहेत. त्यामुळे अन्य राज्यांत याविरोधात कायदेही केले आहेत. मी जाणीवपूर्वक सांगू इच्छितो की, केरळमध्ये साम्यवादी विचारांचे मुख्यमंत्री असतांनाही तेथील पोलिसांनी अशा प्रकरणांना ‘लव्ह जिहाद’ हे नाव दिले आहे. कोणत्या धर्माच्या विरोधात कारवाई करायची आहे, असे नाही; पण आपल्याला ही वस्तूस्थिती स्वीकारावीच लागेल. ज्या राज्यांनी लव्ह जिहादच्या विरोधात कायदा केला आहे, त्यांचा अभ्यास करत आहोत. अन्य राज्यांनी केलेला कायदा प्रभावी असेल, तर महाराष्ट्र शासन निश्चित तशा प्रकारचा कायदा करेल. कोणत्याही परिस्थितीत कुठल्याही महिलेची फसवणूक होऊ नये, अशी राज्यशासनाची भूमिका आहे. |