पक्षाच्या प्रचारासाठी सरकारी पैशांतून विज्ञापने केल्यावरून आम आदमी पक्षाकडून ९७ कोटी रुपये वसूल करा !

देहलीच्या उपराज्यपालांचा प्रशासनाला आदेश !

देहलीचे उपराज्यपाल व्ही.के. सक्सेना व देहलीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल

नवी देहली – देहलीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पक्षाच्या प्रचारासाठी सरकारी पैशांचा वापर केल्यावरून देहलीचे उपराज्यपाल व्ही.के. सक्सेना यांनी आम आदमी पक्षाकडून ९७ कोटी रुपये वसूल करण्याचा आदेश प्रशासनाला दिला. त्यासाठी पक्षाला १५ दिवसांची समयमर्यादा देण्यात आली आहे. ‘हे सर्वोच्च न्यायालयाच्या दिशानिर्देशांचे उल्लंघन आहे’, असा ठपका उपराज्यपालांनी ठेवला आहे. केजरीवाल यांनी राजकीय विज्ञापने ही ‘सरकारी विज्ञापने’ म्हणून प्रकाशित केल्याचाही आरोप सक्सेना यांनी केला आहे.

ऑगस्ट २०१६ मध्ये देहली उच्च न्यायालयाने या प्रकरणी ३ सदस्यीय समिती स्थापन केली होती. समितीला विज्ञापनांवर व्यय (खर्च) करण्यात आलेल्या पैशांचे अन्वेषण करण्याचा आदेश देण्यात आला होता. समितीने १६ सप्टेंबर २०१६ या दिवशी अहवाल सुपुर्द केला होता. त्यात ‘आप’ला दोषी धरण्यात आले होते.