पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री बिलावल भुट्टो यांनी नरेंद्र मोदी यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ भाजपच्या वतीने कराड, सांगली, कोल्हापूर, सोलापूर येथे आंदोलन !

कोल्हापूर, १७ डिसेंबर (वार्ता.) – भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, तसेच भारत यांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणारे पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री बिलावल भुट्टो यांच्या विरोधात भाजपच्या वतीने कराड, सांगली, कोल्हापूर, सोलापूर येथे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात भुट्टो यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारण्यात आले.

कराड येथे आंदोलन करतांना भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते

१. कराड येथे सातारा भाजपच्या वतीने करण्यात आलेल्या आंदोलनाच्या प्रारंभी दत्त चौकातील शिवतीर्थावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीला अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी पोलिसांनी कार्यकर्त्यांना कह्यात घेऊन नंतर त्यांची सुटका केली. या वेळी भाजपचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस श्री. अतुल भोसले, महाराष्ट्र प्रदेश सचिव श्री. विक्रम पावसकर, भाजप युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष श्री. सुदर्शन पाटसकर, शहराध्यक्ष एकनाथ बागडी, सर्वश्री घनश्याम पेंढारकर, विश्वनाथ फुटाणे, नितीन शहा, भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

सांगली येथे आंदोलन करतांना भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते

२. सांगली येथे भाजपचे आमदार श्री. सुधीर गाडगीळ यांच्या जनसंपर्क कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. या प्रसंगी माजी आमदार श्री. नितीन शिंदे, सौ. स्वाती शिंदे, सौ. नीता केळकर, सर्वश्री पृथ्वीराज पवार, केदार खाडिलकर, अविनाश मोहिते, श्रीकांत शिंदे यांसह अन्य पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

कोल्हापूर येथे पाकिस्तानचा प्रतिकात्मक झेंडा जाळतांना भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते

३. कोल्हापूर येथे छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे पाकिस्तानचा प्रतिकात्मक झेंडा जाळून निषेध व्यक्त करण्यात आला. या प्रसंगी जिल्हाध्यक्ष श्री. राहुल चिकोडे, सर्वश्री महेश जाधव, अशोक देसाई, गणेश देसाई, हेमंत आराध्ये, अजित ठाणेकर यांसह अन्य उपस्थित होते.

४. सोलापूर येथे भाजपचे आमदार श्री. सुभाष देशमुख यांच्या नेतृत्वाखाली पूर्व भागातील दाजीपेठ परिसरात आंदोलन करण्यात आले. या वेळी बिलावल भुट्टो यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळण्यात आला. या वेळी आमदार श्री. देशमुख म्हणाले, ‘‘पाकिस्तान आर्थिक दिवाळखोरीत आहे. त्यांची वैचारिक दिवाळखोरीही निघाली आहे. जगाचे लक्ष त्यांच्याकडे वेधण्यासाठी ते चुकीची विधाने करत आहेत.’’ या प्रसंगी भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते.