अनेक दुर्धर प्रसंगांमधून गुरुकृपेने सुखरूप बाहेर पडलेले कल्याण, जिल्हा ठाणे येथील श्री. चंद्रकांत जगन्नाथ सोनवणे (वय ७१ वर्षे) !

‘माझ्या जीवनात अनेक दुर्धर प्रसंग घडले; परंतु मी त्यातून गुरुकृपेने वाचलो. यातील काही प्रसंग मी खाली दिले आहेत.

श्री. चंद्रकांत सोनवणे

१. तीन वेळा अघोरी प्रयोग झाल्याने शारीरिक, आर्थिक आणि मानसिक स्तरांवर मोठ्या प्रमाणात हानी होणे, स्वप्नात भुते दिसून भीती वाटणे आणि या कालावधीत गुरूंना भेटू न शकणे

मी दत्त संप्रदायाचा सेवेकरी असून श्रीमंत दत्तानंद सरस्वती यांचा मी अनुयायी आहे. त्यांनी दिलेल्या अनुग्रहानुसार मी नामस्मरण करतो. माझे ‘रेशनिंग’चे दुकान होते. त्याच वेळी मी बांधकाम व्यवसायात उतरलो. वर्ष १९८८ मध्ये माझ्यावर ३ वेळा अनिष्ट शक्तींचे आक्रमण झाले. या प्रयोगातून माझी शारीरिक, मानसिक आणि आर्थिक या स्तरांवर मोठ्या प्रमाणात हानी झाली. त्या वेळी मी प्रकाशाकडे पाहू शकत नव्हतो. सतत डोके, डोळे आणि अंग दुखायचे. मला कुणी भेटायला आले, तर मी त्यांना भेटू शकत नव्हतो; कारण मला पुष्कळ भीती वाटायची. सततच्या आजारपणामुळे मला जीव नकोसा झाला होता. त्यातच रात्री मला भुतांची स्वप्ने पडायची. मला झोपेतही ‘कुणीतरी फटके मारत आहे’, असे वाटायचे. कुठेही गेलो, तरी माझ्या त्रासाचे कारण समजत नव्हते. माझ्यावर अनिष्ट शक्तींचे बंधन (त्रासदायक आवरण) आले होते. त्यामुळे माझे नामस्मरणात मन लागत नव्हते. त्यामुळे मी गुरूंना भेटूच शकत नव्हतो. त्यानंतर मी आणि माझे गुरु आजपर्यंत भेटू शकलो नाही.

२. परात्पर गुरु डॉ. आठवले यांची भेट झाल्यावर स्वतःच्या गुरूंना भेटत असल्याचे वाटून भावजागृती होणे

एकदा मी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात आलो होतो. तेव्हा माझी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याशी भेट झाली. त्यांना पाहून ‘मी माझ्या गुरूंनाच भेटत आहे’, असे वाटले आणि मला भरून आले. मी पुष्कळ रडलो. त्यांच्याशी बोलतांना माझा गळा दाटून आला. तेव्हा ते म्हणाले, ‘‘काही हरकत नाही. तुम्ही नंतर बोला.’’ किती कृपाळू गुरुमाऊली !

३. गगनबावडा येथील प.पू. गगनगिरी महाराज यांच्याकडे गेल्यावर त्यांनी घर पालटायला सांगणे आणि ‘गुरुकृपेने स्वतःला जीवदान मिळाले’, असे वाटणे

माझे मित्र, श्री. अशोक जाधव मला श्री गगनगिरी महाराज यांच्याकडे (गगनबावडा येथे) घेऊन गेले. तेथे मी प.पू. गगनगिरी महाराजांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले, ‘‘काही नाही. त्रास निघून जाईल. तुम्ही रहात असलेले घर पालटा. तेथे तुम्हाला त्रास झाला आहे.’’ त्यानंतर ३ ते ४ मासांनी आम्ही ते घर विकले. त्यानंतर गुरुकृपेने मला जीवनदान मिळाले.

४. गाणगापूर क्षेत्री गेल्यावर आलेल्या अनुभूती

४ अ. प्रत्येक वर्षी दत्तजयंतीपूर्वी गाणगापूर क्षेत्री जाऊन गुरुचरित्राचे पारायण करणे आणि त्यानंतर त्रास न्यून होणे : नंतरही माझ्यावर अनिष्ट शक्तींचे आक्रमण होतच होते. त्यामुळे मी प्रत्येक पौर्णिमेस गाणगापूर क्षेत्री जाऊ लागलो. एकदा मी दत्त महाराजांच्या जन्मदिवशी गाणगापूरला गेलो होतो. त्यानंतर मी प्रत्येक वर्षी दत्तजयंतीच्या आधी जाऊन गुरुचरित्राचे पारायण ७ दिवसांत पूर्ण करत असे. त्यासह सलग ४ वर्षे वाचन आणि नामजप असे प्रयत्न महाराजच माझ्याकडून करून घेत असत. त्यानंतर माझा त्रास न्यून होत गेला. कोरोना काळात गाणगापूर क्षेत्री जाणे बंद झाले. आता अधूनमधून जाणे होते.

४ आ. गाणगापूरला जातांना आगगाडीत बसलो असता झोप लागणे आणि स्वप्नात ‘स्वतः हत्तीवर बसलो आहे अन् स्वामी पायी चालत आहेत’, असे दिसणे आणि जाग आल्यावर तो प्रसंग आठवून रडू येणे : असाच एकदा मी गाणगापूरला जात असतांना कर्जत स्थानक जाईपर्यंत जागा होतो. नंतर मला गाढ झोप लागली. तेव्हा मी स्वप्नात पाहिले की, ‘मी हत्तीवर बसलो आहे आणि स्वामी पायी चालत होते. त्यांच्या समवेत २५ लोक होते, तेसुद्धा चालत होते. मला मध्येच जाग यायची आणि झोपलो की, पुन्हा तेच स्वप्न पडायचे. असे सारखे घडत होते. मग सोलापूर स्थानक आले. मी आणि माझे स्नेही उठलो. तो प्रसंग आठवून मला रडू येत होते. मला लाज वाटत होती. माझी योग्यता नसतांना मला हत्तीवर बसवले आणि स्वामी पायी चालत होते. ही माझ्यासाठी किती शरमेची गोष्ट आहे ! भक्तांचा सोहळा किती करावा, ते परमेश्वरच जाणे ! हे मी कुणाला सांगितले नाही; कारण अशाने आपला उन्माद (अहं) वाढतो.

४ इ. गाणगापूरहून पारायणाची सेवा करून घरी येतांना रेल्वेगाडीत हृदयविकाराचा झटका येणे, त्या वेळी शेजारी बसलेल्या व्यक्तीने साहाय्य करणे, सोलापूर स्थानकावर गाडी येताच डॉक्टरांनी तपासणे आणि त्यांनी ‘आता ठीक आहेत. पुढील प्रवास करू शकता’, असे सांगणे : याच कालावधीतील एक प्रसंग आहे. एकदा मी गाणगापूरहून पारायणाची सेवा करून घरी निघालो होतो. स्थानकावर पूर्ण अंधार असल्याने मला आरक्षणाचा डबा मिळण्यात अडचण येत होती. मी कसाबसा गाडीत जाऊन आसंदीवर बसलो; पण नंतरचे मला काहीच आठवत नाही. मला हृदयविकाराचा झटका आला होता. त्या वेळी मला पुढील दृश्य दिसत होते, ‘मी औदुंबराखाली बसलो आहे. वर चंद्राचा लख्ख प्रकाश पडला आहे.’ फार विलोभनीय दृश्य होते ते. मग किती वेळ गेला आठवत नाही; पण शुद्ध आली, तेव्हा ‘मी कुठे आहे ?’, हे मला कळत नव्हते. तेव्हा मला ‘ॲटॅक’ येऊन गेला होता. त्या वेळी शेजारील व्यक्तीने मला पुष्कळ साहाय्य केले. सोलापूर स्थानकात आल्यावर मला आधुनिक वैद्यांनी येऊन तपासले आणि सांगितले, ‘‘हे पुढील प्रवास करू शकतात. धोका नाही.’’ ही महाराजांचीच कृपा आहे.’

५. हृदयविकाराचे शस्त्रकर्म करण्यासाठी ५ लक्ष रुपयांचा ‘मेडिक्लेम’ (विमा) काढणे; पण २ वर्षे ‘क्लेम’ मिळणार नसल्याने डॉक्टरांनी लिहून दिलेल्या गोळ्या घेणे आणि २ वर्षे अखंड सेवेत राहिल्याने गुरूंनी काळजी घेणे

काही दिवसांनी मला हृदयविकाराचा त्रास झाला. तेव्हा शस्त्रकर्म (ऑपरेशन) करावे लागणार होते. मी विचारात पडलो, ‘काय करावे ? मी ५ लाख रुपये कसे उभे करणार ?’ तेवढ्यात डॉक्टरांनी विचारले, ‘‘तुमचे ‘मेडिक्लेम’ असेल ना ?’’ मी ‘‘नाही’’, असे म्हणालो. तेव्हा त्यांनी मला सांगितले, ‘‘ज्या अधिकोषात (बँकेत) तुमचे खाते आहे, तेथे जाऊन तुम्ही ‘मेडिक्लेम’ काढा.’’ मी अधिकोषातील अधिकार्‍याला (बँक मॅनेजरला) भेटून ५ लाख रुपयांचा ‘मेडिक्लेम’ काढला; पण मला २ वर्षे ‘क्लेम’ मिळणार नव्हता. त्यामुळे मला डॉक्टरांनी गोळ्या लिहून दिल्या, मी त्या घेत राहिलो. २ वर्षे महाराजांनी माझे हृदय सांभाळले. मी २ वर्षे अखंड सेवेमध्ये घालवली आणि तिसर्‍या वर्षी माझी शस्त्रक्रिया झाली. माझी शस्त्रक्रिया होऊन आता ९ वर्षे झाली. मी अजून व्यवस्थित आहे.

६. पूर्ण कफल्लक झाल्यामुळे काळजी वाटणे आणि त्या वेळी भगवद्गीतेतील श्लोकात सांगितल्याप्रमाणे ‘भगवंत भक्ताचे योगक्षेम वहातो’, याचे स्मरण होऊन निश्चिंत होणे

अजून एक प्रसंग असा झाला की, मी पूर्ण कफल्लक झालो होतो. मला केवळ आवश्यकतेपुरतेच पैसे मिळायचे. कुठे उधारीही मिळत नव्हती. मला सारखी चिंता वाटायची. मग एकदा अक्कलकोटचे स्वामी समर्थ स्वप्नात येऊन मला ओरडले. ते मला म्हणाले, ‘काय रे, आमचेच खातोस. मग मागतोस कशाला ?’ मी फार ओशाळलो. ‘स्वामी समर्थ असे का म्हणाले ?’, ते मला समजेना. त्या वेळी मला गीतेमधील श्लोक आठवला.

अनन्याश्चिन्तयन्तो मां ये जनाः पर्युपासते ।
तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम् ।। – श्रीमद्भगवद्गीता अध्याय ९, श्लोक २२

अर्थ : जे लोक अनन्य भक्तीभावाने माझ्या दिव्यस्वरूपाचे चिंतन करीत माझी उपासना करतात, त्यांचा योगक्षेम (अप्राप्त वस्तूची प्राप्ती आणि प्राप्त वस्तूचे रक्षण) मी चालवतो.

तेव्हा माझ्या मनात विचार आला, ‘सर्व भार ईश्वरावर टाकून मोकळे व्हावे. उद्याची चिंता नको. आजचा दिवस भक्तीत जाऊ दे. देव माझा सर्व योगक्षेम वहाणार आहे.’

– श्री. चंद्रकांत जगन्नाथ सोनवणे (वय वर्षे ७१), काटे मानिवली, कल्याण (पू.), जिल्हा ठाणे.

या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक