मध्यप्रदेशात शाहरुख खान यांच्या चित्रपटाचे चित्रीकरण हनुमान चालिसा पठण करून रोखले !

विश्‍व हिंदु परिषद आणि बजरंग दल यांचे कार्यकर्ते

जबलपूर (मध्यप्रदेश) – ‘पठाण’ चित्रपटातून भगव्या रंगाचा अवमान झाल्यावरून विश्‍व हिंदु परिषद आणि बजरंग दल यांनी अभिनेते शाहरुख खान यांच्या ‘डंकी’ या आगामी चित्रपटाच्या भेडाघाट या भागात चालू असलेल्या चित्रीकरणाच्या वेळी हनुमान चालिसाचे पठण केले. त्यामुळे चित्रीकरण थांबवण्यात आले. या चित्रीकरणाच्या वेळी शाहरुख खान किंवा अन्य कोणताही मोठा अभिनेता उपस्थित नव्हता.

विश्‍व हिंदु परिषद आणि बजरंग दल यांनी या चित्रीकरणाच्या विरोधात येथील तहसीलदारांना निवेदन सादर केले. यात म्हटले आहे की, जे भगव्या रंगाचा अवमान करतात, अशांच्या चित्रपटाच्या चित्रीकरणाला नर्मदेच्या या तपोभूमीवर कोणत्याही अनुमती देणार नाही.

बिहारमध्ये शाहरुख खान, दीपिका पदुकोण आदींच्या विरोधात तक्रार प्रविष्ट

बिहारमध्ये अधिवक्ता सुधीर ओझा यांनी मुझफ्फरपूरच्या मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालयात ‘पठाण’ चित्रपटाचे निर्माता आदित्य चोप्रा, अभिनेते शाहरुख खान, अभिनेत्री दीपिका पदुकोण यांच्यासह ५ जणांच्या विरोधात तक्रार प्रविष्ट केली आहे. धार्मिक भावना दुखावणे आणि अश्‍लीलता पसरवणे, यांसाठी ही तक्रार प्रविष्ट करण्यात आली आहे. न्यायालयाने तक्रार स्वीकारून यावर ३ जानेवारी २०२३ या दिवशी सुनावणी होणार असल्याचे सांगितले आहे.

अधिवक्ता ओझा यांनी सांगितले की, पठाण चित्रपटातील बेशरम रंग गाण्यातून जाणीवपूर्वक हिंदूंना लक्ष्य करण्यात आले आहे.