नाशिक येथील बिपीन बाफना खून खटला प्रकरण
१ कोटीच्या खंडणीसाठी ९ वर्षांपूर्वी केले होते अपहरण !
नाशिक – जिल्ह्यातील बहुचर्चित बिपीन बाफना खून खटल्यातील मुख्य आरोपी चेतन पगारे आणि अमन जट या दोघांना जिल्हा अन् सत्र न्यायाधीश अदिती कदम यांनी १६ डिसेंबर या दिवशी फाशीची शिक्षा ठोठावली आहे. सरकारी आणि तक्रारदार यांच्या अधिवक्त्यांनी आरोपींना फाशी व्हावी यासाठी जोरदार युक्तीवाद केला. आरोपींची क्रूर गुन्हेगारी पार्श्वभूमी पहाता फाशीच योग्य असून जन्मठेप दिली, तर आरोपींचे असे गुन्हे करण्याचे धैर्य वाढेल, असे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. ३५ साक्षीदार पडताळले असून यामध्ये एकही साक्षीदार फितूर झाला नाही.
ओझर येथील व्यापारी गुलाबचंद बाफना यांचा मुलगा बिपीन याचे वर्ष २०१३ मध्ये अपहरण करून १ कोटी रुपयांची खंडणी मागितली होती. नंतर तेथील शिवारात त्याचा मृतदेह आढळून आला होता. आरोपींना जोपर्यंत पकडले जात नाही, तोपर्यंत मृतदेह घेणार नाही, असा पवित्रा नातेवाइकांनी घेतला होता. अवघ्या १ घंट्यांमध्ये पोलिसांनी ५ आरोपींना अटक करून सर्वांना न्यायालयात उभे केले होते.