कारागृहात असतांना पंडित नथुराम गोडसे यांना ख्रिस्ती बनवण्याचा प्रयत्न झाला होता !

भाजपचे केरळमधील नेते टी.जी. मोहनदास यांचा दावा

पंडित नथुराम गोडसे

थिरूवनंतपूरम् (केरळ) – कारागृहात असतांना पंडित नथुराम गोडसे यांचे धर्मांतर करून त्यांना ख्रिस्ती करण्याचा प्रयत्न झाला होता, असा दावा केरळमधील भाजपचे नेते टी.जी. मोहनदास यांनी केला. ‘याची माहिती त्यांना देहलीतील राष्ट्रीय अभिलेखागार (अर्कायव्हल) येथून मिळाली. यासाठी ११ सहस्र कागदपत्रांचा अभ्यास करावा लागला’, असे त्यांनी सांगत या संदर्भातील एक कागदपत्राचे छायाचित्र प्रसारित केले आहे.

१. मोहनदास यांनी प्रसारित केलेले कागदपत्र एक पत्र आहे. हे पत्र भारताचे पाकिस्तानमधील तत्कालीन उच्चायुक्त वाय.के. पुरी यांनी भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे अपर सचिव प्रेम किशन यांना लिहिलेले आहे. हे पत्र १४ सप्टेंबर १९४९ या दिवशी लाहोर येथून लिहिलेले आहे. यात म्हटले आहे, ‘‘प्रिय प्रेम किशन जी, मी २ एअरमेल पाठवत आहे. यात ख्रिस्ती धर्माविषयी उपदेश आहे. हा उपदेश गांधी यांच्या हत्या करणारे आरोपी श्री. नथुराम गोडसे आणि नारायण आपटे यांच्यासाठी ब्रिटनमधून आला आहे.’’

२. मोहनदास यांनी पुढे म्हटले आहे की, ब्रिटनमधून पाठवलेले मूळ पत्र उपलब्ध नाही. हे पत्र नथुराम गोडसे यांना देण्यात आले होते का ? त्यावर गोडसे यांची प्रतिक्रिया काय होती ? याविषयी काहीही माहिती उपलब्ध नाही.