‘ट्विटर’ या विदेशी आस्थापनाकडून ‘कू’ या भारतीय आस्थापनाचे खाते बंद !

  • २०० हून अधिक देशांमध्ये ‘कू’ लोकप्रिय !

  • ‘ट्विटर’ला स्पर्धक निर्माण होत असल्याने कारवाई ?

नवी देहली – ‘ट्विटर’ या विदेशी सामाजिक माध्यमाने दुसरे सामाजिक माध्यम ‘कू’चे खाते बंद केले आहे. हे खाते लोकांच्या प्रश्‍नांसाठी चालू करण्यात आले होते. यापूर्वीच ट्विटरने ‘न्यूयॉर्क टाइम्स’, ‘वॉशिंग्टन पोस्ट’, ‘सी.एन्.एन्.’, सह अनेक प्रमुख वृत्तपत्र आणि वृत्तवाहिन्या यांतील पत्रकारांची खाती बंदी केली होती.

१. ‘कू’चे खाते बंद केल्याविषयी त्याचे सह-संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अप्रमेय राधाकृष्ण म्हणाले, ‘‘खाते बंद का करण्यात आले ?, हे आम्हाला ठाऊक नाही. याविषयी ट्विटरने आम्हाला कोणतीही कल्पना दिलेली नाही. त्यांनी एक ट्वीट केले, ‘कू’च्या खात्यावर बंदी घातली आहे.’ का ? कारण आम्ही ‘ट्विटर’शी स्पर्धा करतो ? हे कोणत्या प्रकारचे भाषण स्वातंत्र्य आहे आणि आपण कोणत्या जगात रहात आहोत ? येथे काय होत आहे इलॉन मस्क ?’’

२. गेल्या मासातच ‘कू’चे सह-संस्थापक मयंक बिद्वतका यांनी सांगितले होते की, ‘कू’ आता जगातील दुसरे सर्वांत मोठे सामाजिक माध्यम बनले आहे.

३. ‘कू’च्या संकेतस्थळावर दिलेल्या माहितीनुसार, भारताव्यतिरिक्त अमेरिका, ब्रिटन, सिंगापूर, कॅनडा, नायजेरिया, संयुक्त अरब अमिरात, अल्जेरिया, नेपाळ, इराण यांच्यासह २०० हून अधिक देशांमध्ये ‘कू’चा वापर होत आहे. ‘कू’ ही प्रणाली वर्ष २०२० मध्ये बेंगळुरू येथील ‘बाँबीनेट टेक्नलॉजिस प्रा.लि.’ या आस्थापनाने सिद्ध केली आहे.

संपादकीय भूमिका

एरव्ही भाषण स्वातंत्र्याविषयी बोलणारे आता गप्प का ? ‘टि्वटर’च्या मनमानीपणाविषयी सरकारने त्याला जाब विचारला पाहिजे !