कुत्र्याचे शेपूट कितीही सरळ करण्याचा प्रयत्न केला, तरी ते वाकडेच रहाते, अशा अर्थाची आपल्याकडे एक म्हण आहे. ती चीनच्या संदर्भात तंतोतंत लागू पडते. आपण कितीही चांगले वागलो किंवा कितीही मानवता दाखवली, तरी चीनच्या युद्धखोर प्रवृत्तीत यत्किंचितही पालट होत नाही, उलट ती दिवसेंदिवस वाढतच चाललेली दिसते. याचा प्रत्यय नुकताच तवांग येथे पुन्हा एकदा आला. चीनच्या ‘पिपल्स लिबरेशन आर्मी’ने ९ डिसेंबर २०२२ च्या रात्री अरुणाचल प्रदेशच्या तवांग येथील यांगत्से भागात प्रत्यक्ष नियंत्रणरेषेचे उल्लंघन करत भारतात उघडउघड घुसखोरी केली. ही घुसखोरी भारताच्या पराक्रमी सैनिकांनी यशस्वीरित्या रोखत चिन्यांचे मनसुबे उधळून लावले. या संघर्षापूर्वी चीनने अरुणाचल प्रदेशच्या सीमेमध्ये २-३ वेळा ‘ड्रोन’ धाडले होते, तेही आपण पिटाळून लावले. चीनच्या वाढत्या कुरापती पहाता भारतीय वायूदलाने या भागात लढाऊ विमाने तैनात केलीच होती. थोडक्यात गेल्या काही दिवसांपासून चीन ज्या पद्धतीने भारताच्या सीमेत येऊन आगळीक करण्याचा प्रयत्न करत होता, त्याच पद्धतीने भारतीय सैन्यही त्याला धडा शिकवायला सज्ज होते, हेच तवांग येथील घटनेवरून सिद्ध होते. चीनने भारतात घुसखोरी करण्याची ही पहिलीच वेळ नाही. चिनी सैन्य सीमा भागांतील घनदाट जंगलांचा अपलाभ उठवत लपून-छपून तर नेहमीच घुसखोरी करत असते; पण त्याने अनेकदा उघडउघडही घुसखोरी केली आहे. वर्ष २०१४ मध्ये केंद्रात मोदी सरकार आल्यापासून चीनच्या कुरापतींत वाढ झाल्याचे दिसून येते. त्यापूर्वी काँग्रेसच्या सत्ताकाळात अशी घुसखोरी झाल्याचे काँग्रेस सरकारने भारतियांना कदाचित् कळूही दिले नसेल. वर्ष २०१४ मध्ये लडाखजवळील चुमार गावात चीनने थेट भारतीय सीमेत शिरकाव करून बांधकाम चालू केले. त्यापुढील वर्षी, म्हणजे वर्ष २०१५ मध्ये लडाखमधीलच बुर्टस येथे चिनी सैनिकांनी हेरगिरीसाठी वास्तू उभारली. ती भारतीय सैनिकांनी उद्ध्वस्त केली. त्यानंतर चीनने सर्वांत मोठी कुरापत काढली, ती २०१७ या वर्षी डोकलाममध्ये. तेथेही चिनी सैन्याने नेहमीप्रमाणे निषिद्ध भागात रस्ताबांधणी चालू केली होती. त्यास भारताने प्रखर विरोध केला. त्या वेळी चीनने भारतावर अक्षरशः दादागिरी करून दहशत निर्माण करण्याचा आटोकाट प्रयत्न केला; पण भारतीय सैन्य त्यास मुळीच बधले नाही. उलट भारतीय सैन्य बुटक्या चिनी सैन्यासमोर एखाद्या पहाडाप्रमाणे उभे राहिले. कुणीही माघार घेण्यास सिद्ध नसल्याने दोन्ही देशांचे सैन्य तब्बल ७२ दिवस एकमेकांसमोर उभे ठाकले होते. या घटनेनंतर ३ वर्षांनी, म्हणजे वर्ष २०२० मध्ये चीनने लडाखमधील गलवान खोर्यात नुसतीच घुसखोरी केली नाही, तर भारतीय सैनिकांशी झटापटीही केली. या वेळी चिनी सैनिकांच्या हातात लाठ्या-काठ्या होत्या. यास भारतीय सैनिकांनी ‘जशास तसे’ प्रत्युत्तर दिले. या संघर्षात भारताचे २० सैनिक हुतात्मा झाले, तर चिन्यांचे ३८ सैनिक मारले गेले. तथापि चीनने आजपर्यंत ना या घटनेविषयी जगाला सत्य सांगितले, ना त्यांच्या मृत सैनिकांचा आकडा घोषित केला. या संघर्षाचा व्हिडिओही प्रसारित झाला आहे. आता वर्ष २०२२ मध्ये चीनने तवांगमधील अतीथंडीचा अपलाभ उठवत भारतावर चाल केली, जी भारताने त्यांच्यावरच उलटवली. येथेही भारतीय सैनिकांनी चिन्यांना धूळ चारली आणि शब्दशः पळवून पळवून मारले. चीनच्या या सर्व आक्रमणांवरून हेच लक्षात येते की, त्याच्या या कुरापती नसून त्याने भारताविरुद्ध थेट युद्धच पुकारले आहे. त्यामुळे भारतानेही त्याला अधिकाधिक कठोर प्रत्युत्तर दिले पाहिजे !
विरोधकांचे राजकारण संतापजनक !
तवांग येथे ९ डिसेंबरला घडलेली ही घटना १२ डिसेंबरला उघडकीस आली. त्यामुळे विरोधकांनी मोदी सरकारला लक्ष्य करत सरकारने ही घटना लपवल्याचा आरोप केला. विरोधकांचा येथपर्यंतचा विरोध एकवेळ समजण्यासारखा आहे; पण निवळ पक्षीय राजकारणाच्या हेव्यादाव्यांतून केलेले आरोप कितपत योग्य आहेत ? खरे तर अशा वेळी या पराक्रमासाठी देशाच्या सैनिकांच्या पाठीवर कौतुकाची थाप देऊन त्यांना प्रोत्साहन देणे आवश्यक होते. तसे होणे तर दूरचेच; पण काँग्रेसी प्रवृत्तीच्या लोकांनी यापूर्वी भारतीय सैन्याविषयीच अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत, ज्याचा उल्लेख भाजपकडून वारंवार केला जातो. असे भेद शत्रूच्या पथ्यावर पडतात आणि शत्रू त्याचा पुरेपूर लाभ उठवतात, हे विरोधकांनी लक्षात घेतले पाहिजे आणि किमान राष्ट्रहितासाठी तरी महाभारतात सांगितल्याप्रमाणे ‘वयम् पंचाधिकम् शतम्’ (आपापसांतील संघर्षात आम्ही १०० विरुद्ध ५ असू; पण तिसरा कुणी आमच्याविरुद्ध उभा ठाकला, तर आम्ही १०५ असू) हे सदैव लक्षात घेतले पाहिजे. या सर्व रणधुमाळीत जेव्हा काँग्रेसने सरकारवर आरोप केले, तेव्हा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काँग्रेसने हाच चीन आणि झाकीर नाईक यांच्याकडून पैसे घेतल्याचे सांगत काँग्रेससमोर आरसा धरला. त्यामुळे काँग्रेस पुरती तोंडघशी पडली. वास्तविक हे सूत्र अतिशय गंभीर आणि चौकशीयोग्य आहे. सरकारने यातील दोषींना देशद्रोह केल्यासाठी आजन्म कारागृहात टाकले पाहिजे. काँग्रेसचे पहिले पंतप्रधान असलेले जवाहरलाल नेहरू यांचे चीनप्रेम सर्वश्रुत आहे. तेव्हापासून चीन सतत आपली भूमी बळकावू पहात आहे. यावरून ‘काँग्रेस चीनकडून घेतलेल्या पैशांना जागली का ?’, असा प्रश्न राष्ट्रप्रेमींच्या मनात निर्माण झाल्याविना रहात नाही.
चीनला ‘हीच’ भाषा समजेल !
चीनची विस्तारवादाची भूक आसुरी आहे. चीनची सीमा तब्बल १४ देशांना लागून आहे. या ‘ड्रॅगन’ने भारताचा मोठा भूभाग आधीच गिळंकृत केला असून त्याला आता अरुणाचल प्रदेशही हवा आहे. त्यामुळे चीनला व्यापार, राजकारण, संरक्षण आधी सर्वच पातळ्यांवर धडा शिकवून नामोहरम करावे लागेल. त्याचा शुभारंभ चीनचा भारतातील लाखो कोटी रुपयांचा व्यापार रोखून करणे सहजशक्य आहे. ते धाडस सरकारने आता दाखवावे. चीनला हीच भाषा अधिक चांगली समजेल.