आंतरिक आनंद, समाधान आणि ‘श्रीकृष्णाची सेवा’ या भावाने नृत्य करणार्‍या देहली येथील प्रसिद्ध भरतनाट्यम् नृत्यांगना आणि नृत्यगुरु पद्मश्री सौ. गीता चन्द्रन् !

ईश्वरप्राप्तीसाठी संगीतयोग

२६.१०.२०२२ या दिवशी महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या साधिका संगीत विशारद आणि संगीत समन्वयक सुश्री (कु.) तेजल पात्रीकर (आध्यात्मिक पातळी ६२ टक्के) यांनी देहलीतील प्रसिद्ध भरतनाट्यम् नृत्यांगना अन् कर्नाटकी गायिका पद्मश्री सौ. गीता चन्द्रन् यांची भेट घेतली. या भेटीत सौ. गीता चन्द्रन् यांनी उलगडलेला त्यांच्या नृत्यसाधनेचा प्रवास येथे दिला आहे. 

नृत्यसाधना

८.१२.२०२२ या दिवशी प्रसिद्ध झालेल्या भागात ‘पद्मश्री सौ. गीता चन्द्रन् यांना लाभलेले नृत्यगुरु आणि त्यांना नृत्यगुरूंकडून शिकायला मिळालेली सूत्रे’ हा भाग पाहिला. आजच्या भागात ‘आध्यात्मिक गुरूंकडून त्यांना मिळालेली शिकवण आणि पवित्र स्थानी नृत्य करण्यामुळे झालेले लाभ’ यांविषयीची सूत्रे दिली आहेत.

डावीकडून सुश्री (कु.) तेजल पात्रीकर आणि सौ. गीता चन्द्रन्

३. नृत्य करण्याच्या स्थानाचे महत्त्व

३ अ. मंदिरात नृत्य करतांना ते विनासायास होणे, मंदिरात सलग ४ – ५ घंटे नृत्य करूनही थकवा न जाणवणे, तर इतर ठिकाणी नृत्य करतांना दुप्पट शक्ती व्यय होणे : ‘काही नाट्यगृहे वेगळी आहेत’, असे मला जाणवते, विशेषत्वाने देहलीतील ‘चिन्मय मिशन’चे नाट्यगृह मला वैशिष्ट्यपूर्ण वाटते; कारण तिथे त्यांची व्याख्याने, तसेच भजनसंध्या अशा सकारात्मक गोष्टी चालू असतात. त्यामुळे तेथील वातावरण सकारात्मक ऊर्जेने भारलेले असते. इतर काही ठिकाणी गेल्यावर मला ‘तेथे चांगली शक्ती नाही’, असे जाणवते. ‘मंदिरांच्या तुलनेत अशा ठिकाणी नृत्य सादर करण्यासाठी दुप्पट शक्ती व्यय करावी लागते’, हे मी प्रकर्षाने अनुभवले आहे. मंदिरात नृत्य करतांना ते विनासायास होते. कोणाची ये-जा चालू असली, तरी त्याचे काहीच वाटत नाही. तिथे तल्लीन होऊन आणि स्वतःला विसरून नृत्य केले जाते. तेव्हा मी एका वेगळ्याच विश्वात असते. तिथे सलग ४ घंटे नृत्य करूनही थकवा न जाणवता उत्साही वाटते. त्यामुळे नृत्य करायचे ‘स्थान’ हे निश्चितपणे महत्त्वाचे आहे.

३ आ. स्वतःच्या नृत्यकक्षात नृत्याचा सराव सतत चालू असल्याने आणि तिथे नृत्यगुरु अन् आध्यात्मिक गुरु येत असल्याने ‘नृत्यकक्ष पवित्र झाला आहे’, असे जाणवणे : नृत्याचा सराव करण्याच्या माझ्या कक्षात मी नृत्याचा सराव करते, नृत्य शिकवते आणि नृत्याविषयी अन्य सर्व गोष्टीही करते. त्यामुळे तो कक्ष मला अतिशय पवित्र वाटतो. ‘मी नृत्याचा सराव जेवढा अधिकाधिक करते, तसे ते स्थान अधिकाधिक पवित्र होत आहे’, असे मला वाटते; कारण तेथे माझे नृत्यगुरु आणि माझे आध्यात्मिक गुरु येऊन ती जागा पवित्र करतात. त्यामुळे ते स्थान मला ‘सजीव आहे’, असे जाणवते. तिथे लहान मुलेही नृत्य शिकत असल्यामुळे ही प्रक्रिया अखंड चालू रहाते.

३ इ. सर्व कलाकारांमध्ये सूक्ष्मातून जाणण्याची विशेष क्षमता असणे : सर्व कलाकारांना सूक्ष्मातून सकारात्मक किंवा नकारात्मक स्पंदने जाणवतात. ही त्यांना देवाकडून मिळालेली एक विशेष देणगी असल्यामुळे प्रत्येक कलाकाराची वातावरणातील स्पंदने सूक्ष्मातून जाणण्याची क्षमता चांगली असते.

४. नृत्यरसांत पूर्णपणे डुंबून गेल्यावर नृत्याच्या सर्व तांत्रिक गोष्टींच्या पलीकडे जाऊन नृत्याविष्कारात रमता येणे आणि हेच खरे जग असणे

माझे आध्यात्मिक गुरु म्हणायचे, ‘नृत्यरसांत तुम्ही एवढे डुंबून जा की, तुम्ही उभे राहिलात, तरी ते रस सहजतेने शिंपले जातील.’ त्यासाठी पुष्कळ सराव, वाचन, जप आणि ध्यान केले पाहिजे. त्यानंतर नृत्यसराव हा केवळ कौशल्यपूर्ण सराव न रहाता त्यातून ध्यानाची अनुभूती येऊ लागते. अनेक वर्षे नृत्याचा सराव केल्यामुळे त्यातील कौशल्याकडे, उदा. ‘माझा हात योग्य जागी आहे ना ? माझ्या डोळ्यांची हालचाल योग्य आहे ना ?’, याची काळजी करण्याची आवश्यकता उरत नाही. नृत्याला आवश्यक त्याप्रमाणे आपोआप हालचाली होतात. नृत्याच्या सर्व तांत्रिक गोष्टींसह त्याच्या पलीकडेही जाता येते. ‘नृत्याविष्कारात रमणे’, यासारखे दुसरे जग नाही.

५. सनातन धर्मात गायन आराधनेला उच्च स्थान असून ‘नृत्य’ आणि ‘संगीत’ या माध्यमांतून साधना करण्याची संधी मिळणे, ही पुष्कळ भाग्याची गोष्ट !

‘राधारमण मंदिरा’तील माझे गुरु श्रीवत्स गोस्वामीजी म्हणायचे,

श्रुतिकोटिसमं जप्यं जपकोटिसमं हविः ।
हविःकोटिसमं गेयं गेयं गेयसमं विदुः ।

अर्थ : वेदपारायणापेक्षा मंत्रजप करणे, कोटी पटींनी चांगले, मंत्रजपापेक्षा हवि अर्पण करणे, कोटी पटींनी चांगले आणि हवि अर्पणापेक्षा भक्ती करणे, हे कोटी पटींनी अधिक चांगले होय.

‘ईश्वराला आळवण्यासाठी भक्तीगीतापेक्षा अन्य कोणताही चांगला पर्याय नाही’, असा या वचनाचा आशय आहे.

श्लोकाचा भावार्थ : एखादा जप अथवा एखादे प्रवचन ऐकणे चांगले आहे; पण स्वतः जप करणे, हे अधिक चांगले आहे. होम-हवन करणे, हे त्यापेक्षाही चांगले आहे. ‘गेय आराधना’ म्हणजे गायन, वादन अथवा नृत्य करणे, हे त्याहीपेक्षा चांगले असून त्यानंतर अधिक चांगले काही नाही’, असे सनातन धर्माच्या धार्मिक ग्रंथांतून सांगितले आहे. त्यामुळे सनातन धर्माच्या सर्व परंपरांत गेय आराधनेला उच्च स्थान दिले गेले आहे.

याचाच अर्थ असा होतो की, या जन्मात नृत्य आणि संगीत यांच्या माध्यमातून साधना करण्याची संधी मिळणे, ही पुष्कळ भाग्याची गोष्ट आहे. त्यामुळे नृत्य करण्याचा मूळ हेतू लक्षात येतो.’

– पद्मश्री सौ. गीता चन्द्रन् (भरतनाट्यम् नृत्यांगना आणि नृत्यगुरु), देहली (२६.१०.२०२२)

पद्मश्री सौ. गीता चन्द्रन् यांनी महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या कार्याविषयी काढलेले गौरवोद्गार !

१. संगीत आणि नृत्य या विषयांवर महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय करत असलेले संशोधन, हे समाजासाठी पुष्कळ मोठे योगदान !

‘गोवा येथील महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने संगीत आणि नृत्य यांच्या संदर्भात होत असलेल्या संशोधन कार्याविषयी ऐकून मला पुष्कळ आनंद झाला. आजच्या पिढीला वैज्ञानिक दृष्टीकोनातून सर्व गोष्टी समजावून सांगाव्या लागतात. आपण असे संशोधन करून त्यांचे चांगले परिणाम इतरांना दाखवता, हे समाजासाठी पुष्कळ मोठे योगदान आहे. कर्णकर्कश संगीत आणि सात्त्विक संगीत यांतील भेद, अशा संगीताचा गायक अन् श्रोते यांच्यावर होणारा परिणाम, नृत्याचा नर्तक आणि प्रेक्षक यांच्यावर होणारा परिणाम, वातावरणाचा नृत्यावर होणारा परिणाम, याच समवेत नृत्यामुळे निर्माण होणार्‍या चांगल्या आणि नकारात्मक स्पंदनांचा अभ्यास करणे’, या सगळ्यांविषयीचे हे शोधकार्य समाजासाठी पुष्कळ मोठे योगदान ठरणार आहे.

२. संगीत, नृत्य इत्यादी भारतीय कलांनी दिलेला श्रेष्ठ आणि सामर्थ्यवान वारसा, हाच भारतीय संस्कृतीचा मुख्य पाया असणे

आज लोक पाश्चात्त्यांचे अंधानुकरण करतात. ‘भारतीय संस्कृतीने किती श्रेष्ठ आणि सामर्थ्यवान गोष्टी आपल्याला दिल्या आहेत’, हे त्यांच्या लक्षात येत नाही. आपण खरोखरंच अशा संशोधन कार्यात सहभागी झाले पाहिजे, जे संशोधन वैज्ञानिक परिभाषेद्वारे सांगू शकेल की, भारतीय संगीत, नृत्य आणि अन्य कला यांचा इतका मोठा अन् परिपूर्ण (उत्कृष्ट) इतिहास आहे, ज्याने हा समाज टिकवून ठेवला आहे. हा इतिहासच आमची खरी ओळख असून हा भारतीय संस्कृतीचा मुख्य पाया आहे !’
– पद्मश्री सौ. गीता चन्द्रन् (भरतनाट्यम् नृत्यांगना आणि नृत्यगुरु), देहली (२६.१०.२०२२)

या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/634192.html

सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे सूक्ष्म. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या सूक्ष्म संवेदना जाणवतात. या सूक्ष्माच्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.