आंतरिक आनंद, समाधान आणि ‘श्रीकृष्णाची सेवा’ या भावाने नृत्य करणार्‍या देहलीतील प्रसिद्ध भरतनाट्यम् नृत्यांगना अन् नृत्यगुरु पद्मश्री सौ. गीता चन्द्रन् !

ईश्वरप्राप्तीसाठी संगीतयोग

नृत्यसाधना

२६.१०.२०२२ या दिवशी महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या साधिका संगीत विशारद आणि संगीत समन्वयक सुश्री (कु.) तेजल पात्रीकर (आध्यात्मिक पातळी ६२ टक्के) यांनी देहलीतील प्रसिद्ध भरतनाट्यम् नृत्यांगना अन् कर्नाटकी गायिका पद्मश्री सौ. गीता चन्द्रन् यांची भेट घेतली. त्या नृत्यगुरु असून पद्मश्रीसह अनेक नागरी पारितोषिकांनी सन्मानित आहेत. त्यांनी ‘दूरचित्रवाणी, चलत्चित्र (व्हिडिओ), चित्रपट, रंगमंच, नृत्य संरचना, नृत्य शिक्षण आणि नृत्याशी संबंधित पत्रकारिता’ यांमध्ये काम केले आहे.

सुश्री (कु.) तेजल पात्रीकर यांच्याशी संवाद साधण्यापूर्वी त्यांनी ‘बसो मोरे नैननमें नंदलाला’ ही बंदिश गायली. त्यांनी उलगडलेला त्यांच्या नृत्यसाधनेचा प्रवास येथे दिला आहे.

(भाग १)

डावीकडून सुश्री (कु.) तेजल पात्रीकर आणि सौ. गीता चन्द्रन्

१. पद्मश्री सौ. गीता चन्द्रन् यांना नृत्यसाधना करतांना लाभलेले वेगवेगळे गुरु आणि त्यांच्याकडून शिकायला मिळालेली वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे  

१ अ. नृत्यगुरु श्रीमती स्वर्ण सरस्वती – यांच्याकडून नृत्यकौशल्याच्या समवेत नृत्यकला आत्मसात करायला शिकणे आणि त्यांच्या मार्गदर्शनाने नृत्यप्रशिक्षणाचा पाया पक्का होणे : ‘मी वयाच्या ५ व्या वर्षापासून श्रीमती स्वर्ण सरस्वती यांच्या मार्गदर्शनाखाली नृत्य शिकायला आरंभ केला. त्यांनी कधीही प्रेक्षकांसाठी नृत्य सादर केले नाही. त्या केवळ धार्मिक कारणांसाठी नृत्यसेवा सादर करायच्या. त्यांच्यासाठी नृत्य ही ईश्वराची ‘पूजा’ आणि ईश्वरासाठी केलेले ‘समर्पण’ होते. त्यामुळे त्यांचे नृत्य कलात्मक आणि कौशल्यपूर्ण असायचे. कौशल्य आणि कला यांत फार मोठा भेद आहे. आपल्याला कौशल्य शिकता येते; परंतु कला आत्मसात व्हावी लागते. ती अनुभवावी लागते आणि ती आपल्या पेशीपेशींमध्ये झिरपावी लागते. ही शिकवण मला स्वर्णअम्मांनी दिली. त्यांच्या मार्गदर्शनाने माझ्या नृत्यप्रशिक्षणाचा पाया पक्का झाला. त्या एक उत्कृष्ट गायिका होत्या. संगीतातील प्रत्येक बारकावे त्या नृत्यातून प्रकट करायच्या. त्यांच्या नृत्यशैलीत संगीत आणि नृत्य यांचा सुंदर ताळमेळ असायचा. तीच शैली मी अजूनही जपत आहे. ‘अशा गुरूंकडे मला अनेक वर्षे नृत्य शिकता आले’, याबद्दल मला पुष्कळ कृतज्ञता वाटते.

१ अ १. श्रीमती स्वर्ण सरस्वती यांनी शिष्येची कधीही प्रशंसा न करणे : गुरु नेहमीच शिष्याला सर्व दृष्टींनी उच्च स्थानाकडे नेण्यासाठी प्रयत्नरत असतात. श्रीमती स्वर्ण सरस्वती यांनी माझी कधीच प्रशंसा केली नाही. त्या केवळ त्यांची मान हलवायच्या अन् तीच माझ्यासाठी सर्वांत मोठी प्रशंसा असायची. त्यांनी माझे कधीच कौतुक केले नाही. त्यामुळे मला वाईट वाटून रडू यायचे. एकदा माझी आई त्यांना भेटायला गेल्यावर त्या माझ्या आईला म्हणायच्या, ‘‘तिला कसे हाताळायचे’, ते मला ठाऊक आहे. ती चांगले नृत्य करते; मात्र मी तिची कधीच प्रशंसा करणार नाही; कारण ती डोक्यावर बसेल (तिच्यातील अहं वाढेल.). मला तिची नृत्य करण्याची क्षमता वाढवायची आहे.’’ गुरु शिष्याचे व्यक्तिमत्त्व आणि स्वभाव अचूकपणे ओळखतात.

१ आ. दुसरे नृत्यगुरु दक्षिणामूर्ती : नंतर मी दुसरे नृत्यगुरु दक्षिणामूर्ती यांच्याकडून नृत्य शिकले. त्यांनी मला रंगमंचावर नृत्य करायचे कौशल्य शिकवले. एका कलाकाराच्या दृष्टीने तेही महत्त्वपूर्ण आहे.

१ इ. एक नृत्यांगना आणि अर्थशास्त्रज्ञ असलेल्या श्रीमती जमुना कृष्णन् – यांनी समकालीन नृत्य शिकवणे : त्यानंतर मी श्रीमती जमुना कृष्णन् यांच्याकडे नृत्य शिकायला गेले. त्यांनी मला समकालीन (टीप) नृत्य शिकवले. त्या स्वतः एक नृत्यांगना आणि अर्थशास्त्रज्ञ होत्या. त्यामुळे मी त्यांना वेगवेगळे प्रश्न विचारायचे आणि त्यावर विचारविनिमय करायचे.

सध्याची तरुण पिढी म्हणते की, ‘आम्ही नृत्य पाहिले आहे; पण त्याविषयी आम्हाला काही ठाऊक नाही.’ तेव्हा मला पुष्कळ वाईट वाटते. या नृत्यकलेत पुष्कळ काही दडले आहे. पुनःपुन्हा त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, तर प्रत्येक वेळी एखादे नवीन रत्न किंवा नवीन ज्ञान मिळेल. नृत्यप्रवास पुष्कळ मोठा आणि तितकाच अद्भूत आहे. नृत्यात पूर्वीपासून जे आहे, ते शोधतांना मला प्रतिदिन रोमांचक वाटते. नृत्य हे अथांग सागराप्रमाणे आहे. त्यामुळे हा अनंताचा प्रवास आणि शोध निरंतर चालू राहील !

(टीप : समकालीन नृत्य – ज्यामध्ये आधुनिक, जाझ, भावनाविवश आणि शास्त्रीय नृत्य यांचा समावेश असतो. आजच्या विसाव्या शतकात विकसित झालेली ही एक प्रचलित शैली आहे.)

२. नृत्य आणि संगीत हे केवळ सादरीकरण नसून ते सेवेचे एक रूप असणे

२ अ. वृंदावनातील ‘राधारमण मंदिरा’त नृत्य करतांना नृत्य करण्याचा उद्देश समजणे आणि त्यानंतर प्रेक्षकांसाठी नृत्य न करता स्वतःची अंतर्शुद्धी, समाधान अन् आनंद यांसाठी नृत्य करू लागणे : ‘नृत्य आणि संगीत हे माझ्यासाठी केवळ सादरीकरण नसून ते सेवेचे एक रूप आहे. श्रीकृष्णाची सेवा विविध माध्यमांतून करू शकतो. त्यांपैकी ‘गायन’, ‘वादन’ आणि ‘नृत्य’ या सर्वांत उच्च स्तरांवरील सेवा आहेत. असे म्हटले जाते की, ‘श्रीकृष्णाला प्रसन्न करण्याचा हा सर्वांत सोपा मार्ग आहे.’

बर्‍याच वर्षांपूर्वी मी वृंदावन येथे गेले असतांना मला तेथील ‘राधारमण मंदिरा’त नृत्यसेवा करण्याची संधी मिळाली होती. तेव्हा मला वाटले, ‘हे काहीतरी वेगळेच घडत आहे.’ ‘मी नृत्य का करते ? त्याचा उद्देश काय आहे ?’, हे त्या वेळी माझ्या लक्षात आले. त्यानंतर मी कधीही प्रेक्षकांसाठी नृत्य केले नाही. मी केवळ या नृत्यकलेतून काही विशेष अनुभव घेण्यासाठी आणि अंतर्शुद्धी, आंतरिक समाधान अन् आनंदप्राप्ती यांसाठी नृत्य केले.

२ आ. नृत्य आणि गायन यांचा सराव केल्याने आंतरिक आनंद अन् समाधान लाभणे : मी माझ्याभोवती असणार्‍या प्रभावळीचे (‘ऑरा’चे) मूल्यांकन करू शकत नाही; परंतु ‘नृत्य करणे आणि न करणे’, यांतील भेद मी नक्कीच अनुभवला आहे. ज्या दिवशी माझ्याकडून नृत्य किंवा गायन यांचा सराव केला जात नाही, त्या दिवसापेक्षा सराव केलेल्या दिवशी मला आतून पुष्कळ शांती जाणवते. त्या दिवशी माझे वर्तन अधिक चांगले असते. मी प्रतिदिन नृत्य किंवा गायन यांचा सराव करण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे सराव केल्याने मला आंतरिक आनंद आणि समाधान लाभते.’

(क्रमशः)

– पद्मश्री सौ. गीता चन्द्रन् (भरतनाट्यम् नृत्यांगना आणि नृत्यगुरु), देहली (२६.१०.२०२२)

या लेखाचा पुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/636142.html