तवांगमध्ये भारतीय सैन्याने चिनी सैनिकांना चोपल्याचा व्हिडिओ प्रसारित !

तवांग (अरुणाचल प्रदेश) – येथील यंगत्से भागातील सीमेवर ९ डिसेंबरला भारत आणि चीन यांच्या सैन्यात झालेल्या संघर्षाच्या संदर्भात आता एक व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित होत आहे; मात्र ‘हा व्हिडिओ याच घटनेचा आहे’, याला कोणताही अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. या व्हिडिओमध्ये ३०० हून अधिक चिनी सैनिक तात्पुरत्या भिंतीवरील कुंपण तोडून भारतीय सीमेत प्रवेश करण्याचा प्रयत्न करताच सज्ज भारतीय सैनिकांनी त्यांना जोरदार प्रतिकार करत त्यांना चोप दिला.

१.  २ मिनिटे ४७ सेकंदांच्या या व्हिडिओमध्ये चिनी सैनिकांच्या हातात काटेरी काठ्या दिसत आहेत. आधुनिक रायफल खांद्यावर लटकत आहेत. चित्रीकरणासाठी त्यांनी ड्रोनही आणले होते. या वेळी भारतीय सैनिकही काटेरी काठ्या घेऊन उभे होते. चिनी सैनिक तारेचे कुंपण तोडून भारतीय सीमेत येण्याचा प्रयत्न करताच भारतीय सैनिक त्यांच्यावर तुटून पडले. त्यामुळे चिनी सैनिकांना माघार घ्यावी लागली.

२. भारतीय सैनिकांना चिनी सैनिकांकडून अशा प्रकारचे कृत्य करण्याची शक्यता असल्याची माहिती आधीच मिळाली होती. त्यामुळे ते तशाच शस्त्रांनी चोख प्रत्युत्तर देण्यास सिद्ध होते. दोन्ही सैन्य समोरासमोर आल्यावर भारतीय सैनिकांनी चिनी सैनिकांना चोपले. यानंतर घाबरलेल्या चिनी लोकांनी तेथून पळ काढला. या चकमकीत अनेक चिनी सैनिकांची हाडे मोडली. तसेच भारताचे ६ सैनिक घायाळ झाले.