देहलीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांनी जरी काही दिवसांपूर्वी चलनी नोटांवर श्री लक्ष्मी आणि श्री गणेश यांचे छायाचित्र छापण्याची मागणी करून ते हिंदुविवादी असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न केला असला, तरी प्रत्यक्षात त्यांचे आणि त्यांच्या आम आदमी पक्षातील नेत्यांचे वागणे हिंदुविरोधी आहे. याविषयीचा ऊहापोह प्रस्तुत लेखात केला आहे.
१. काँग्रेस आणि डावे यांच्या हिंदुविरोधी हातमिळवणीमुळे चलनी नोटांवर देवतांची चित्रे नाहीत !
‘एरव्ही सरकारी तिजोरीतून मुल्ला-मौलवींवर खैरात करणारे देहलीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अचानक हिंदू आणि हिंदुत्वाची आठवण झाल्याचे दिसते. नुकतीच त्यांनी भारतीय चलनी नोटांवर महात्मा गांधी यांच्यासह श्री लक्ष्मी आणि श्री गणेश यांची प्रतिमा छापण्याची मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली. त्यामागे ‘देशाची ढासळती अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी साहाय्य होईल, तसेच श्री लक्ष्मी आणि श्री गणेश यांचा आशीर्वादही मिळेल’, असे कारणही त्यांनी सांगितले. खरे म्हणजे श्री लक्ष्मी, श्री गणेश आदी देवता, मंदिरे, सण-उत्सव हे सर्व हिंदूंच्या जिव्हाळ्याचे विषय आहेत. वास्तविक बहुसंख्य हिंदू असलेल्या देशात हिंदूंची राष्ट्रीय प्रतीके, श्री लक्ष्मी, श्री गणेश किंवा अन्य देवता यांचा चलनी नोटांवर स्वातंत्र्यापासूनच समावेश करायला हवा होता; पण तसे झाले नाही. त्याला कारण काँग्रेस आणि डावे यांची हिंदुविरोधी हातमिळवणी ! त्यातूनच हिंदू आणि हिंदुत्वाच्या खुणा अन् प्रतीके यांना न्यून लेखण्याचे उद्योग झाले. हिंदूंनीच हिंदूंच्या विरोधात उभे ठाकावे आणि हिंदूंना ते हिंदु असल्याची लाज वाटावी, यांसाठी प्रयत्न करण्यात आले.
२. ‘आप’चा हिंदुद्रोही इतिहास !
अर्थात् असे असले, तरी देशात दुसर्या बाजूला रा.स्व. संघ, विश्व हिंदु परिषद, अन्य संघटना, तसेच जनसंघ आणि नंतरच्या भाजपच्या माध्यमातून हिंदू अन् हिंदुत्वाचा स्वाभिमान जागवण्याचे कार्य चालूच आहे. त्यातूनच वर्ष २०१४ मध्ये हिंदुत्वाचे जाहीर प्रकटीकरण करणारे नरेंद्र मोदी यांना भारतीय जनतेने पंतप्रधानपदी बसवले आणि वर्ष २०१९ मध्येही आधीपेक्षा अधिक जागा दिल्या. अनेक राज्यांच्या विधानसभा निवडणुकीतही भाजपला दणदणीत यश मिळू लागले. ते पाहूनच राहुल गांधी यांच्यापासून ते अरविंद केजरीवाल यांच्यापर्यंत सर्व रंगबदलू नेते कामाला लागले. राहुल गांधी यांना अचानक ‘ते स्वतः दत्तात्रय गोत्री आणि जानवेधारी ब्राह्मण असल्याचा साक्षात्कार झाला’ अन् ते मठ-मंदिरांचे उंबरठे झिजवू लागले. त्याचप्रमाणे आता अरविंद केजरीवाल यांनाही चलनी नोटांवर श्री लक्ष्मी आणि श्री गणेश यांची प्रतिमा छापण्याची मागणी करावीशी वाटली. ‘असे केले, तर आपल्यामागे हिंदु मतदार उभे ठाकतील आणि निवडणुकीतील हानी टळून आपल्याला विजय मिळेल’, अशी केजरीवाल यांची अपेक्षा आहे; पण देशातील हिंदूंनी अरविंद केजरीवाल यांना पुरते ओळखले आहे. त्यांची स्वतःची आणि त्यांनी स्वतःच्या भोवताली गोळा केलेल्या व्यक्तींची आतापर्यंतची कृत्ये त्यांचा हिंदुद्रोह सांगत आहेत.
२ अ. ‘आप’च्या मंत्र्याकडून सहस्रो हिंदूंचे धर्मांतर ! : ऑक्टोबर मासात देहलीत केजरीवाल यांच्या मंत्रीमंडळातील राजेंद्र पाल गौतम या मंत्र्याने हिंदुविरोधी कृत्य करत सहस्रोंचे धर्मांतर घडवून आणले. त्या वेळी त्यांनी भगवान श्रीराम आणि श्रीकृष्ण यांच्या विरोधात विखारी विधानेही केली; पण निवडणूक काळात हिंदुत्व जागे झालेल्या अरविंद केजरीवाल यांनी ना हिंदुविरोधी कृत्य केल्यावरून राजेंद्र पाल गौतम यांना कडक शब्दांत सुनावले, ना त्यांच्या विरोधात कठोर कारवाई केली. नंतर प्रकरण तापल्याने त्यांनी राजेंद्र पाल गौतम यांच्या केवळ मंत्रीपदाचे त्यागपत्र घेतले; पण पक्षसदस्यत्व कायम ठेवले; म्हणूनच राजेंद्र पाल गौतम हे आजही आम आदमी पक्षाचे सदस्य आणि आमदारही आहेत. अरविंद केजरीवाल हे जर खरोखरच हिंदुत्ववादी असते आणि त्यांना हिंदूंच्या भावनांची जाणीव असती, तर त्यांनी राजेंद्र पाल गौतम यांना पक्षातूनही हाकलले असते; पण तसे झाले नाही आणि म्हणूनच बेगडी हिंदुत्वाची झूल पांघरलेल्या केजरीवाल यांच्या राजेंद्र पाल गौतम यांना पक्षातच ठेवण्याच्या कृत्याकडे अजिबात दुर्लक्ष करता येणार नाही.
२ आ. ‘आप’च्या नेत्याकडून मंदिरांचा ‘शोषणाचे अड्डे’ असा संतापजनक उल्लेख ! : त्याच कालावधीत ‘आप’चे गुजरातचे प्रदेशाध्यक्ष गोपाल इटालिया यांनीसुद्धा हिंदुविरोधी विधान केले. त्यांनी ‘मंदिरे आणि कथामंडप हे शोषणाचे अड्डे बनले असून महिलांनी तेथे जाऊ नये’, असे अतिशय विकृत विधान केले. यावरून अरविंद केजरीवाल यांनी जमवलेल्या लोकांच्या मनात काठोकाठ भरलेला हिंदुद्वेष दिसून येतो. अशाच आशयाचे विधान एकदा राहुल गांधी यांनीही केले होते. ‘मंदिरात पूजा करणारेच मुलींना छेडतात’, असे ते म्हणाले होते. तेव्हापासून राहुल गांधी यांचे राजकारणातील स्थान अप्रासंगिक होत गेले, तसे आता अरविंद केजरीवाल यांचेही होईल; कारण मंदिरे आणि कथावाचन करणारे साधू-संत यांच्या विरोधात अश्लाघ्य भाषा वापरूनही केजरीवाल यांनी गोपाल इटालिया यांच्यावर काहीही कारवाई केली नाही, ते आजही ‘आप’चे गुजरातच्या प्रदेशाध्यक्षपदी विराजमान आहेत. हेच आहे का अरविंद केजरीवाल यांचे हिंदुत्व आणि हिंदु प्रेम ?
३. स्वतः केजरीवाल यांनीही केला होता राममंदिराला विरोध !
अरविंद केजरीवाल यांचे सहकारीच नव्हे, तर स्वतः केजरीवाल यांनीही स्वतःच्या आजीचे नाव घेत अयोध्येतील श्रीरामजन्मभूमीस्थळी बांधल्या जाणार्या राममंदिराला विरोध करत तेथे रुग्णालय बांधण्याची मागणी केली होती. यासह त्यांनी ‘मी त्या मंदिरात कधीही पूजा करणार नाही’, अशी घोषणाही केली होती. आता त्याच केजरीवाल यांना अचानक हिंदुत्वाचा उमाळा कसा काय आला ?
३ अ. दिवाळीत फटाके वाजवणार्यांना कारागृहात टाकण्याची चेतावणी ! : इतकेच नव्हे, तर यंदाच्या दिवाळीपूर्वी त्यांनी ‘दिवाळीत फटाके वाजवणार्यांना कारागृहात डांबू’, अशी जाहीर चेतावणीही दिली होती.
३ आ. काश्मिरी हिंदूंवरील अत्याचारांना संबोधले होते खोटे ! : काश्मिरी हिंदूंवरील अत्याचारांना खोटे पाडत भर विधानसभेत रावणासारखे हसण्याचे कामही याच केजरीवाल यांनी केले होते.
४. ‘आप’चे खरे स्वरूप लोकांसमोर येणे आवश्यक !
थोडक्यात ज्याप्रमाणे काँग्रेसने सातत्याने मुसलमानांचे लांगूलचालन आणि हिंदूंच्या भावना दुखावणारे राजकारण केले, त्याच प्रकारचे राजकारण केजरीवाल हेही करत आहेत. त्यांच्या या राजकारणाला देहलीची जनता बळी पडली. त्यामुळे जनतेने वेळीच सावरण्याची आणि अरविंद केजरीवाल यांची ढोंगबाजी सर्वांसमोर आणण्याची आवश्यकता असून ते काम भाजपसह हिंदूंनीही केलेच पाहिजे.’
(साभार : दैनिक ‘मुंबई तरुण भारत’ वृत्तसंकेतस्थळ, २७.१०.२०२२)
केजरीवाल यांचा खरा मुखवटा उघड होणे आवश्यक !केजरीवाल यांच्या राजकारणाची विशिष्ट अशी शैली आहे. ते प्रामुख्याने हिंदु समाजाला कमकुवत करणार्या तत्त्वांना जाणीवपूर्वक जवळ करतात. केजरीवाल यांचे हे धोरण ‘ब्रेकिंग इंडिया फोर्सेस’ला (भारत देश तोडू पहाणार्यांना) बळ देणारे ठरत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे केजरीवाल यांच्या राजकारणाची ही शैली देशाची राष्ट्रीय एकता, अखंडता आणि सामाजिक स्वास्थ्य यांच्यासाठी अतिशय धोकादायक ठरत आहे, यात कोणतीही शंका नाही.’ – पार्थ कपोले (दैनिक ‘मुंबई तरुण भारत’, ८.१०.२०२२) |