धर्मांधांची हिंदूंवरील आक्रमणे थांबवण्यासाठी कठोर कारवाई करा !

दिग्रस येथील संतप्त हिंदूंची निवेदनाद्वारे मागणी

तहसीलदारांना निवेदन देण्यासाठी हिंदुत्वनिष्ठांनी केलेली गर्दी

दिग्रस (वार्ता.) – शौर्यदिनाच्या दिवशी म्हणजे ६ डिसेंबरला दुचाकी दुरुस्तीच्या दुकानात काम करणारे श्री. उमेश जाधव (वय २२ वर्षे) या हिंदु युवकावर प्राणघातक आक्रमण करून धर्मांधांनी त्याला मारहाणही केली होती. या भ्याड आक्रमणाचा निषेध व्यक्त करण्यासाठी समस्त हिंदूंच्या वतीने येथील तहसीलदार सुधाकर राठोड यांना निवेदन देण्यात आले. निवेदन देतांना मोठ्या संख्येने हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

निवेदनात म्हटले आहे की, हिंदूंना लक्ष्य करून त्यांच्यावर सुनियोजित पद्धतीने वारंवार आक्रमणे होत आहेत. हिंदूंचे सण-उत्सव या कालावधीत दगडफेक करणे, हिंदूंची घरे, वाहने, दुकाने आदींची जाळपोळ करणे, हिंदूंना जिवे मारण्याच्या धमक्या देणे, शासकीय संपत्तीची हानी करणे आदी घटना सातत्याने घडत आहेत. ‘सर तन से जुदा’च्या घोषणाही शहरात उघडपणे दिल्या जातात.

गेल्या काही दिवसांत हिंदूंना जाणीवपूर्वक वेठीस धरण्याचे प्रकार सातत्याने घडत आहेत. दिग्रस शहरासह देशभरात वाढणारी इस्लामिक जिहादी कट्टरता, तसेच हिंसक घटनांची मालिका यांवर प्रतिबंध घालण्यासाठी कठोर कारवाई करण्याची आवश्यकता आहे. शहरातील शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी सरकारने कठोर कारवाई करावी, अशी मागणी मुख्यमंत्री आणि गृहमंत्री, महाराष्ट्र राज्य; पालकमंत्री यवतमाळ; पोलीस अधीक्षक यवतमाळ; उपविभागीय पोलीस अधिकारी दारव्हा यांच्याकडे करण्यात आली आहे.