भारतीय सैनिकांनी चिनी सैनिकांना हुसकावले !  

  • संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचे तवांग येथील प्रकरणी लोकसभेत प्रतिपादन

  • चीनच्या सैनिकांनी भारतीय सीमेत केली होती घुसखोरी !

नवी देहली – अरुणाचल प्रदेशच्या तवांग येथील यांगत्से भागात ९ डिसेंबर २०२२ च्या रात्री चीनच्या पिपल्स लिबरेशन आर्मीच्या सैनिकांनी प्रत्यक्ष नियंत्रणरेषेचे उल्लंघन केले. या वेळी त्यांची भारतीय सैनिकांशी झटापट झाली. भारतीय सैन्याने चीनच्या सैनिकांना घुसखोरी करण्यापासून रोखले आणि त्यांना माघारी जाण्यास भाग पडले. यात दोन्ही बाजूंकडील सैनिक घायाळ झाले. यात भारताचा एकही सैनिक वीरगतीला प्राप्त झाला नाही कि गंभीररित्या घायाळ झाला नाही. यानंतर स्थानिक कमांडरने ११ डिसेंबरला चीनच्या सैन्यासमवेत ध्वज बैठक घेतली. चीनला, ‘असे प्रकार करू नयेत आणि शांतता राखावी’, असे सांगण्यात आले, अशी माहिती संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी १३ डिसेंबर या दिवशी लोकसभेत दिली. तत्पूर्वी संसदेत या प्रकरणावरून विरोधी पक्षांकडून गोंधळ घालण्यात आला.

एक इंचही घेऊ देणार नाही ! – गृहमंत्री अमित शहा

गृहमंत्री अमित शहा

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेबाहेर सांगितले की, चीनने भारताच्या एक इंच भूमीवरही नियंत्रण मिळवलेले नाही आणि आम्ही ते मिळवूही देणार नाही. आपल्या सैनिकांनी शौर्य दाखवले. सैन्याने काही वेळातच घुसखोरांचा पाठलाग केला आणि भूमीचे रक्षण केले. काँग्रेसने लोकसभेत प्रश्‍नोत्तराचा तास चालू दिला नाही. ‘आम्ही तुम्हाला उत्तर देऊ’ असे सरकारने त्यांना सांगितले होते. असे असतांनाही त्यांनी संसदेचे कामकाज चालू दिले नाही. मी प्रश्‍नोत्तराच्या तासाची सूची पाहिली आणि प्रश्‍न क्रमांक ५ पाहिल्यानंतर मला काँग्रेसची चिंता समजली ! त्यांतील एक प्रश्‍न राजीव गांधी फाऊंडेशनच्या ‘फॉरेन कॉन्ट्रिब्युशन रेग्युलेशन अ‍ॅक्ट’ (एफ्.सी.आर्.ए.) परवाना रहित करण्याविषयीचा होता. राजीव गांधी फाऊंडेशनला वर्ष २००५-२००६ आणि २००६-०७ या आर्थिक वर्षांत १ कोटी २० लाख रुपयांचे अनुदान मिळाले. संपूर्ण कायदेशीर प्रक्रियेनंतर गृह मंत्रालयाने त्याची नोंदणी रहित केली आहे. ही रक्कम चिनी दूतावासाकडून प्राप्त झाली होती. ही रक्कम भारत-चीन संबंधांच्या विकासावर संशोधनासाठी वापरली गेली आहे. चीनने वर्ष १९६२ मध्ये काँग्रेसच्या काळात सहस्रो एकर भूमी बळकावली होती.

वायूदलाने ३ वेळा चिनी ड्रोनची घुसखोरी उधळली !

तवांगमध्ये भारत-चीन यांच्या सैनिकांतील संघर्षानंतर भारतीय वायूदलाने अरुणाचल प्रदेशच्या सीमेवर लढाऊ विमानांच्या युद्ध उड्डाणांना प्रारंभ केला आहे. ९ डिसेंबरच्या झालेल्या संघर्षापूर्वी चीनने अरुणाचलच्या सीमेमध्ये ड्रोन पाठवण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर भारतीय वायूदलाने या भागात लढाऊ विमाने तैनात केली होती. मागील काही आठवड्यांत २-३ वेळा येथील सैन्याच्या चौक्यांच्या दिशेने येणार्‍या चिनी ड्रोनला भारतीय लढाऊ विमानांनी पिटाळून लावले.

सरकारने संसदेत आधीच माहिती का दिली नाही ? – खासदार ओवैसी यांचा प्रश्‍न

खासदार ओवैसी

एम्.आय.एम्.चे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी तवांग प्रकरणी सांगितले की,  भारत-चीन सैनिकांमध्ये ९ डिसेंबर या दिवशी संघर्ष झाला. या काळात संसदेचे कामकाज चालू असतांना त्याच दिवशी सरकारने त्याची माहिती का दिली नाही ? ३ दिवसांनी प्रसारमाध्यमे आम्हाला सांगत आहेत, ‘आमचे शूर सैनिक घायाळ झाले आहेत.’

आमचा देशाच्या सैन्यावर पूर्ण विश्‍वास आहे; पण देशात दुर्बल नेतृत्व आहे. चीनचे नाव घेतांनाही मोदी सरकार घाबरते.

भारतीय सीमेवर स्थिती स्थिर ! – चीन

चीनने तवांग प्रकरणी ‘सीमेवरील स्थिती स्थिर आहे’, असे म्हटल्याचे वृत्त ‘ए.एफ्.पी.’ या वृत्तसंस्थेने दिले आहे. दुसरीकडे तवांग सीमेवर झालेल्या संघर्षाच्या प्रकरणी चीनच्या माध्यमांनी कोणतेही वृत्त प्रसिद्ध केलेले नाही. चीनच्या सरकारचे मुखपत्र असणार्‍या ‘ग्लोबल टाइम्स’च्या इंग्रजी आवृत्तीचे संपादक हू शिजिन यांची चीनच्या सामाजिक माध्यमांत एक पोस्ट प्रसारित होत आहे. यात ‘भारत आणि चीन यांच्यातील संघर्षात जीवितहानी झालेली नाही’, असे म्हटले आहे.

संपादकीय भूमिका

चीन अशा कुरापती काढतच रहाणार आहे. त्याला योग्य धडा शिकवल्यावरच त्याच्या अशा कुरापती बंद होतील. त्यासाठी भारताने प्रयत्न करणे आवश्यक आहे !