Manoj Kumar Dies at 87 : मुंबई येथे अभिनेते-दिग्दर्शक मनोज कुमार यांचे निधन !

मनोज कुमार

मुंबई – प्रसिद्ध अभिनेते मनोज कुमार (वय ८७ वर्षे) यांचे ४ एप्रिल या दिवशी सकाळी येथील कोकिलाबेन रुग्णालयात निधन झाले. ते त्यांच्या देशभक्तीपर चित्रपटांसाठी ओळखले जात होते. उपकार, पूरब-पश्चिम, क्रांती, रोटी-कपडा और मकान हे त्यांचे यशस्वी चित्रपट होते. मनोज कुमार यांना ७ ‘फिल्मफेअर’ पुरस्कार मिळाले होते. पहिला फिल्मफेअर पुरस्कार वर्ष १९६८ मध्ये ‘उपकार’ चित्रपटासाठी मिळाला. ‘उपकार’ला सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, सर्वोत्कृष्ट कथा आणि सर्वोत्कृष्ट संवाद असे ४ पुरस्कार मिळाले होते. वर्ष १९९२ मध्ये त्यांना ‘पद्मश्री’ पुरस्काराने सन्मानित केले, वर्ष २०१६ मध्ये त्यांना ‘दादासाहेब फाळके’ पुरस्काराने सन्मानित केले होते.

देशप्रेमाची भावना रुजवणारा महान अभिनेते गमावला ! – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 

ज्येष्ठ अभिनेते आणि दिग्दर्शक मनोजकुमार यांच्या निधनाने भारतीय चित्रपटसृष्टीतील एक महान व्यक्तीमत्त्व आपल्यातून हरपले आहे. चित्रपटांच्या माध्यमातून राष्ट्रभक्ती आणि भारतीय समाजजीवन जनमानसावर बिंबवणार्‍या या अष्टपैलू आणि ‘भारतकुमार’ हे नाव खर्‍या अर्थाने सार्थकी लावणार्‍या कलाकाराला मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या शोकसंदेशात म्हटले आहे.

ज्येष्ठ अभिनेते मनोजकुमार यांच्या निधनामुळे भारतभूमीचा सच्चा सुपुत्र हरपला ! – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

‘मेरे देश की धरती’, ‘ए वतन ए वतन हम को तेरी कसम’ अशी एकाहून एक सरस देशभक्तीपर गीते ज्यांच्यावर चित्रित झाली, असे ज्येष्ठ निर्माते, पटकथाकार, दिग्दर्शक, अभिनेते मनोजकुमार म्हणजे सर्वांचे ‘भारतकुमार’ यांच्या निधनामुळे भारतभूमीचा एक सच्चा सुपुत्र हरपल्याची भावना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली.

लाल बहादूर शास्त्री यांच्या सांगण्यावरून उपकार बनवला !

वर्ष १९६५ मध्ये मनोज कुमार यांनी ‘शहीद’ या देशभक्तीपर चित्रपटात स्वातंत्र्यसैनिक हुतात्मा भगतसिंग यांच्या भूमिकेत काम केले. हा चित्रपट पुष्कळ गाजला आणि त्यातील ‘ए वतन, ए वतन हमको तेरी कसम’, ‘सरफरोशी की तमन्ना’ आणि ‘मेरा रंग दे बसंती चोला’ या गाण्यांना लोकांची चांगली पसंती मिळाली. लालबहादूर शास्त्रींना हा चित्रपट पुष्कळ आवडला. शास्त्रीजींनी ‘जय जवान, जय किसान’चा नारा दिला. शास्त्रीजींनी मनोज यांना या घोषणेवर चित्रपट बनवण्याचा समुपदेश दिला. त्यानंतर मनोज यांनी ‘उपकार’ (वर्ष १९६७) हा चित्रपट बनवला; मात्र लालबहादूर शास्त्री यांचे निधन झाल्याने त्यांना हा चित्रपट पहाता आला नाही. मनोज कुमार यांना आयुष्यभर शास्त्रीजींना चित्रपट दाखवता आला नाही याविषयी खेद राहिला. उपकार या चित्रपटातील ‘मेरे देश की धरती सोना उगले…’ या चित्रपटातील गाणे अजूनही सर्वोत्तम देशभक्तिपर गाण्यांमध्ये गणले जाते. चित्रपटात मनोज कुमार यांचे नाव ‘भारत’ होते. चित्रपटातील गाण्याची लोकप्रियता पाहून माध्यमांनी मनोज कुमार यांना ‘भारत’ म्हणायला प्रारंभ केला आणि नंतर ते ‘भारत कुमार’ म्हणून ओळखले जाऊ लागले.