US Revises Tariff On India : भारतावर प्रथम २६ टक्के, नंतर २७ टक्के आणि आता पुन्हा २६ टक्के व्यापार कर !

ट्रम्प प्रशासनाकडून पालटत जाणारी आकडेवारी !

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प

वॉशिंग्टन (अमेरिका) – अमेरिकेच्या ट्रम्प प्रशासनाकडून भारतावर आधी २६ टक्के, नंतर २७ टक्के आणि आता पुन्हा २६ टक्के व्यापार कर लावण्यात आला आहे. हा कर येत्या ९ एप्रिलपासून लागू होणार आहे.

१. विविध देशांविरुद्ध परस्पर कर लागू करण्याची घोषणा करतांना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांनी एक फलक दाखवला, ज्यामध्ये भारतावर २६ टक्के कर लागू करण्याचा उल्लेख होता. या फलकावर अनेक देशांची नावे आणि त्यांच्यावर किती टक्के कर आकारणी करण्यात आलेली आहे ?, याची माहिती होती. या वेळी ट्रम्प म्हणाले होते की, भारत अमेरिकेतून आयात होणार्‍या वस्तूंवर ५२ टक्के कर लादतो; परंतु अमेरिका भारतावर २६ टक्के इतक्या सवलतीच्या दराने कर आकारेल.

२. तथापि ट्रम्प प्रशासनाने प्रसारित केलेल्या अधिकृत कागदपत्रांमध्ये भारतावर २७ टक्के कर लादण्याविषयी बोलले गेले होते. तथापि अद्ययावत आकडेवारीत तो २६ टक्के असल्याचे सांगण्यात आले.

३. तज्ञांच्या मते, करांमध्ये एक टक्का फरक असल्याने व्यवसायात कोणताही महत्त्वाचा फरक पडणार नाही.

भारताच्या एकूण माल निर्यातीत अमेरिकेचा वाटा १८ टक्के !  

वर्ष २०२१-२२ ते २०२३-२४ पर्यंत अमेरिका भारताचा सर्वांत मोठा व्यापारी भागीदार आहे. भारताच्या एकूण माल निर्यातीपैकी अनुमाने १८ टक्के, आयातीपैकी ६.२२ टक्के आणि द्विपक्षीय व्यापारात १०.७३ टक्के वाटा अमेरिकेचा आहे.

भारत अमेरिकेला सर्वाधिक कोणत्या वस्तू निर्यात करतो ?

वर्ष २०२४ मध्ये भारताच्या अमेरिकेतील प्रमुख निर्यातींमध्ये औषधनिर्माण, दूरसंचार उपकरणे, मौल्यवान आणि अर्ध-मौल्यवान दगड, पेट्रोलियम उत्पादने, सोने आणि इतर मौल्यवान धातूंचे दागिने, तयार सुती कपडे आणि लोखंडांची उत्पादने यांचा समावेश आहे.