गोव्यात केरी, सत्तरी आणि वाळपई येथे भाजपचा मेळावा
केरी, सत्तरी, ४ एप्रिल (वार्ता.) – सनातन धर्माची पुनर्स्थापना गोव्यातून होणार आहे. गोवा ही सनातन धर्माची राजधानी व्हायला हवी, असे उद्गार गोव्याचे आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी काढले. केरी, सत्तरी आणि वाळपई येथे भाजपचे २ मेळावे झाले. या मेळाव्यांमध्ये मंत्री विश्वजीत राणे यांनी वरील उद्गार काढले. या दोन्ही मेळाव्यांत भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक, पर्येच्या आमदार डॉ. दिव्या विश्वजीत राणे आणि अन्य नेते यांची उपस्थिती होती.
मंत्री विश्वजीत राणे पुढे म्हणाले, ‘‘सनातन धर्माची पुनर्स्थापना सत्तरी तालुका आणि उसगाव येथून होणार आहे. सनातन धर्म अधिकाधिक लोकांपर्यंत पोचायला पाहिजे. भारतीय संस्कृतीची महती सनातन धर्मातून कळून येते.’’ वक्फ सुधारणा विधेयकाविषयी बोलतांना मंत्री विश्वजीत राणे म्हणाले, ‘‘केंद्र सरकारच्या वक्फ सुधारणा विधेयकाचे स्वागत आहे. हे विधेयक संसदेत संमत झाले आहे आणि या विधेयकाला गोव्याचा पूर्ण पाठिंबा आहे. या विधेयकाचा संबंध धर्माची नव्हे, तर मालमत्तेशी आहे, असे केंद्र सरकारचे म्हणणे आहे.’’