‘म्हादई प्रवाह’ची बेंगळुरू येथे २२ एप्रिलला होणार बैठक

पणजी, ४ एप्रिल (वार्ता.) – कर्नाटकच्या कळसा-भंडुरा प्रकल्पांचे गोवा आणि कर्नाटक यांनी संयुक्त सर्वेक्षण करावे, अशी मागणी गोवा सरकारने ‘म्हादई प्रवाह’ प्राधिकरणाकडे यापूर्वी केली होती. गोवा सरकारच्या या मागणीवरून ‘म्हादई प्रवाह’ प्राधिकरणाची बेंगळुरू येथे २२ एप्रिल या दिवशी बैठक होणार आहे. ‘म्हादई प्रवाह’ची ही चौथी बैठक आहे.

‘म्हादई प्रवाह’ची तिसरी बैठक गतवर्षी २५ ऑक्टोबर या दिवशी गोव्यात झाली होती. या बैठकीत ‘म्हादई प्रवाह’ प्राधिकरणाने संयुक्त सर्वेक्षणाविषयी केंद्राकडून कायदेशीर सल्ला घेण्याचे ठरवले होते. ‘म्हादई प्रवाह’च्या चौथ्या बैठकीत नवीन कालवे आणि पिण्याच्या पाण्याचा प्रकल्प यांना संमती देण्यावर चर्चा होणार आहे. बैठकीत महाराष्ट्राच्या प्रस्तावित विर्डी धरणाच्या सविस्तर प्रकल्प अहवालावर चर्चा होणार आहे. प्रस्तावित विर्डी धरणाला कर्नाटकनेही विरोध दर्शवला आहे. गतवर्षी जुलै मासात गोवा सरकारच्या विनंतीवरून ‘म्हादई प्रवाह’च्या गटाने गोवा, महाराष्ट्र आणि कर्नाटक येथे जाऊन म्हादईच्या पात्राचा अभ्यास केला होता; मात्र या गटाने कर्नाटकने ज्या ठिकाणी म्हादईचे पाणी वळवले आहे, त्या ठिकाणी भेट दिली नाही. गोवा सरकारने याला तीव्र आक्षेप घेतला होता. त्यानंतर गोवा सरकारने ऑगस्ट २०२४ मध्ये प्राधिकरणाकडे कळसा-भंडुरा प्रकल्पांच्या ठिकाणचे म्हणजेच कर्नाटकने म्हादईचे पाणी वळवलेल्या ठिकाणांचे संयुक्त सर्वेक्षण करण्याची मागणी केली होती.