दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील गर्भवतीच्या मृत्यूचे प्रकरण !
चिल्लर फेकत शिवसेनेचे आंदोलन, ‘पतित पावन संघटने’ने मंगेशकर रुग्णालयाच्या फलकाला काळे फासले !
पुणे – येथील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात तनिषा भिसे या गर्भवती महिलेचा मृत्यू झाल्याप्रकरणी नियुक्त केलेल्या ५ सदस्यांच्या समितीद्वारे रुग्णालयाची चौकशी करण्यात येणार आहे. आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी आरोग्य उपसंचालकांना समिती स्थापन करण्याच्या सूचना दिल्या होत्या. या समितीत एका स्त्रीरोगतज्ञांचाही समावेश आहे. रुग्णालयाबाहेर उद्धव ठाकरे गट, शिवसेना, पतित पावन संघटना, युवक काँग्रेस, आर्.पी.आय., संगीता तिवारी यांची ‘गुलाबो गँग’ असे विविध राजकीय पक्ष, संस्था, संघटना यांनी रुग्णालय प्रशासनाचा निषेध केला. रुग्णालय परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला.
शिवसैनिकांनी चर्चा करायला आलेल्या रुग्णालय अधिकार्यांवर नाणी फेकून निषेध दर्शवला. रुग्णालयाचे प्रशासकीय प्रमुख सचिन व्यवहारे, डॉ. धनंजय केळकर यांनी रुग्णालय चालवण्यास घेतले आहे. ‘जोपर्यंत मनुष्यवधाचा गुन्हा नोंद होत नाही, तोपर्यंत आम्ही हे आंदोलन करणार आहे’, अशी भूमिका शिवसैनिकांनी घेतली आहे. रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावरील रुग्णालयाच्या फलकाला ‘पतीत पावन संघटने’ने काळे फासले.
रुग्णालयाने भिसे कुटुंबियांनाच ठरवले दोषी !
या प्रकरणी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने समिती स्थापन करून अहवाल सिद्ध केला आहे. यात डॉ. धनंजय केळकर यांच्यासह आणखी २ आधुनिक वैद्यांचा समावेश आहे. भिसे कुटुंबियाने रुग्णालयाचे आदेश पाळले नाहीत आणि रागातून खोटी तक्रार दिली, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे, तसेच ‘रुग्णालयाकडून कुठलेही पैसे आम्ही मागितले नव्हते; मात्र आमच्या विरोधात खोटी तक्रार करण्यात आली’, असे रुग्णालय प्रशासनाने सांगितले.
रुग्णालयातील घटना दुर्दैवी ! – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
दीनानाथ मंगेशकर हे नावाजलेले रुग्णालय आहे. या प्रकरणी आधुनिक वैद्य आणि कर्मचारी यांनी असंवेदनशीलता दाखवून अधिक पैसे मागितले. याविषयी लोकांच्या मनात चीड आहे. मी समिती गठीत केली आहे. तिच्याद्वारे धर्मादाय रुग्णालयाचे कामकाज सुधारण्यासाठी लक्ष घालू. अशा घटना होऊ नयेत; म्हणून कडक कारवाई करू.
आमदार चित्रा वाघ म्हणाल्या की, धर्मादाय रुग्णालये रुग्णसेवेसाठी असतात कि पैसे कमावण्यासाठी ? धर्मादाय रुग्णालयात रुग्णांना अशी असंवेदनशील आणि अमानवीय वागणूक मिळत असेल, तर अशी रुग्णालये बंद करा, अशा असंवेदनशील वैद्यकीय अधिकार्यांचे परवाने रहित करा. रुग्णालय प्रशासनाने मात्र रागाच्या भरात अर्धवट माहिती देऊन दिशाभूल केली जात आहे.
काय आहे तनिषा भिसे यांच्या पुणे येथील रुग्णालयातील मृत्यूचे प्रकरण
तनिषा भिसे या ७ महिन्यांच्या गर्भवती होत्या. त्यांना जुळी मुले असल्याचे वैद्यकीय पडताळणीत निष्पन्न झाले होते. २९ मार्च या दिवशी प्रसुतीवेदना चालू झाल्यामुळे त्यांना रुग्णालयात भरती करण्यासाठी आणले होते. रुग्णालय प्रशासनाने गुंतागुंतीच्या शस्त्रकर्मासाठी १० लाख रुपये आगाऊ भरण्याची मागणी केली. रुग्णाच्या नातेवाइकांनी ३ लाख रुपये भरण्याची सिद्धता दाखवली; परंतु १० लाख रुपये भरल्याविना उपचार करणार नाही, अशी भूमिका रुग्णालयाने घेतली. मंत्रालयातून ‘मुख्यमंत्री साहाय्यता निधी’तून पैसे दिले जातील, असे रुग्णालय प्रशासनाला कळवण्यात आले होते; मात्र प्रशासन स्वत:च्या अटीवर ठाम राहिले. २ घंट्यांनंतर रुग्णाला सूर्या रुग्णालयात हलवण्यात आले. तेथे रुग्णाची शस्त्रकर्माद्वारे प्रसुती होऊन २ मुलींचा जन्म झाला; पण तनिषा भिसे यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी त्यांच्या मृत्यूला वेळेवर उपचार न करणारे दीनानाथ रुग्णालयाचे प्रशासन उत्तरदायी असल्याचा आरोप रुग्णाचे नातेवाईक आणि आमदार अमित गोरखे, तसेच भाजपच्या आमदार चित्रा वाघ यांनी केला आहे. |
रुग्णालयातील उद्दामपणा ही मोगलशाहीच ! – मंत्री चंद्रशेखर बावनकुळे
हलगर्जीपणा करणार्या रुग्णालयावर १०० टक्के कारवाई केली जाईल. रुग्णालयातील उद्दामपणा ही मोगलशाही आहे. तनीषा भिसे यांच्या प्रकरणात कुणालाही सोडले जाणार नाही.