दोडामार्ग तालुक्यात हत्ती हटवा मोहिमेसाठी सकारात्मक हालचाली

मोहिमेचा प्रस्ताव सादर करण्याचा वनमंत्र्यांचा आदेश

मुंबई – सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यातील शेतकर्‍यांना होणारा हत्तींचा उपद्रव रोखण्यासाठी प्राथमिक प्रतिसाद दल स्थापन करण्याचा, तसेच या हत्तींना तिलारी धरणाच्या परिसरातील संरक्षित क्षेत्रात नेण्यासाठी आराखडा सिद्ध करण्याचा आदेश वनमंत्री गणेश नाईक यांनी दिला.

दोडामार्ग तालुक्यातील हत्तींच्या समस्येवर उपाययोजना करण्याच्या संदर्भात मुंबई येथे मंत्रालयात वनमंत्री नाईक यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. माजी मंत्री आमदार दीपक केसरकर वन विभागाचे अपर मुख्य सचिव मिलिंद म्हसकर, प्रधान मुख्य वन संरक्षक शोमिता बिश्वास, उपसचिव विवेक होसिंग, अतिरिक्त प्रधान मुख्य वन संरक्षक बी.व्ही. रामाराव आदी उपस्थित होते.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात हत्तींमुळे शेतकर्‍यांची हानी होत आहे. या हत्तींपासून संरक्षण करण्यासाठी वन विभागाने सविस्तर आराखडा बनवावा. या हत्तींना नैसर्गिक अधिवासात ठेवल्यास ते शेतात येणार नाहीत. त्यासाठी तिलारी प्रकल्पाच्या संरक्षित भागात या हत्तींना ठेवण्यासाठी त्या ठिकाणी हत्तींच्या उपजीविकेसाठी आवश्यक असलेले बांबू, केळी, फणस आदी झाडे लावण्यात यावीत. हत्तींचा वावर असलेल्या परिसरात रेल्वे रुळाचे कुंपण करण्यासंदर्भात नियोजन करावे. या हत्तींच्या वावरावर लक्ष ठेवण्यात यावे. यासाठी कर्नाटक आणि बंगाल राज्याच्या वन विभागाकडून मार्गदर्शन घ्यावे. वन्य प्राण्यांमुळे होणार्‍या  पिकांच्या हानीभरपाईच्या रकमेत वाढ करण्याचा प्रस्ताव पाठवावा, तसेच यामध्ये बांबू पिकाच्या समावेशाचा प्रस्ताव सादर करावा, असा आदेश मंत्री नाईक यांनी या वेळी दिला.