गोवंशियांच्या अवैध वाहतूक प्रकरणी ३ जणांवर गुन्हा नोंद !

प्रतिकात्मक चित्र

सातारा, ४ एप्रिल (वार्ता.) – अनधिकृतपणे गोवंशियांची वाहतूक करणार्‍या ३ जणांवर कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे. कराड-विटा मार्गावरून एका वाहनातून गोवंशियांची वाहतूक केली जात होती. याविषयी रूपेश गाजी आणि त्यांचे सहकारी यांना माहिती मिळाली. त्यांनी हे वाहन अडवून पोलिसांना माहिती दिली. पोलीस हवालदार महेश शिंदे यांच्यासह इतर कर्मचारी घटनास्थळी आले. त्यांना गाडीमध्ये अत्यल्प जागेत ६ गोवंश दाटीवाटीने भरल्याचे आढळले, तसेच गोवंशासाठी चारा-पाण्याची व्यवस्था केलेली नव्हती. या गोवंशियांची सुटका करून त्यांना गोशाळेमध्ये पाठवले आहे. प्राणी वाहतूक अधिनियमानुसार सत्यम चौगुले, मारुति सोपे आणि गणेश सोपे या ३ जणांवर कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे.